सुनीत पोतनीस

एडवर्ड बेलफोर हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे लष्करी सर्जन. आयुष्यातला अधिकतर काळ मद्रास म्हणजे सध्याच्या चेन्नईत राहिलेले, परंतु ते अधिक ओळखले जातात ते त्यांनी मद्रास आणि बेंगळळूरुमध्ये स्थापन केलेल्या वस्तुसंग्रहालये आणि प्राणिसंग्रहांमुळे, एक पौर्वात्य विद्यांचे अभ्यासक म्हणून तसेच हिंदी आणि पर्शियन भाषांचे तज्ज्ञ जाणकार आणि शब्दकोश निर्माते म्हणून!

एडवर्ड ग्रीन बेलफोर हे मूळचे स्कॉटिश, जन्म १८१३ सालचा, स्कॉटलंडमधील माँट्रोस इथला. कॅप्टन जॉर्ज बेलफोर या ईस्ट इंडिया कंपनीच्या नौदलात काम करणाऱ्या माणसाचे हे द्वितीय पुत्र. प्राथमिक शिक्षण माँट्रेस येथे झाल्यावर एडिनबरो युनिव्हर्सटिीतून ते सर्जनची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन, एडिनबरोत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे भारतीय सांस्कृतिक विविधतेच्या आकर्षणातून त्यांनी पूर्वीची नोकरी सोडून ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील मद्रास येथील मेडिकल सíव्हसमध्ये साहाय्यक सर्जनच्या पदावर नोकरी धरली. १८३६ मध्ये ते मद्रासच्या युरोपियन रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले.

हरहुन्नरी, अनेक विषयांत रस घेणारे एडवर्ड जरी लष्करी वैद्यक या पदावर कंपनी सरकारात नोकरीस होते तरी त्यांना निरनिराळ्या विभागांमध्येही दुसऱ्या कामगिऱ्यांवर पाठवले जात असे. अनेक वेळा त्यांना हिंदी आणि पर्शियन भाषेचे अनुवादक म्हणून नेमले गेले, कर्नाटक नवाबाच्या दरबारात ब्रिटिशांचा वकील म्हणून नियुक्ती, मद्रासच्या टांकसाळीत असिस्टंट मास्टर या पदावर, मद्रास गव्हर्नरचे व्यक्तिगत वैद्यक म्हणून, अहमदनगर आणि बोरीमध्ये स्टाफ सर्जन तसेच अंदमान, बर्मा येथेही वैद्यकीय विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. या निमित्ताने संपूर्ण भारतीय प्रदेशात भरपूर भ्रमंती झालेल्या एडवर्डनी मद्रासच्या एका ब्रिटिश सर्जनच्या मुलीशी लग्न करून ते मद्रासमध्ये स्थायीक झाले. भाषाशास्त्राची विशेष जाण असलेल्या एडवर्डनी तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व मिळवलं आणि त्यामुळे ते जिथे जिथे जात तेथील लोकांमध्ये मिसळून जात. निरनिराळ्या प्रदेशांमधून अनेक जुन्या, दुर्मीळ वस्तू गोळा करण्याचाही छंद त्यांना होता.

sunitpotnis@rediffmail.com