25 April 2019

News Flash

डॉ. सत्यव्रत शास्त्री – संस्कृत (विभागून)

सत्यव्रत शास्त्री यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३० रोजी लाहोर येथे झाला.

संस्कृत विद्वान पंडित, प्रतिभासंपन्न कवी आणि व्याकरणाचार्य डॉ. सत्यव्रत शास्त्री यांना भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २००६चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कोकणी भाषेतील साहित्यिक रवींद्र केळेकर यांच्याबरोबर विभागून देण्यात आला आहे.

सत्यव्रत शास्त्री यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३० रोजी लाहोर येथे झाला. विद्वान वडील चारुदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीचे शिक्षण झाले. त्यानंतर संस्कृत विषयातील बीएच्या परीक्षेत आतापर्यंतच्या गुणांची सर्व रेकॉर्ड्स मोडून अत्युत्तम गुण संपादन केले. एमएच्या परीक्षेत पंजाब विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे सन्माननीय पदक प्राप्त झाले.  दिल्ली विद्यापीठात ४० वर्षे ते संस्कृत शिकवत होते. संस्कृत विभागाचे प्रमुख आणि कला विभागाचे डीनही झाले. ओरिसातील पुरी येथील श्री जगन्नाथ संस्कृत विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. बँकॉक, जर्मनी, बेल्जियम, कॅनडा इ. अनेक विद्यापीठांत ते संस्कृतचे व्हिजिटिंग प्रोफेसर होते. उत्तम वक्ता असलेल्या शास्त्रीजींनी युरोप, द. अमेरिका, साऊथ ईस्ट एशिया अशा अनेक देशांमध्ये शंभरहून अधिक अभ्यासपूर्ण भाषणे दिली आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. उषा सत्यव्रत याही प्राध्यापिका आहेत.

वयाच्या १२व्या वर्षी ‘षड्ऋतुवर्णनम्’ ही कविता लिहून त्यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला आणि तेव्हापासून त्यांचे काव्यलेखन सुरूच आहे. अनेक महाकाव्ये, खंडकाव्ये, प्रबंधकाव्ये त्यांनी लिहिली आहेत. विशेष म्हणजे संस्कृत वाङ्मयात प्रचलित नसलेली आत्मकथा, डायरी, पद्यमय पत्र संकलन, समीक्षा इ. अनेक साहित्य प्रकारांत त्यांनी संस्कृतमध्ये लेखन केले हे त्यांचे फार मोठे योगदान आहे. आणखी एक विशेष म्हणजे त्यांनी ‘रामायणाचे भाषाशास्त्रीय अध्ययन’ लिहिले.    त्यांना     अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत ६३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पद्मश्री,  पद्मभूषण यासह  साहित्य अकादमी पुरस्कार, पंजाब सरकारतर्फे  शिरोमणी संस्कृत साहित्यकार पुरस्कार, वाचस्पती पुरस्कार, कालिदास पुरस्कार आदी. त्यांच्या ‘श्रीरामकीर्ती महाकाव्यम्’ला तर  देशविदेशातील तब्बल ११ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

रडू बाई रडू

‘गंगा यमुना डोळ्यात उभ्या का?’ पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या या लोकप्रिय भावगीतातनं लग्न होऊन सासरी निघालेल्या नववधूच्या मानसिक अवस्थेचं साग्रसंगीत वर्णन केलंय; पण एखाद्या शंकासुराच्या मनात प्रश्न उभा राहीलच. खरोखरीच डोळ्यांतून असा आसवांचा पूर वाहू शकतो का? त्याच्या संशयाचं निराकरण करायचं तर मग डोळ्यांतून किती अश्रू वाहतात याचं मोजमाप करायला हवं. ते करण्यासाठी सहसा ऑटो शर्मरनं बनवलेल्या चाचणीचा वापर केला जातो.

गंमत अशी की शर्मरनं ‘आय आय सिन्ड्रोम’ म्हणजे कोरडय़ा डोळ्यांच्या व्याधीचं निदान करण्यासाठी त्या चाचणीचा घाट घातला होता. डोळे ओलसर ठेवण्यासाठी अश्रुग्रंथींकडून जो सततचा स्राव होत असतो त्याचं मोजमाप करण्यासाठीच ही चाचणी वापरली जाते.

त्यासाठी शर्मरनं कागदाची एक छोटीशी पट्टी खालच्या पापणीच्या आत सरकवली आणि डोळे बंद करायला सांगितले. असं केल्यानं कोणताही अपाय होत नाही. तरीही ती पट्टी झोंबल्यामुळं अश्रूंचा बांध फुटतोय असं वाटलं तर बधिरीकरणासाठी एका मलमाचा उपयोगही तो करत असे. पाच मिनिटांनंतर डोळे उघडून ती पट्टी किती भिजलीय, हे तो पाहत असे. अर्थात याच चाचणीचा उपयोग रडताना किती अश्रू ढाळले जातात हे मोजण्यासाठीही करणं शक्य आहे. एवढंच नाही तर ते खरोखरीचे आहेत, उगीचच कढ आणल्यावर येणारे नक्राश्रू नाहीत, याचीही खातरजमा करण्याची सोय शर्मरनं करून ठेवली आहे.

निरोगी तरुण माणूस सरासरीनं त्या पट्टीचा १५ मिलिमीटर एवढा भाग पाच मिनिटांमध्ये ओला करतो. धाय मोकलून रडताना खरोखरीच अश्रूंचा महापूर लोटत असेल तर अर्थात त्याहून अधिक भाग ओला व्हायला हवा. १५ मिलिमीटरपेक्षा कमी लांबीचा भागच ओला होत असेल तर त्याच्या अश्रुग्रंथी पुरेसा पाझर करत नाहीत असं म्हणायला हवं. ‘शोग्रेन्स सिन्ड्रोम’ नावाच्या एका व्याधीनं पछाडलेली व्यक्ती जेमतेम ५ मिलिमीटरच पट्टी ओली करते. तिचे डोळे कोरडेच राहतात असं म्हणता येईल. ही झाली नेहमीची परिस्थिती; पण राग, आनंद, दु:ख, वेदना अशा विविध प्रकारच्या भावनातिरेकापायी जर त्याच्याही अश्रुग्रंथी चाळवल्या गेल्या तर मात्र तोही १५ मिलिमीटरची पूररेषा पार करेल असा कयास बांधायला हरकत नसावी.

-डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on November 6, 2017 2:45 am

Web Title: dr satya vrat shastri