गेल्या काही वर्षांपासून ‘अध्ययन अक्षमता’ हा एक नवीन विषय चर्चेत आलेला आहे. १९०५ मध्ये क्लीव्हलँड इथले नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. डब्ल्यू. ई. ब्रुनर यांनी ‘लहान मुलांच्या वाचन क्षमता’ या विषयावर एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यानंतर १९६३ मध्ये सॅम्युअल कर्क या मानसशास्त्रज्ञानं ‘लर्निग डिसॅबिलिटी’ हा शब्द प्रथम वापरला.

वास्तविक हे लक्षात घ्यायला पाहिजे, की ‘अक्षमता’ हा शब्द अत्यंत नकारात्मक आहे. ‘वेगळ्या क्षमता’ असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण ‘लर्निग’- म्हणजे ‘शिकणं’- या शब्दाची व्याप्ती खूप आहे; पण इथे हा फक्त ‘लेखन, वाचन, अंकगणित’ एवढय़ाचसाठी वापरला जातो. तरीही सध्या हाच शब्द वापरात असल्यामुळे तोच वापरावा लागत आहे.

या मुलांना वाचन, लेखन आणि गणित यात अक्षम ठरवलं, तरी या मुलांमध्ये उच्च दर्जाची सर्जनशीलता असते. जग ज्या पद्धतीने विचार करत नाही, अशा वेगळ्याच आणि अतिशय स्वतंत्र बुद्धीने ही मुलं विचार करू शकत असतात.

प्रत्येक मेंदूमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. मुलांमधल्या बुद्धिमत्ता शोधून त्यांना योग्य संधी दिली, तर मुलांना त्याचा अत्यंत फायदा होईल. ही मुलं कोणत्या विषयात, कलेत, खेळात, उच्च बौद्धिक क्षेत्रात सक्षम आहेत, हे प्राधान्याने शोधून काढायला हवं.

या संदर्भातली बहुतेक संशोधनं परदेशात झालेली असल्यामुळे आणि भारतात हा विषय अजून त्या तुलनेत नवीन असल्यामुळे भारतीय मुलांवर केलेलं संशोधन-  तेही मेंदूशास्त्रीयरीत्या-  होण्यास काही काळ जावा लागेल. कारण या विषयावरील संशोधन अजूनही चालू आहे.

या विषयावरचा एक आक्षेप म्हणजे- अध्ययन अक्षमता या शहरी भागातल्या मुलांना जास्त जाणवतात आणि ग्रामीण भागातल्या मुलांना मात्र त्या जाणवत नाहीत का? याचं उत्तर असं की, या विषयावर संशोधन करणाऱ्या किंवा या विषयावरचा विशेष अभ्यास असलेल्या संस्था या शहरी भागात जास्त आहेत आणि शहरी भागात त्यांचं काम जास्त आहे. परंतु ग्रामीण मुलांचा अभ्यास गेल्या काही वर्षांपासून होत आहे आणि तो होणं, त्यातून संशोधन आकाराला येणं अत्यंत गरजेचं आहे.  म्हणजे सर्वच मुलांना आपण अध्ययन सक्षम करू शकू!

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com