20 January 2019

News Flash

‘मोजमापन’ आढावा – ३

मोजमापन या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे.

मोजमापन या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. यावर अजूनही लिहिण्यासारखे बरेच आहे. खगोलीय मोजमापे, निर्वातीकरण करताना पोकळीतील हवेच्या दाबाची मोजमापे, अतिसूक्ष्म व अतिविशाल मोजमापे यांसारख्या विषयांचा फक्त ओझरता उल्लेख या सदरात झाला. या सदरात मोजमापनसंदर्भातील अनेक विषयांना स्पर्शही केला गेलेला नाही, याची जाणीव आम्हाला आहे.

या दैनंदिन सदराची जोडणी फेसबुकवर देऊन मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान प्रसाराच्या कार्याला हातभार लावण्याची इच्छा काही वाचकांनी पत्रातून व्यक्त केली. त्यास मराठी विज्ञान परिषदेनेही तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे माहितीची देवाणघेवाण आणि आपसांतली चर्चा  अन्यत्रही सुरू झाली. ‘लोकसत्ता’तील ‘लोकमानस’सारख्या वाचनीय सदरांसह आधुनिक संपर्क व समाजमाध्यमांचा ज्ञानप्रसारासाठी विधायक उपयोग झाला,  एवढीच यातील सकारात्मक बाब.

काही लेखांबद्दल शंका विचारणारी अनेक पत्रे लेख प्रकाशित झाल्यानंतर आली. या सदराचे सार्वजनिक ‘सवालजबाब’ असे स्वरूप होऊ नये म्हणून संबंधित लेखकांनी पत्रलेखकांना व्यक्तिश: इमेलद्वारे परस्पर उत्तरे दिली. यातून शंकांचे निरसन झाले व त्याबद्दल काही वाचकांची कृतज्ञता व्यक्त करणारीही पत्रे आली.

कुतूहल हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे. ते भूतकाळात होते, वर्तमानात आहे व भविष्यातही राहणार आहे. सभोवताली दिसणाऱ्या गोष्टी, घडणाऱ्या घटना याबद्दल सतत काहीतरी जिज्ञासा माणसाच्या मनात असते. त्या प्रत्येक गोष्टीमागे, घटनेमागे काहीतरी कार्यकारणभाव असतो व त्या कार्यकारणभावामागे काहीतरी विज्ञानच असते. हे विज्ञान जाणून घेतल्यास, समजून घेतल्यास त्यावर आधारित बाबींचा अधिक चांगल्या प्रकारे बोध होतो. यातून त्याचा व्यवहारात प्रभावीपणे कसा वापर करता येईल याचा विचार माणूस करू लागतो. या कुतूहलातूनच नवनवीन शोध लागले व विज्ञान मानवाच्या साहाय्यासाठी, कष्ट कमी करण्यासाठी, सुखी जीवनमानासाठी वापरले जाऊ लागले. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. नवनवीन कुतूहल जागृत होते. ते शमविण्यासाठी माणूस वेगवेगळ्या युक्त्या लढवतो. ज्ञात गोष्टींतून अज्ञात गोष्टींचा शोध हीच विज्ञान संशोधनाची रीत आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया चालू आहे, तोपर्यंत मानव प्रगतिपथावर मार्गक्रमण करीत राहणार.  जेव्हा मानवाचे कुतूहल संपेल, कशाबद्दलच जिज्ञासा राहणार नाही, तेव्हा मानवाची प्रगतीसुद्धा थांबलेली असेल.

हे दैनंदिन सदर चालविताना मराठी विज्ञान परिषद समन्वयकाच्या भूमिकेत असल्याने हे सामूहिक काम आहे. स्तंभलेखक, मराठी विज्ञान परिषदेतील सहकारी, विषयतज्ज्ञ, समन्वयक व ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी या सर्वाच्या योगदानामुळे ते सहजरीत्या करता आले व यापुढेही चालू राहील. सर्व संबंधितांचे आभार.

गेली सलग बारा वर्षे कुतूहल सदर चालू आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळे विषय हाताळले गेले. सर्व वाचकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा. पुन्हा भेटू या, नवीन वर्षांत नवीन विषयांसह!

– डॉ. जयंत जोशी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

लेखकांच्या आदानप्रदानाची जबाबदारी..

‘वाग्देवीचे वरदवंत’ या साहित्यिक छोटय़ा सदरलेखनामुळे  वर्षभर आपण भेटत होतो. ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारप्राप्त ( कृष्णा सोबती (२०१७) वगळता )  सर्व लेखकांची, त्यांच्या साहित्याची ओळख व्हावी या उद्देशाने या लेखनाला प्रारंभ झाला. आपल्या मातृभाषेप्रमाणेच भारतातील अन्य भाषांतून होत असलेल्या चांगल्या, श्रेष्ठ दर्जाच्या साहित्यकृतींमध्ये कशा प्रकारची अभिव्यक्ती होत आहे, तिचा दर्जा काय आहे, याबद्दलची उत्सुकता सजग वाचकांच्या मनात नेहमीच असते. या सदरलेखनामुळे या ‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखकांच्या साहित्याचा परिचय थोडाफार का होईना झाला असेल, अशी आशा आहे.

प्रत्यक्ष भेटल्यावर आणि पुणे, मुंबई, पालघर, मालवण, नांदेड, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, गोवा, यूएसए इ. अनेक ठिकाणांहून उदंड प्रतिसाद मिळाला. या सगळ्यांची मी ऋणी आहे. या लेखकांचे अनुवादित साहित्य वाचायला कुठे मिळेल, अशी अनेकांनी विचारणा केली. आपल्या मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार फक्त चारच वेळा का? किंवा आपल्या- अमक्या लेखकाची ही कादंबरी उत्कृष्ट आहे, तरी त्यांना ज्ञानपीठ का मिळू नये? किंवा तुमच्या मते कुणा मराठी लेखकाला हा पुरस्कार मिळायला हवा, अशी विचारणाही केली. आपले मराठी साहित्य इतर भाषकांपर्यंत म्हणावे तसे पोहोचत नाही. साहित्य अकादमीच्या हिंदी पत्रिकेचे प्रमुख संपादक जी. ए. शानी म्हणाले ते पटणारे आहे- ‘मराठीला ज्ञानपीठ मिळत नाही कारण तुमचे लेखक चांगले असूनही, तुम्ही  ते इतरांपर्यंत ते पोहोचवत नाही. जबाबदारी तुमची आहे.’

तेव्हा जात, धर्म, प्रांत, विभागवार अपेक्षा करण्यापेक्षा दर्जेदार मराठी साहित्याचे इतर भारतीय भाषांत -हिंदी आणि इंग्रजी भाषांत- अनुवाद होण्याची अत्यंत गरज आहे.साहित्यसंमेलनात होणारा अनाठायी खर्च कमी करून जमेल तेवढा निधी अनुवाद कार्याकडे वळवला, राज्य मराठी विकास संस्था व  साहित्य संस्कृती मंडळाने दर वर्षी मराठीतील निदान दहा निवडक पुस्तकांचे दर्जेदार हिंदी, इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केले, अनुवादांसाठी पुरस्कार दिले तर खऱ्या र्थाने ती मायमराठीची सेवा होईल.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on December 29, 2017 3:35 am

Web Title: different types of measurement part 3