20 January 2021

News Flash

इजिप्त-बॅबिलोनियाची ‘गणित संस्कृती’

प्राचीन इजिप्तमधील भाषेत लिहिल्या गेलेल्या गणितास ‘इजिप्त संस्कृतीतील गणित’ संबोधले जाते.

प्राचीन इजिप्तमधील भाषेत लिहिल्या गेलेल्या गणितास ‘इजिप्त संस्कृतीतील गणित’ संबोधले जाते. पपायरस या कागदसदृश पृष्ठावर केलेले ते गणितलेखन अनेक देशांतील वस्तुसंग्रहालयांत जपून ठेवले आहे. त्यांतील काहींचा काळ इ.स.पूर्व १६५० मानला जातो, मात्र प्रत्यक्षात ती त्याहूनही आधीची असावीत अशीही अटकळ आहे. त्यावरून अंक व संख्या चित्रात लिहिण्याची इजिप्शिअन पद्धत समजते. सदर पपायरसवर आढळणाऱ्या मजकुरात- विविध भौमितिक आकारांच्या क्षेत्रफळांची सूत्रे, गुणाकार-भागाकारांच्या पद्धती, मूळसंख्या आणि विभाज्य संख्या यांचे विवरण, अंकीय मध्य, भौमितिक मध्य तसेच हार्मोनिक मध्य, परिपूर्ण (पर्फेक्ट) संख्यांची उपपत्ती, एराटोस्थेनिसची (मूळ संख्यांची) चाळणी, एकरेषीय समीकरणे आणि अंकगणितीय व भौमितिक शृंखला.. अशा गणितातील चौफेर मूलभूत विषयांवर विश्लेषण केलेले आढळते. काही पपायरस वर्गसमीकरण सोडवण्याची पद्धत आणि गणिती कूटे देतात. त्यातील एक कूट छिन्नशंकूच्या घनफलासंबंधी आहे.

मेसोपोटेमिया (सध्याचा इराक) येथील गणितींचे काम ‘बॅबिलोनिया संस्कृतीतील गणित’ म्हणून ओळखले जाते. तेथील बॅबिलोन या शहरात हे अध्ययन व संशोधन केल्याचे मानतात. चिखलापासून बनवलेल्या छोटय़ा-छोटय़ा पाटय़ांवर (विटांवर) त्या मंडळींनी त्यांना ज्ञात असलेले गणित कोरून ठेवलेले आहे. त्यात इ.स.पूर्व ३००० इतक्या जुन्या काळातील गुणाकाराचे तक्ते (पाढे) तसेच भूमितीतील कूटे आहेत. त्यांची अंकांची चिन्हे वेगळी होती आणि अंकगणितासाठी त्यांनी षष्ठिमान पद्धत अवलंबली होती. यात गणनाचा पाया ६० असतो, जो आजही आपण वेळेच्या गणनेत (तास, मिनिटे व सेकंद) वापरतो. ‘संख्येतील आकडय़ांची स्थानानुसार बदलणारी किंमत’ ही पद्धत बॅबिलोनियन लोकांच्या संख्यालेखन व्यवस्थेत होती. वर्गमूळ दोनची पाचदशांश स्थळांपर्यंतची किंमत, अपूर्णाक, मूलभूत बीजगणित, एकरेषीय तसेच वर्ग-घन-समीकरणे सोडवण्याच्या पद्धती, विख्यात पायथागोरस नियम.. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह त्यांनी केलेला दिसतो. दशमान पद्धतीत जसे पूर्णाक व अपूर्णाकामध्ये टिंबाचे चिन्ह असते, तसे एखादे चिन्ह बॅबिलोनियन संख्यालेखन पद्धतीत दिसत नाही.

स्वतंत्रपणे अनेक प्राचीन संस्कृतींत गणित विकसित झाले यावरून त्याचे महत्त्व आणि त्या संस्कृती का प्रगत होत्या हे समजते.

– प्रा. सलिल सावरकर
मराठी विज्ञान परिषद,
संकेतस्थळ : www.mavipa.org
ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 12:45 am

Web Title: egypt babylonian mathematical culture mppg 94
Next Stories
1 द्वैत नाम दुरी..
2 तें तें वाटे मी ऐसें
3 नवदेशांचा उदयास्त: सिंगापूर
Just Now!
X