भारतात येऊन स्थायिक झालेल्या पठाणांपैकी गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या पठाणांची संख्या अधिक आहे. महमूद गझनीच्या गुजरात आक्रमणाच्या वेळी हे लोक महमुदाचे सैनिक म्हणून गुजरातेत आले आणि त्यातले काही स्थायिक झाले. पुढे महम्मद तुघलकाच्या आक्रमणात आणि गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याच्या कारकीर्दीत पठाण समाज मोठय़ा संख्येनं गुजरातेत स्थायिक झाला. गुजरातच्या विविध हिंदू आणि मुस्लीम राजांकडे पठाण लोक प्रथम सैनिक म्हणून लष्करात नोकरीस होते. गुजराती जीवनशैलीचा प्रभाव पडलेले हे पठाण गुजराती-हिंदी मिश्र भाषा बोलतात. गेल्या शतकात शहरी संस्कृती स्वीकारलेल्या या पठाणांची एकूण बारा घराणी किंवा टोळ्या गुजरातेत आहेत. बाबी, सामा, खानजादा, युसूफझाई, लोहाणी, भांडोरी, सुरत तुर्क, मियानी, झाट्रन, सुलेलिमानी, दुराणी, जालोरी अशा बारा घराण्यांचे हे पठाण बांगश, दुराणी, पठाण, युसूफझाई, खान आणि बाबी अशी उपनामे लावतात.

या बारा पठाण घराण्यांपैकी बाबी पठाणांनी जुनागढात स्वतचे राज्य स्थापन केले तर जालोरींनी पालनपूर येथे राज्य स्थापले. शिवाय राधनपूर आणि बालसिनोर येथेही या पठाणांची छोटी राज्ये होती. या पठाण राज्यांचे संस्थापक प्रथम मोगल साम्राज्याचे मांडलिक होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे स्वतंत्र राज्यकत्रे झाले. पठाणांच्या बारा जमातीपैकी जालोरींची संख्या सर्वाधिक आहे. सर्व गुजराती पठाण सुन्नी इस्लाम धर्माचे असून गुजरातेत अहमदाबाद, जुनागढ, सुरत, राजकोट, बनासकांठा, बडोदा आणि मेहसाणा या जिल्ह्य़ांमध्ये त्यांची वसती असली तरी ते बडोदा आणि मेहसाणात अधिक संख्येने आहेत. मेहसाणा आणि बनासकांठा भागांमध्ये तर काही पठाणांनी आपली लहान लहान खेडीसुद्धा वसवली आहेत. अधिकतर पठाण सध्या गुजरातमधील वस्त्रोद्योग, रंगकाम आणि त्याच्याशी निगडित व्यवसायात आहेत.

गुजराती पठाणांपैकी बाबी पठाणांना त्यांच्या समाजात उच्च दर्जाचे, प्रतिष्ठित समजले जाते. या पठाणांपैकी प्रसिद्ध व्यक्तींमध्ये प्रसिद्ध सिने अभिनेत्री परवीन बाबी, क्रिकेट खेळाडू इरफान पठाण, युसूफ पठाण वगैरे आहेत.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com