News Flash

मेंदूशी मैत्री : चांगल्या ताणांच्या गोष्टी..

केवळ वयाने मोठय़ा व्यक्तींनाच नाही, तर लहान मुलांनाही  हा नकारात्मक ताण अतिरिक्त प्रमाणात येऊ शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

 डॉ. श्रुती पानसे

ताण हे वाईट असतात. ज्या प्रकारच्या ताणामुळे मनावर आणि शरीरावर घातक परिणाम होतात, ते अपकारक आणि  नकारात्मक असतात. उदाहरणार्थ, जी माणसं नीट वागत नाहीत, अपमानित करतात, त्यांच्याबरोबर राहणं हा एक नकारात्मक ताण आहे. त्यांनी नीट वागावं यासाठी किंवा आपली त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलावी यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे नकारात्मक ताण येणार नाही.

केवळ वयाने मोठय़ा व्यक्तींनाच नाही, तर लहान मुलांनाही  हा नकारात्मक ताण अतिरिक्त प्रमाणात येऊ शकतो. अशा ताणात काय करावं, ते सुचत नाही. ही टोकाची अवस्था आहे. पण चांगले ताण आपलं आयुष्य घडवायला मदत करतात.

चार-पाच महिन्यांचं बाळ पालथं पडून पुढे सरकण्यासाठी जी काही अथक मेहनत घेत असतं, तेव्हा त्याला एक प्रकारचा ताण असतोच. म्हणून तर मधूनच ते रडून-ओरडून ताणाला मोकळी वाट करून देतं आणि पुन्हा आपल्या प्रयत्नांना लागतं. आपण पोहायला शिकत असतो. शिकवणारा एक दिवस अचानक आपल्याला सोडून देतो, मुळीच आधार देत नाही. अशा वेळी तुम्ही शक्य तितक्या जोरात हात-पाय मारता. इथं तुमच्यावर ताण असतो, पण तो उपकारक असतो. हा ताण खऱ्या अर्थानं पोहायचं कसं, हे शिकवतो. सायकल चालवायला शिकतानाही असंच घडतं. शिकवणारा हात सोडून देतो, तेव्हा ताण येतो. सायकल तशीच पुढे रेटली तरच ती चालवायला शिकतो. हा उपकारक ताण आहे. तो सकारात्मक असून जगण्यासाठी आणि नवी कौशल्यं शिकण्यासाठी आवश्यक असतो.

उपकारक तणाव असला, की चांगल्या प्रकारे काम होतं. प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. पण एखाद्याला कसला ताणच नसेल तर? आयुष्यात काही ध्येयच उरलं नाही, माणसाला काहीही काम नसेल, तर त्याला कसलाच आणि कधीही ताण येणार नाही. अशा माणसाचं आयुष्य नीरस होऊन जाईल. छोटी मुलंसुद्धा काहीही काम नसतानासुद्धा प्रयत्नपूर्वक वेगळ्या गोष्टी करण्यात स्वत:ला गुंतवून ठेवतात. ज्येष्ठ नागरिकांनाही फारसं काम नसतं, पण ते मुद्दाम वेगवेगळी कामं स्वीकारतात. ताण ओढवून घेतात. अशा उपकारक ताणांमुळे त्यांचं आयुष्य आनंदी होतं.

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 10:47 pm

Web Title: good stress stuff abn 97
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : सहानुभूती आणि समानुभूती
2 कुतूहल : जड मूलद्रव्ये
3 मेंदूशी मैत्री : दृष्टी
Just Now!
X