जगामध्ये वराहांच्या शंभरहून अधिक जाती आढळतात. संकरीकरणातून झपाटय़ाने वजन वाढणाऱ्या, अधिक पिल्लांना जन्म देणाऱ्या, चांगली मातृत्व भावना असणाऱ्या व मांसात चरबीचे प्रमाण कमी असणाऱ्या विविध जातींची पदास करण्यात आली आहे.    
मांसल उत्पादनासाठी प्रामुख्याने हॅम्पशायर, लँड्रेस, यॉर्कशायर, बर्कशायर, डय़ूरॉक, चेस्टर व्हाइट या विदेशी जातींचा वापर केला जातो.
हॅम्पशायर ही ब्रिटनमधील जुनी जात असून अमेरिकेत तिचा विकास झाला. यांचा रंग काळा असून छातीवर पांढरा पट्टा असतो. डोळे मोठे, बटबटीत व सुंदर असतात. हे वैशिष्टय़ इतर जातींमध्ये आढळत नाही. यांनी भारतीय वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेतले आहे.
  लँड्रेस वराहांची उत्पत्ती डेन्मार्कमध्ये झाली. यांचा रंग पांढरा, शरीरावर काळे डाग, पाय व शरीर बळकट, कान मोठे व लोंबकळणारे असतात. यांची लांबी सर्वात जास्त असते. त्यांच्यात लठ्ठपणा आढळत नाही.
यॉर्कशायर वराह मूळचे ब्रिटनचे असून पाठीतील मांसासाठी प्रसिद्ध आहेत. यांचा रंग पांढरा, चेहरा चपट, कान सरळ उभे व पातळ असतात. लार्ज व्हाइट यॉर्कशायर व मिडल व्हाइट यॉर्कशायर या उपजाती प्रसिद्ध आहेत.
बर्कशायर वराह मूळचे इंग्लंडचे असून मांस उत्पादनासाठी उत्तम आहेत. यांचा रंग काळा परंतु पाय, डोके व शेपटीचा भाग पांढरा असतो. चेहऱ्याचा आकार बशीसारखा खोल असतो. कान उभे असतात.
 डय़ूरॉक वराह अमेरिकेत विकसित झालेले असून यांना डय़ूरॉक जर्सी म्हणूनही ओळखले जाते. या वराहांचा रंग लालसर व कान उभे असतात. मादीमध्ये पिल्ले पदासक्षमता व मातृत्व भावना उत्तम आढळते. माद्यांना जास्त दूध येते. त्यामुळे पिल्लांची वाढ झपाटय़ाने होते.
चेस्टर व्हाइट या अमेरिकेतील वराहांचा संपूर्ण रंग पांढरा असतो. त्यांचे कान खाली वाकलेले असतात. मादीमध्ये पिल्ले पदासक्षमता चांगली असते.
देशी वराह आकाराने लहान, मोठे पोट असणारे, केसाळ व काळ्या रंगाचे असतात. चेहरा लांबट व कान लहान असतात. विदेशी जातींच्या तुलनेत उत्पादनक्षमता कमी असते.
– डॉ.शरद आव्हाड (अहमदनगर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – चार्वाक
जो ‘चारु’ म्हणजे गोड बोलतो तो चार्वाक असे एक वाक्य एकेकाळी रूढ होते. गोड अशासाठी की ज्यात फारशी अनुमाने म्हणजे अप्रत्यक्ष गोष्टींपासून काढलेले निष्कर्ष नाहीत ते सर्वसाधारण लोकांना कळते किंवा गोड वाटते आणि शिवाय हे जग साध्या लोकांनीच भरलेले असते. म्हणूनच जे प्रत्यक्ष दिसते तेच खरे बाकी सगळे खोटे असे चार्वाकांनी गृहीत धरले आणि जिथे धूर असतो तिथे अग्नी असलाच पाहिजे हे अनुमानही खोडले.
हल्ली आपण धूरच धूर बघतो त्याला अग्नी असावाच लागतो असे नाही. या असल्या गृहीतकावर मग चार्वाकांनी मोक्ष, निर्वाण, ध्यान, देव, स्वर्ग, नरक, चैतन्य, आत्मा, पाप-पुण्य, निष्काम कर्म, उपवास, तपश्चर्या, समाधी, जात-पात, पुनर्जन्म, आत्मपरीक्षण, प्राणायाम आणि स्त्री-पुरुष भेदभाव या सगळ्या गोष्टी एका बोळ्याने पुसून टाकल्या, एवढेच नव्हे तर अनेक प्रकारचे युक्तिवाद करून त्यांची छकले उडवली. श्राद्धांत पितरांना जेवण देऊन जर ते त्यांना पोहोचत असेल तर वरच्या मजल्यावरच्या भाडेकरूला का पोहोचत नाही? यज्ञात बळी दिलेल्या पशूला स्वर्ग भेटतो तर मग बापालाच का कापत नाही? असे प्रश्न विचारले. धर्माचरणाने माणूस सुखी होतो अधर्माने दु:खी होतो हे धादांत खोटे आहे. धर्माचा मक्ता घेतलेल्या भिक्षुक ब्राह्मण आणि धर्मगुरूंनी त्यांची सत्ता टिकविण्यासाठी उभारलेले हे थोतांड आहे. सुख-दु:ख या गोष्टी सगळ्यांच्याच आयुष्यात घडतात. मासा खाताना काटा काढून खातात तसे दु:ख दूर लोटावे आणि सुख खावे किंबहुना माणसाने सुखाच्या मागे असावे, ऐहिक शारीरिक सुखच खरे आणि आयुष्याची उभारणी अर्थ (पैसे धन-धान्य) आणि काम (इच्छा, भोग, प्राप्ती) यांवरच आधारली असली पाहिजे, असे बिनधास्तपणे त्याने सांगितले. शेती, पशुपालन, व्यवहार, धंदा, उद्यम आणि राज्यकर्त्यांची नोकरी याच गोष्टी खऱ्या. याने समाज तयार होतो. या समाजात कायदे कानून असले पाहिजेत, ते राजाने अमलात आणावेत आणि असा अंमल करणारा राजा हाच देव आहे, असे त्याचे म्हणणे होते. त्याचे तत्त्वज्ञान लोकांसाठी (इथल्या, परलोक नव्हे) म्हणून त्याला लोकायत असे नाव होते. माणूस मेला की सगळे संपते. तोच त्याचा मोक्ष. फळे एके ठिकाणी बरेच दिवस ठेवली तर पुढे ती मऊ होतात आणि मग त्याच्यातून बुडबुडे निघतात तसाच जड पदार्थातून जीव तयार होतो त्या जीवाला जपणे आणि त्याच्या गरजा भागवणे हे त्या जीवाचेच आद्य कर्तव्य आहे, असे त्याने निक्षून सांगितले.
माझी एक वहिनी होती ती म्हणायची, ‘ब्रह्मच सत्य आहे, जग खोटे’ हे वाक्य खोटे आहे. जगच सत्य आहे आणि तिथे कायद्याचे राज्य हवे त्याबद्दल उद्या आणि नंतर डॉकिन्स या आधुनिक चार्वाकाबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

कुतूहल – वराहपालन
adulterated milk
Milk Adulteration: भेसळयुक्त दूध कसे ओळखावे? दुधाची शुद्धता तपासण्यासाठी फॉलो करा ‘या’ २ ट्रिक्स
dairy farming in maharashtra
महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाची वाटचाल
कुतूहल – गाईंचे आजार

वॉर अँड पीस – चिरतारुण्य, आरोग्यासाठी रसायनप्रयोग : भाग १
आयुर्वेदीय शास्त्रकारांनी, ज्यांना म्हातारपण येऊ नये असे वाटते, कोणताच रोग होऊ नये, असे इच्छिणाऱ्यांकरिता दोन प्रकारची रसायन उपचारांची पद्धती विस्ताराने सांगितली आहे.दैनंदिन जीवनात पुरेसा व्यायाम करून, रोजचा नोकरीपेशा सांभाळून, खाण्यापिण्याची बंधने पाळून जी रसायन औषधी सुचविली जातात, त्यांना वातातपिक रसायन असे म्हटले जाते.
ज्या व्यक्तींना पुरेसा मोकळा वेळ आहे; ज्यांना कुशल वैद्य व दक्ष परिचारक यांचे खात्रीचे सहकार्य मिळू शकते व स्वतंत्र, एकांतात असणारी निवासाची सोय उपलब्ध आहे. त्यांच्याकरिता कुटिप्रावेशिक रसायन उपचारपद्धती थोर शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. या प्रयोगासाठी रोगीही चांगला धिराचा असला पाहिजे. नाहीतर लाभापेक्षा हानीच अधिक होण्याची भीती असते. अलीकडे असे प्रयोग झालेले क्वचित कानावर येतात; बघायला मिळतात.
वातातपिक रसायन याचाच अवलंब वैद्यक व्यवहारामध्ये प्रामुख्याने केला जातो. नेहमीच्या पद्धतीने घरात राहून ऊन वाऱ्याचे फारसे वज्र्यावज्र्य न पाळता हा प्रयोग करता येतो. आरोग्य वाढावे, तारुण्य टिकून राहावे, वार्धक्य लवकर येऊ नये, या दृष्टीने करावयाचे प्रयोग प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष ते माघ या महिन्यात करावे. साधारणपणे वयाची पस्तीशी उलटल्यानंतर प्रत्येकानेच रसायन प्रयोग करावा किंवा ज्यांची प्रकृती कृशदुर्बल आहे, मधूनमधून काहींना काही विकार सारखे होतात. अशांनीही रसायन प्रयोग करावे. शरीराला व्याधिक्षमता येण्याच्या दृष्टीने उपयोग होतो.
वातातपिक रसायन प्रयोगाकरिता आवळा, आस्कंद, अमरकंद, गोखरू, कुडा, गुळवेल, चंदन, पिंपळी, भुईकोहळा, लसूण, बला, मनुका, शतावरी अशा वनस्पतींपासून तयार केलेल्या सिद्धकल्पांची निवड करता येते. या वनस्पतींबरोबरच सुवर्ण, रौप्य, ताम्र, लोह, सुवर्णमाक्षिक, जसद, कथिल, शिलाजीत, सागरातील मोती, शंख, शिंपा, कवडय़ा व प्रवाळ अशांचीही मदत घेऊन म्हातारपण लांब ठेवता येते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १० ऑक्टोबर
१८९९ > साम्यवादी नेते, विचारवंत व लेखक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म.  ‘गांधी व्हर्सेस लेनिन’ , ‘टिटोचा युरोपविरुद्ध कट’, ‘गाडगीळ आणि भारतीय लोकशाहीचे अर्थशास्त्र’ आदी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. पत्रकार म्हणूनही कॉ. डांगे यांनी ‘इंदुप्रकाश’ दैनिकाचे उपसंपादक ते ‘क्रांती’ साप्ताहिकाचे संपादक असा प्रवास केला. वक्तृत्व साध्यासोप्याच शब्दांचे आणि श्रोत्यांना ‘मंत्रमुग्ध’ करण्यापेक्षा त्यांना शहाणे करणारे असावे, असे मानणाऱ्या तत्कालीन वक्त्यांपैकी कॉ. डांगे एक श्रेष्ठ वक्ते होते.
१९५३> कवयित्री, ग्रामीण कथाकार व लोकजीवन आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रतिमा इंगोले यांचा जन्म. त्यांच्या कथांतून खेडय़ांतील दारिद्रय़ आणि माणुसकीच्या गोफासोबतच तिथली सांस्कृतिक वैशिष्टय़ेही दिसतात. ‘भुलाई’ हा काव्यसंग्रह, ‘बुढाई’ ही कादंबरी आणि  सामाजिक विषयांवरील अनेक लेख त्यांनी आजवर लिहिले आहेत.
१९५५ > ‘माझी कहाणी’ या प्रेरक आत्मचरित्रातून वैधव्यापासून ते हिंगणे आश्रमापर्यंत आणि तेथून अमेरिकेपर्यंतचा प्रवास मांडणाऱ्या खंद्या कार्यकर्त्यां पार्वतीबाई आठवले यांचे निधन. अलीकडेच ‘माझी कहाणी’चे पुनप्र्रकाशन झाले आहे.  – संजय वझरेकर