आफ्रिका खंडात स्थित असलेल्या व संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या देशांची एकूण संख्या आहे ५५ आणि ती इतर कोणत्याही खंडापेक्षा अधिक आहे! या ५५ पैकी साधारणत: ४५ देश हे मागच्या शतकात सार्वभौम, स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले. असाच एक, पश्चिम आफ्रिकेतला देश आहे- ‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक!

२७ एप्रिल १९६० रोजी स्वातंत्र्य मिळवून अस्तित्वात आलेल्या टोगोच्या सीमा पश्चिमेस घाना, पूर्वेस बेनीन, उत्तरेस बुरकिना फासो या देशांच्या सीमांना भिडलेल्या, तर दक्षिणेस गिनीचे आखात आहे. इतर बहुतांश आफ्रिकी देशांप्रमाणे गरीब व अविकसित असलेला हा देश जगातल्या अत्यंत अरुंद देशांपैकी एक आहे. याची सरासरी रुंदी केवळ ११५ कि.मी. आहे. इतर आफ्रिकी देशांप्रमाणे अनेक वांशिक जमातींच्या टोळ्या ११ व्या ते १६ व्या शतकादरम्यान या प्रदेशात वसल्या. टोगोमध्ये अशा ३० वांशिक समूहांची वस्ती आहे. त्यांपैकी एव आणि मिना या टोळ्या प्रबळ होत. पोर्तुगीज इथे आले इ.स.१४९० मध्ये.

१६ व्या शतकात इथे गुलामांचा व्यापार सुरू झाला आणि पुढची २०० वर्षे टोगोच्या किनारपट्टीवरचा गुलामांचा व्यापार हा तेजीचा व्यवसाय बनला. युरोपीय व्यापारी मोठ्या प्रमाणात गुलामांच्या शोधात टोगोच्या किनारी प्रदेशात आणि अंतर्गत भागात येऊ लागले. टोगोचे नावच झाले- ‘स्लेव्ह कोस्ट’! १८८४ साली जर्मन इथे आले. त्यांनी टोगोच्या किनारपट्टीवरच्या राजाबरोबर त्यांच्या प्रदेशाचे संरक्षक म्हणून करार केला. संरक्षणाच्या नावाखाली जर्मनांनी टप्प्याटप्प्याने टोगोच्या बऱ्याच मोठ्या प्रदेशावर कब्जा करून तिथे जर्मन वसाहत उभी केली.

१९०५ साली या प्रदेशाचे नाव ‘जर्मन टोगोलॅण्ड’ झाले. जर्मनांनी या टोगोलॅण्डच्या विकासाला चांगली चालना दिली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून कोको, कॉफी आणि कापसाची लागवड कशी करायची हे मागासलेल्या शेतकऱ्यांना दाखवून शेतमालाच्या निर्यातीसाठी त्यांनी रेल्वेसेवा सुरू केली आणि लोम या ठिकाणी बंदरही उभारले. पुढे लोम शहराचा विस्तार होऊन ते आधुनिक टोगोचे राजधानीचे शहर झाले. टोगोमध्ये कोको आणि कापसाचे पीक भरपूर येते. जर्मनांनी या पिकांवर मोठ्या प्रमाणात कर लादून आपला लाभ करून घेतला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com