जादूगाराकडे सगळे जण एकटक पाहात होते. त्याच्या हातात एक स्टीलचा भक्कम चमचा होता. जादूगाराने चमच्याची मान हाताच्या चिमटीत धरली होती. तो चमचा हाताच्या नुसत्या चिमटीत धरून वाकवण्याचं आव्हान त्यानं स्वीकारलं होतं. अबरा.. का ..डबरा.. आणि आश्चर्य! चमचा हळूहळू वाकू लागला. सर्व हॉल टाळ्यांनी दुमदुमला. हे झालं कसं, ते फक्त जादूगारालाच माहीत होतं. जेथे चिमटीत पकडायचं, तेथे स्टील नव्हतंच. तो भाग गॅलियमचा बनवलेला होता.

आपल्याला माहीत असलेल्या सर्व मूलद्रव्यांपैकी दोनच मूलद्रव्य वातावरणीय दाब असताना सामान्य तापमानाला म्हणजे २९८ केल्विन (२५ अंश सेल्सिअस) तापमानाला द्रव अवस्थेत असतात. एक ब्रोमिन आणि दुसरा पारा. तापमान जरा वाढलं की अशीही काही मूलद्रव्यं आहेत, जी द्रवरूपात रूपांतरित व्हायला लागतात. २५ अंश सेल्सिअस ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान वितळणांक असलेली मूलद्रव्ये आहेत – फ्रान्सिअम (२६.८५० अंश सेल्सिअस), सिझिअम (२८.४४० सेल्सिअस),  गॅलिअम (२९.७६०  सेल्सिअस) आणि रुबिडिअम (३९.३१० सेल्सिअस).

गॅलिअमचा वितळणांक आपल्या शरीराच्या तापमानापेक्षाही कमी आहे. साहजिकच धातुरूप गॅलिअम चिमटीत वा हातात ठेवला की वितळणारच! गॅलिअमच्या याच गुणधर्माचा उपयोग जादूगाराने आपल्या जादूत केला. गॅलिअम पाऱ्याप्रमाणे विषारी नाही; रुबिडिअम, सिझिअमप्रमाणे ते अतिक्रियाशीलही नाही. त्यामुळे अशा प्रयोगांच्या वेळी गॅलिअमला प्राधान्य दिलं जातं. गॅलिअमचा वितळणांक तापमान संदर्भ िबदू म्हणून वापरला जातो.

गॅलियमचा वितळणांक कमी (२९.७६० सेल्सिअस) असला तरी त्याचा उत्कलन बिन्दू खूप जास्त म्हणजे २४०० अंश सेल्सिअसइतका आहे. किंबहुना सर्व मूलद्रव्यांची तुलना केली तर वितळणांक आणि उत्कलनबिन्दू यांत सर्वात जास्त फरक गॅलियममध्येच दिसून येतो.

गॅलिअम हे पाण्यासारखंच जरा विचित्र वागतं. कोणत्याही पदार्थाला थंडावा दिला की ते आकुंचन पावतं. पाण्याला मात्र विशिष्ट मर्यादेपर्यंत थंडावा दिला की ते आकुंचन पावतं. पण त्या मर्यादेपलीकडे अधिक थंड केलं; तर पाणी आकुंचन न पावता प्रसरण पावायला लागतं. गॅलियमचंही तसंच आहे. त्याला मर्यादेपलीकडे अधिक थंड केल्यास त्याचं प्रसरण होऊन आकारमान ३.१ टक्क्याने वाढतं. म्हणून गॅलिअमला लवचिक भांडय़ात ठेवतात.

चारुशीला सतीश जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org