02 March 2021

News Flash

डोम ऑफ द रॉक

ज्यू आणि ख्रिश्चनांच्या मते अब्राहमने कुर्बानी दिलेला मुलगा इसाक होता तर मुस्लिमांच्या मते तो इस्माईल होता.

जेरुसलेमच्या क्षितिजावर चटकन उठून दिसणारी आणि या शहराचा एक लँडमार्क बनलेली, भव्य सोनेरी घुमट असलेली इमारत ‘डोम ऑफ द रॉक’ मुस्लीम आणि ज्यू धर्मीयांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम या तिन्ही समाजांचा मूळ पुरुष अब्राहम याने देवाच्याच सांगण्यावरून स्वतच्या मुलाचा बळी देऊन देवाच्या परीक्षेत पुरेपूर उतरला. ज्यू आणि ख्रिश्चनांच्या मते अब्राहमने कुर्बानी दिलेला मुलगा इसाक होता तर मुस्लिमांच्या मते तो इस्माईल होता. या टेम्पल माउंटवरच ही घटना घडल्यामुळे या तिन्ही धर्मीयांना या स्थानाचे महत्त्व आहे. डोम ऑफ द रॉक ज्या टेम्पल माउंटवर आहे तिथेच ज्यूंची सालोमन राजाने बांधलेली दोन्ही प्रसिद्ध मंदिरे होती. रोमन सत्ताधाऱ्यांनी ज्यूंचे द्वितीय मंदिर उद्ध्वस्त करून तिथे आपल्या ज्युपिटर या देवतेचे भव्य मंदिर बांधले. पुढे सहाव्या शतकात इस्लामचे प्रेषित महंमद पगंबर यांनी मक्केहून जेरुसलेमपर्यंत एका रात्रीतून घोडय़ावरून प्रवास करून या टेम्पल माउंटवर अल्लाची प्रार्थना केली. सध्या डोम ऑफ रॉकमध्ये असलेल्या एका कातळावरून जिब्राल या देवदूताच्या साहाय्याने प्रेषितांनी स्वर्गारोहण केले. महंमद साहेबांनी अल्लाहकडून उपदेश आणि आदेश घेण्यासाठी हे स्वर्गारोहण केले अशी मुस्लीम समाजाची श्रद्धा आहे. मक्का ते जेरुसलेम हा लांबचा पल्ला एका रात्रीतून घोडय़ावरून गाठण्याचा चमत्कार महंमदांनी केला, त्यांच्या स्वर्गारोहणाचे वर्णन कुराणाच्या १७ व्या सुराहात आहे. या घटनेमुळे इस्लाम धर्मीयांना डोम ऑफ द रॉक हे स्थान पवित्र वाटते. सध्याच्या डोम ऑफ द रॉकच्या पायावरच ज्यूंचे पुरातन मंदिर उभे होते. उमायद घराण्याच्या खलिफा अब्दुल मलिकने इ.स. ६९१ मध्ये सध्याच्या उभ्या असलेल्या चोवीस स्तंभांच्या अष्टकोनी इमारतीवर वीस मीटर्स व्यासाचा घुमट उभारला. ज्या खडकावरून महंमदांनी स्वर्गारोहण केले त्याचा थोडासा भाग या इमारतीमध्ये उघडा करून ठेवलेला आहे. डोम ऑफ द रॉकचे अरेबिक नाव आहे ‘कुब्त अल सक्राह’.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

प्रा. डॉ. एम. एस. स्वामिनाथन

भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून डॉ. स्वामिनाथन ओळखले जातात. दिल्लीच्या भारतीय कृषिसंशोधन संस्थेत अध्यापन करताना त्यांनी सायटोलोजी-जेनेटिक्स आणि वनस्पती संकरण यावर संशोधन केले. त्याच संस्थेचे संचालक आणि नंतर भारतीय कृषी-संशोधन परिषदेचे महासंचालक (१९७०-८०) ही महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. प्रयोगशाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि विद्याíथनी यांच्या संशोधन प्रकल्पातील प्रगती यावर त्यांचे बारीक लक्ष असे. आधुनिक तंत्रज्ञानाचा सतत उपयोग करणे यावर त्यांचा भर असे. गहू व तांदूळ यांच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती त्यांनी विकसित तर केल्याच, शिवाय त्या देशातील शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी योजना आखून कार्यान्वितही केली.

सन १९८२ ते ८८ या काळात ते मनिला येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संथेचे संचालक होते. मिन्नेसोटा विद्यापीठातील डॉ. नॉर्मन बोरलाग यांनी मेक्सिकन गव्हाच्या रोगप्रतिकारक, अधिक उत्पादन देणाऱ्या, बुटक्या गव्हाची जात तयार केली. त्यांच्या सहकार्याने डॉ. स्वामिनाथन यांनी त्या जातीचा प्रसार भारतात करण्यासाठी योजनापूर्वक मेहनत करून देशातील गव्हाचे उत्पादन अनेक पटींनी वाढवले, देशात हरितक्रांतीचा पाया घातला.

वन-पर्यावरण मंत्रालयाचे सचिव असताना देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी राबवले. या प्रकल्पात अनेक विद्यापीठे, संशोधन केंद्रे यांचा सहभाग असल्याने प्रथमच लहानमोठे वैज्ञानिक मोठय़ा प्रमाणावर देशाच्या पर्यावरणाचा अभ्यास करू लागले, जागरूक झाले. त्या तीन प्रकल्पाद्वारे हिमालयाचा परिसर, संपूर्ण गंगा नदीचे खोरे आणि समस्या आणि पश्चिम घाटाची निसर्गसमृद्धी यांचे पर्यावरणीय महत्त्व यांची अधिकृत शास्त्रीय माहिती गोळा केली गेली.

डॉ. स्वामिनाथन यांना अल्बर्ट आइनस्टीन पुरस्कार, वर्ल्ड फूड पुरस्कार, फेलो ऑफ रोयल सोसायटी, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे अनेक सन्मान आणि सन्माननीय डॉक्टरेट मिळाल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी चेन्नई येथे आपल्या नावाने एक संशोधन संस्था स्थापन केली असून तेथे वनस्पती जनुकजतन, खारफुटी वनस्पतींची जनुकरचना, कृषिविज्ञान, इकोविलेज, निसर्ग संरक्षणात आदिवासी स्त्रियांचा सहभाग, निसर्ग आणि पर्यावरण रक्षण यावर सुरू असलेल्या संशोधनास संभावित हवामान बदलाबाबतच्या संदर्भात मोठेच महत्त्व आहे.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:25 am

Web Title: dome of the rock
Next Stories
1 ज्यूंचे सालोमन मंदिर माहात्म्य
2 अरब-इस्रायल संघर्ष
3 जेरुसलेम-एन्डलेस क्रुसेड्स
Just Now!
X