नेपोलियनच्या अस्तानंतर बेकार झालेला जीन अलार्ड हा फ्रेंच तरुण सेनानी नोकरीच्या शोधात इराण, काबूलमध्ये काही काळ नोकरी करून १२ हजार कि.मीटरचा खडतर प्रवास करून लाहोरात शीख साम्राज्याचे महाराजा रणजीत सिंग यांच्याकडे आश्रयार्थ आला. त्याला घोडदळात नियुक्त करून त्यांच्या फौज-ए-खाससाठी कमांडो पथक आणि भालेदार घोडदळ तयार करण्याची जबाबदारी महाराजांनी त्याच्यावर टाकली. अलार्डने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्यावर महाराजांनी त्याला जनरल हा खिताब देऊन आपले लष्कर आणि लष्करी प्रशासन युरोपियन पद्धतीने प्रगत आणि अद्ययावत करून घेतले. अलार्डच्या कार्यक्षमतेने, निष्ठेने प्रभावित झालेल्या रणजीत सिंग यांनी आपल्या सन्यात आणि नागरी प्रशासनातही अनेक युरोपियन आणि अमेरिकन अधिकारी नियुक्त केले. अलार्डने फौज ए खासची पुनर्रचना करताना शस्त्रास्त्रांमध्ये सुधारणा केलीच, पण सनिकांना शिस्त लावून त्यांच्यासाठी गणवेशाची योजना केली. तत्पूर्वी कोणत्याही भारतीय संस्थानांच्या सनिकांना गणवेश वापरण्याची पद्धत नव्हती. अलार्डमुळे रणजीत सिंग यांनी सर्व लढाया, चकमकी जिंकून सर्व संस्थानांमध्ये सर्वाधिक प्रबळ अशी फौज उभी केली.

रणजीत सिंग यांनी अलार्डच्या कामगिरीवर खूश होऊन जनरल या पदावर बढती दिली आणि पंजाबमध्ये काही जमीन देऊन ‘ब्राइट स्टार ऑफ पंजाब’ ही उपाधी दिली. अलार्डला पेशावरच्या परिसरात बौद्ध स्तूपांच्या जवळ उत्खनन करून ऐतिहासिक अवशेषांचा अभ्यास करण्याचा आणि नाणीसंग्रहाचा छंद होता. त्याच्या मृत्यूसमयी त्याच्या नाणेसंग्रहाची किंमत चार लक्ष फ्रँक एवढी होती. अलार्डने चंबा येथील काश्मिरी तरुणी बानू पांडे हिच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुले झाली. या बानू पांडेचे नाव पुढे ‘बानू पॅन डी’ असे झाले. अलार्डने फ्रान्समध्ये त्याच्या सेंट ट्रोपाज या गावी मोठे आलिशान घर बांधले आणि कधीतरी तो कुटुंबासह तिकडे जात असे. त्याचा सध्याचा वंशज हेन्री अलार्ड हा या गावचा मेयर असून त्याने अलार्डच्या घराचे रूपांतर ‘पॅन डी पॅलेस’ या आलिशान हॉटेलात केलंय! पेशावरमध्ये १८३९ साली अलार्डचा मृत्यू झाला. लाहोरमध्ये त्याची कबर आहे.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com