डॉ. श्रुती पानसे  contact@shrutipanse.com

आपल्या शरीराचं एक निश्चित वय असतं. पण विविध अनुभवांच्या पातळीवर आपली वयं पूर्णपणे वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, पहिलीतल्या मुलांचं शारीरिक वय हे सहा वर्ष पूर्ण असेल; पण पहिलीतले विद्यार्थी म्हणून त्यांचं वय शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ एक दिवस असेल.

एखादी साठ वर्ष वयाची व्यक्ती प्रथमच संगणक हाताळत असेल; तेव्हा तिचंही संगणक शिक्षणातलं वय जेवढे दिवस संगणक हाताळून झाले तेवढंच असतं, असं मानायला हवं. एखादी व्यक्ती अभियंता म्हणून पाच वर्ष काम करत असेल, तर ते वय साहजिकच पाच वर्ष; पण या व्यक्तीला पहिलं बाळ होईल, त्या दिवशी पालक म्हणून त्याचं वय केवळ एक दिवस असेल, कारण या क्षेत्रात ही व्यक्ती अगदी नवी आणि अननुभवी आहे.

प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक शिक्षणात, प्रत्येक कामात वेगवेगळी आव्हानं असतात. ती आव्हानं पेलताना आणि समस्या सोडवताना कस लागतो. कारण प्रत्येक अनुभव वेगळा असतो. या समस्याही वेगळ्या असतात. ‘सहा वर्षांचा घोडा झालास, तरी वजाबाकी जमत नाही,’ या वाक्याला काहीच अर्थ नाही. पहिल्या मुलाचं करताना चुका झाल्या, असं कबूल करणारे अनेक असतात.

असे आपण कायमच वेगवेगळ्या अनुभव-वयाचे बनून समाजात वावरत असतो. समजा, आपल्याला दोन मुलं असतील, तरी दोन्ही मुलं आपल्याला वेगवेगळा अनुभव देतात. परीक्षेला बसवतात. एकाचा स्वभाव दुसऱ्यापेक्षा पूर्ण वेगळा असतो. एकाच्या वस्तू कदाचित दुसऱ्याला चालतील; पण एकाच्या वेळचे आपले अनुभव दुसऱ्याच्या वेळेला चालतीलच, असं सांगता येत नाही. अशा वेळी आपल्या अनुभव-वयाचं महत्त्व फार जाणवतं.

आपण नवीन गोष्टी शिकत असतो, नव्या कामावर रुजू झालेलो असतो, तेव्हा तिथले आधीचे अनुभव तुलनेने कमी असतात किंवा अजिबातच नसतात. न्यूरॉन्सच्या जोडण्या झालेल्या असतील तर त्या काही प्रमाणात मदत करतील; पण नव्यानं प्रयत्न करावेच लागतील. ज्या दिवशी अनुभव घेऊ, त्या दिवसापासून पुढे न्यूरॉन्सच्या जोडण्या सुरू होतील. तेच आपलं त्या क्षेत्रातलं वय. हे समजून घेतलं, तर अनेक गोष्टी सोप्या होतील. आणि शिकण्याचं.. अनुभवांचं महत्त्व वाढेल.