13 December 2019

News Flash

कुतूहल : वैश्विक किरणांचा शोध

सन १९११मध्ये व्हिक्टर हेस या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने बलूनच्या साहाय्याने अधिक उंचीवरचा किरणोत्सर्ग मोजला

(संग्रहित छायाचित्र)

सन १८९६ मध्ये हेन्री बेक्वेरलने किरणोत्सर्गाचा शोध लावला. वातावरणातही हा किरणोत्सर्ग आढळतो. वातावरणातल्या या किरणोत्सर्गाचा उगम जमिनीखालील खडकांमधल्या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांमध्ये असावा अशी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस समजूत होती. थिओडोर वोल्फ या जर्मन शास्त्रज्ञाने हा किरणोत्सर्ग मोजण्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि सहज वापरण्याजोगे ‘इलेक्ट्रोमीटर’ हे उपकरण बनवले. यातील वायूच्या आयनिभवनाच्या प्रमाणावरून किरणोत्सर्गाच्या पातळीविषयी अनुमान काढता येई. थिओडोर वोल्फने १९०९ सालच्या सुमारास विविध ठिकाणी जाऊन या उपकरणाद्वारे तिथल्या वातावरणातील किरणोत्सर्ग मोजला आणि या किरणोत्सर्गाचा स्रोत पृथ्वीच्या कवचाच्या वरच्या थरांतील मूलद्रव्यांत असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या उंचीवरील किरणोत्सर्गाचे प्रमाणही मोजण्यास सुरुवात केली. वातावरणातील किरणोत्सर्गाचा स्रोत हा जर जमिनीत असेल, तर उंचावरच्या ठिकाणी किरणोत्सर्गाची पातळी कमी असायला हवी, अशी त्याची अटकळ होती. त्याने पॅरिसमधील, ३०० मीटर उंच असणाऱ्या आयफेल मनोऱ्यावर जाऊन किरणोत्सर्ग मोजला. पण त्याला तिथल्या किरणोत्सर्गाच्या पातळीत जमिनीवरील किरणोत्सर्गाच्या तुलनेत अपेक्षित घट आढळली नाही.

सन १९११मध्ये व्हिक्टर हेस या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाने बलूनच्या साहाय्याने अधिक उंचीवरचा किरणोत्सर्ग मोजला. सुरुवातीच्या उड्डाणात त्याचा बलून ११०० मीटर उंचीपर्यंत गेला. इतक्या उंचीवर जाऊनही त्याच्या इलेक्ट्रोमीटरने जमिनीच्या तुलनेत किरणोत्सर्गात फारसा फरक दाखवला नाही. यातून वातावरणातील किरणोत्सर्गाचा स्रोत पृथ्वीच्या कवचात नसल्याचे सिद्ध झाले. यानंतर १९१२ साली हेसने एकूण सात उड्डाणे केली. यातील शेवटच्या उड्डाणात त्याचा बलून ५३०० मीटर उंचीपर्यंत पोचला. या उंचीवर मात्र त्याच्या उपकरणाने किरणोत्सर्गाचे प्रमाण जमिनीवरील किरणोत्सर्गाच्या तुलनेत तिप्पट असल्याचे दाखवले. याचाच अर्थ या किरणोत्सर्गाचा स्रोत वातावरणाच्या बाहेर कुठे तरी अंतराळात होता. हेसने यावरून असा निष्कर्ष काढला की वातावरणाच्या बाहेरून येणाऱ्या भेदक प्रारणांमुळे किरणोत्सर्गाची ही नोंद होत असावी. या प्रारणांना ‘वैश्विक किरण’ असे नाव देण्यात आले.

व्हिक्टर हेसच्या निष्कर्षांना वेर्नर कोलह्योस्र्टेर या जर्मन संशोधकाने १९१३-१४ साली नऊ हजार मीटर उंचीपर्यंत केलेल्या निरीक्षणांतून पुष्टी मिळाली. यातून किरणोत्सर्गाच्या तीव्रतेत उंचीनुसार होणारी वाढ दिसून आली आणि या प्रारणांच्या पृथ्वीबाह्य स्रोतांवर शिक्कामोर्तब झाले. व्हिक्टर हेसला वैश्विक किरणांच्या शोधाबद्दल १९३६ साली नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले.

डॉ. वर्षां चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on November 12, 2019 12:09 am

Web Title: discovery of global rays abn 97
Just Now!
X