02 June 2020

News Flash

कुतूहल : आरएनएचे कार्य

‘आरएनए’ म्हणजे रिबोन्यूक्लिइक आम्ल. आरएनए हे डीएनएप्रमाणेच पेशींत आढळणारे न्यूक्लिइक आम्ल आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘आरएनए’ म्हणजे रिबोन्यूक्लिइक आम्ल. आरएनए हे डीएनएप्रमाणेच पेशींत आढळणारे न्यूक्लिइक आम्ल आहे. १९३३ साली जीन ब्राशेट या बेल्जियन संशोधकाला सी अर्चिनच्या अंडय़ांवर संशोधन करताना एक महत्त्वाची गोष्ट आढळली. या दोन आम्लांपैकी डीएनए हे आम्ल पेशीच्या केंद्रकात सापडते, तर आरएनए हे आम्ल पेशीच्या केंद्रकाबाहेरील पेशीद्रवात सापडते. ज्या पेशी मोठय़ा प्रमाणावर प्रथिनांची निर्मिती करतात, त्या पेशींत आरएनए रेणू मोठय़ा प्रमाणात असतात, हेही लवकरच स्पष्ट झाले. जनुकीय माहिती जपणारे डीएनए रेणू हे शारीरिक विकासाला लागणाऱ्या विविध प्रथिनांशी संबंधित असणे अपेक्षितच होते. मात्र, या प्रथिनांच्या निर्मितीत डीएनएचा थेट सहभाग नसल्याचेही दिसून येत होते. असे असल्यास, डीएनएच्या रेणूंकडून दिल्या जाणाऱ्या प्रथिनांच्या निर्मितीच्या सूचना अमलात कशा आणल्या जात असाव्या, हा एक प्रश्न होता.

अमेरिकी संशोधक पॉल झामेकनिक याने १९५०-६० च्या दशकांत केलेल्या संशोधनात, उंदराच्या यकृतातील पेशी घेतल्या व त्या एकजीव (होमोजिनाइझ) केल्या. त्यात त्याने काही अ‍ॅमिनो आम्ले टाकली. रासायनिक क्रियेला ऊर्जा पुरवण्यासाठी (अ‍ॅक्टिव्हेशन) त्यात अ‍ॅडेनोसिन ट्रायस्फॉस्फेट हे रसायन मिसळले. या क्रियेतून छोटय़ा प्रमाणात प्रथिनांची निर्मिती होत असल्याचे त्याला दिसून आले. त्यानंतर त्याने पेशीत आढळणारा प्रत्येक घटक वेगळा करून त्यावर हीच प्रक्रिया करून पाहिली. ही प्रक्रिया घडून येण्यासाठी पेशीच्या केंद्रकांची (ज्यात डीएनएचे रेणू वसले आहेत) गरज भासत नव्हती; परंतु ज्या कणांत आएनएचे रेणू वसले आहेत-त्या मायक्रोझोम (आताचे रायबोझोम) या नावे ओळखल्या जाणाऱ्या पेशीबाहेरील कणांचा मात्र या प्रक्रियेत सहभाग होता. मायक्रोझोममधील आरएनएच्या रेणूंबरोबरच, मायक्रोझोमबाहेर असणाऱ्या इतर प्रकारच्या काही छोटय़ा आरएनए रेणूंचा तसेच काही विकरांचाही (एन्झाइम) या प्रक्रियेत सहभाग होता.

त्यानंतर १९६० च्या दशकात इ. कोलाय या जिवाणूंच्या पेशी-अर्काचा वापर करून या विविध प्रकारच्या आरएनए रेणूंच्या प्रथिननिर्मितीतील सहभागावर तपशीलवार संशोधन केले गेले. डीएनएने पुरवलेल्या माहितीद्वारे मायक्रोझोम ज्या क्रियेमार्फत प्रथिने निर्माण करतात, त्या क्रियेत सहभागी असलेल्या विविध आरएनए रेणूंचे व विकरांचे स्वरूप यामुळे समजू शकले. विविध प्रकारच्या आरएनए रेणूंचे कार्य व त्यांचा प्रथिननिर्मितीशी असलेला संबंध कळल्यामुळे जनुकशास्त्रातला एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 12:08 am

Web Title: function of rna abn 97
Next Stories
1 कुतूहल : आनुवंशिकतेचे मूळ
2 मेंदूशी मैत्री : (अ)समाधानी पालक
3 कुतूहल : मेंडेलची आनुवंशिकता
Just Now!
X