डोक्याच्या आत असलेला मेंदू हा आपल्या सर्व विचारप्रक्रिया, भावना, निर्णयक्षमता, आवडीनिवडी या साऱ्यांस कारणीभूत असतो. मेंदू जितका जास्त समजून घेता येईल, तितकं माणसाचं आयुष्य सुखकर होईल. लहान मुलं कसा विचार करतात, त्यांच्या मेंदूत नेमकं काय चाललेलं असतं, कोणत्या पद्धतीनं त्यांना शिकवल्यास सोपं जाईल, मुलं हट्ट का करतात, काही मुलं अबोल तर काही खूप चळवळी का असतात, अध्ययन अक्षमतांचं काय करायचं.. अशा प्रकारचे काही मुद्दे आपण या लेखमालेमध्ये पाहिले.

आपल्यात कोणकोणत्या बुद्धिमत्ता असतात? शिक्षणव्यवस्था ही केवळ भाषा आणि गणित या दोन बुद्धिमत्ता तपासते. परंतु इतर अनेक बुद्धिमत्तांना आपल्या शालेय जीवनात आणि समाजातदेखील विशेष स्थान नाही. ज्यांच्यात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता आहेत, त्यांना पुरेशी संधी मिळत नाहीत. त्यामुळे विविध बुद्धिमत्तांविषयी आपली समज वाढण्याची, त्या समजून घेण्याची गरज आहे.

आपल्या मेंदूत निर्माण झालेल्या भावनांना आपणच कारणीभूत असतो आणि बाह्य़ परिस्थिती कशीही असली तरी आपण आपल्या मेंदूला कोणत्याही क्षणी नियंत्रित करू शकतो, भावनांच्या आहारी वाहून न जाता सर्वकाळ तार्किकतेने विचार कसा करू शकतो, अशा प्रकारचे विषय या लेखमालेत हाताळले गेले. त्यास वाचकांचा ई-मेलद्वारे आणि समाजमाध्यमांतून मिळणारा प्रतिसाद अविस्मरणीय आहे. शालेय-महाविद्यालयीन गटापासून सर्व वयाच्या वाचकांनी नवे प्रश्न विचारले. त्यातल्या काही प्रश्नांना या लेखमालेतून उत्तरं देता आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं केल्या गेलेल्या मेंदू-संशोधनांचे निष्कर्ष लेखांच्या स्वरूपात मांडणं, हा या लेखमालेचा उद्देश होता. अफाट मेंदू-संशोधनांपैकी काही संशोधनं या सदराच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवता आली. काही मतमतांतरं सांगता आली. मेंदुशास्त्र त्या तुलनेने आधुनिक विज्ञान आहे. यात आगामी काळातही सातत्यानं संशोधनं होत राहतील. नवे विषय हाताळले जातील. आपण स्वत:च्या आणि इतरांच्याही मेंदूशी मत्री करत राहू, हे जास्त महत्त्वाचं आहे! – श्रुती पानसे

contact@shrutipanse.com