आपण अनेकदा एक गोष्ट करत असतो आणि त्यावेळी मनात दुसरं चालू असतं. शिवाय तिसरंही चालू असतंच. एकापाठोपाठ एक वेगवान विचार असतात हे. तेही बऱ्याचदा चालू कामापासून, चालू अनुभवापासून विचलित करणारे!

समजा आपल्याला जुना मित्र किंवा मैत्रीण भेटली, खूप सुंदर आणि वेगळाच पक्षी अचानक समोर आला, हिरवागार डोंगर किंवा अगदी काहीही. तर त्याच वेळी लक्षात येतं की, चला, या क्षणाचा फोटो तर काढायला हवाच. मग मोबाइल बाहेर काढायचा. इथे नेटवर्क असेल का, याची मनात आधी चिंता. नेटवर्क असलं, फोटो काढला आणि फेसबुक/ व्हॉट्सअ‍ॅप आदी समाजमाध्यमांवर टाकला की पुन्हा चालू कामात यायला आपल्याला वेळ मिळतो.

नेटवर्क नसेल तर जोवर फोटो टाकत नाही, तोपर्यंत एक बारीकशी अस्वस्थता मनात येतेच. हे विचार रेंगाळताहेत तोपर्यंत इतर लोक काय करताहेत, काय म्हणताहेत, याची उत्सुकता बाजूला टाकता येत नाही.

या सगळ्यामुळे आत्ता आपण काय बघत होतो, आपल्याला काय दिसलं होतं, आपण काय खात होतो, आपल्याला कोण भेटलं होतं, या सगळ्या गोष्टी मनापासून लांब लांब निघून जातात. जगण्याचा छान अनुभव हाताशी असूनही आपण तो घेत नाही.

आपल्या आत एक मन असतं. ते सतत, न थांबता ‘नोटिफिकेशन’ देतच राहतं. आपण जगत असतो तो प्रत्येक क्षण, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस या नोटिफिकेशन्सकडे लक्ष द्यावं लागतं. आपण ज्या काळात जगतो आहोत तो काळ एकावेळी अनेक कामं करण्याचा आहे. नेहमीच्या भाषेत-मल्टिटास्किंग. आपला मेंदू एका वेळी अनेक गोष्टी करू शकत नाही. त्या त्या वेळी खूप ताण येतो असं नाही, तर आपण जे काही काम किंवा अभ्यास करत असतो ते तितकंसं चांगलं होत नाही, कारण त्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही.

आपण जे करत आहोत तिथेच आपलं लक्ष असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर हे खूप साधं आहे. ऐकायला-वाचायला फारच सोपं. पण स्वत:ला वर्तमानात ठेवण्यासाठी, स्वत:च्याच मनात जागा करणं हे अनेकांना अवघड जातं आहे.

– डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.co