जवळपास सर्वच लॅन्थॅनाइड्स ‘शीतप्रकाश’ देणारी असतात. त्यातल्या त्यात ‘युरोपिअम’ या कामासाठी जरा जास्तच प्रमाणात वापरलं जातं.  शीतप्रकाश म्हणजे नेमकं काय?

सहसा एखादी वस्तू किंवा पदार्थ कमी-अधिक प्रमाणात तापले की त्यातून प्रकाश बाहेर फेकला जातो. आपण प्रकाश मिळण्यासाठी जी काही उपकरणे वापरतो, त्यांच्या बाबतीत असंच घडतं. पण काही पदार्थ असे असतात की त्यांमधून प्रकाश बाहेर पडण्यासाठी ते तापण्याची गरजच नसते. अशा प्रकाशाला शीतप्रकाश म्हणतात.

कधी काही कीटक प्रकाशमान झालेले आपण पाहतो. त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारा प्रकाश हा काही रासायनिक अभिक्रियांमुळे निर्माण होतो. कधी काही पदार्थाचे स्फटिक तयार होताना त्यातून प्रकाश उत्सर्जति होतो. काही वेळा काही पदार्थातून विद्युतऊर्जा वाहिली असता, ते पदार्थ प्रकाशमान होतात.

तर कधी काही पदार्थ प्रकाशऊर्जा शोषून घेतात आणि कालांतराने तीच प्रकाशऊर्जा बाहेर फेकतात आणि म्हणून ते प्रकाशमान होतात. लॅन्थॅनाइड्स याच गटात मोडतात. बरेच लॅन्थॅनाइड्स प्रकाश-कण (फोटॉन्स) शोषतात आणि काही काळाने तीच ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर सोडतात. याबाबतीत ‘युरोपिअम’ हे मूलद्रव्य खूप सक्षम समजलं जातं.

त्यामुळेच तर चित्रवाणी संच आणि संगणकाचा पडदा यांसाठी ‘युरोपिअम’चा खास उपयोग केला जातो. तसेच अनेक प्रकारचे फ्ल्यूरोसंट दिवे आणि काचा यांमध्येही ‘युरोपिअम’ महत्त्वाची भूमिका बजावतं. हल्ली हार्डडिस्कमध्ये असणाऱ्या मेमरी चिप्समध्येही ‘युरोपिअम’चा सढळ हस्ते वापर होऊ लागला आहे.

आजवर ‘युरोपिअम’ची सतरा समस्थानिकं आढळली असून त्यातली काही अणुभट्टय़ांमध्ये न्युट्रॉन शोषून घेण्यासाठी वापरतात, कारण ‘युरोपिअम’ची न्युट्रॉन शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त आहे.

१५१ एवढा अणुभार असलेलं ‘युरोपिअम’, शिशाएवढं मऊ आणि मजबूतदेखील असल्यामुळे, घन असूनही त्याला हवा तसा आकारही देता येतो. प्रामुख्याने बॅस्नासाइट आणि मोनॅझाइट या दोन खनिजांमध्ये ‘युरोपिअम’ आढळतं. आणि तसं बघायला गेलं तर सूर्य आणि काही तारे यांमध्येही ‘युरोपिअम’ असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी मांडली आहे.