25 April 2019

News Flash

उपयुक्त हाफ्निअम

न्यूट्रॉन शोषण्याच्या उत्तम क्षमतेमुळे अणुभट्टीत हाफ्निअमचा वापर केला जातो.

आवर्तसारणीतील सहाव्या गणातील आणि चौथ्या आवर्तनातील अणुक्रमांक ७२ असलेले व अणुभार १७८.५ असलेले हाफ्निअम हे मूलद्रव्य. याच्या अतिउच्च वितळणबिंदूमुळे त्याची अनेक संयुगे व विविध धातूंबरोबर त्याची संमिश्रे तयार होतात. टंग्स्टन, कार्बन व इतर अनेक धातूंबरोबर हाफ्निअमची अतिशय कठीण अशी उपयुक्त संमिश्रे तयार होतात.

न्यूट्रॉन शोषण्याच्या उत्तम क्षमतेमुळे अणुभट्टीत हाफ्निअमचा वापर केला जातो. अण्वस्त्रसज्ज पाणबुडी तसेच लष्करातील व आरमारातील उपयोगातही हाफ्निअम महत्त्वाचा ठरला आहे. हाफ्निअममधील ऊर्जेचा आण्विक अस्त्रांसाठी वापर करता येईल का, हा संशोधकांसाठी अनेक वर्षे वादाचा विषय होता. यात यावर होणारा अमाप खर्च हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. हाफ्निअम ऑक्साइड हे संयुग विद्युतरोधक म्हणून मायक्रोचिप्समध्ये वापरले जाते. तसेच पॉलिमरायझेशनमध्ये उत्प्रेरक म्हणून हाफ्निअमचा उपयोग होतो.

हाफ्निअम धातूपासून बारीक तारा काढता येतात. हा धातू व त्याची पावडर अतिशय ज्वलनशील आहे. हाफ्निअमची नुसती बारीक पावडर हवेत पेट घेऊ  शकते, याचा वापर फोटोग्राफीच्या फ्लॅश बल्बमध्ये वापरला जातो. हाफ्निअमचा उष्णतारोधक गुणधर्म आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजनशी असणारे रासायनिक आकर्षण यामुळे दिव्यांच्या (लाइट बल्बच्या) फिलॅमेंटसाठी हाफ्निअम वापरला जातो. हाफ्निअमची सुमारे ३४ समस्थानिके आहेत. त्यातील फक्त पाच स्थिर समस्थानिके आहेत.  हाफ्निअमवर तयार होणारे ऑक्साइडचे आवरण संरक्षकाचे काम करते त्यामुळे हा धातू गंजत नाही.

आढळ म्हणाल तर अत्यल्प! सुमारे ५ पीपीएम इतकेच हाफ्निअम पृथ्वीच्या पृष्ठभागावर असते व तेसुद्धा महत्प्रयासाने झिरकोनिअमपासून वेगळे करावे लागते. तथापि, इतक्या उशिरा शोध लागलेला असूनही हा धातू किती उपयुक्त ठरू शकतो याचे हाफ्निअम हे उत्तम उदाहरण आहे.

हाफ्निअम हे अतिशय उपयुक्त जरी असले व साधारणपणे माणसाला निरुपद्रवी असले तरी त्याची संयुगे मात्र विषारी समजली जातात. संयुगातील आयोनिक स्वरूपातील हाफ्निअम जर श्वसनाद्वारे शरीरात गेले तर डोळे, त्वचा, फुप्फुसे यातील गंभीर आजारांना आमंत्रणच! त्यामुळे ०.५ मिली ग्रॅम प्रतिघनमीटर प्रतिआठ तास ही संपर्क-मर्यादा त्याच्याबाबतीत घातली आहे.

– डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

First Published on September 3, 2018 2:08 am

Web Title: hafnium chemical element 2