12 November 2019

News Flash

मूर्त ते अमूर्त

अनेक माणसांना गणित या विषयाची भीती वाटत असते.

अनेक माणसांना गणित या विषयाची भीती वाटत असते. याचं मुख्य कारण हे गणिताच्या आकडेमोडीत नाही. गणित ही अमूर्त संकल्पना आहे, इतर विषयांपेक्षा याचं व्याकरण थोडं वेगळं आहे हे समजून घ्यायला पाहिजे.

अंक ओळख, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व अमूर्त संकल्पना असतात. या सर्व गोष्टींची आकडेमोड मेंदूत करावी लागते. त्यानंतरच ती कागदावर किंवा कृतींमध्ये उतरते हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे गणित शिकवण्याची सुरुवात ही फळ्यावर किंवा वहीत न करता मूर्त संकल्पनांमधून करावी लागते. प्रत्यक्ष आकडे लिहायला वा वाचायला न देता, विविध वस्तू दाखवून त्यांच्यावरच्या क्रिया मुलांच्या पातळीवर जाऊन मजेदार पद्धतीने शिकवल्या गेल्या, आधी भरपूर वेळा साधनांच्या साहाय्याने, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांमधून गणित शिकवलं, तर मुलं हळूहळू अमूर्त संकल्पनांकडे जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोणतंही मूल गणितात मागे राहणार नाही. मात्र, संकल्पना स्पष्टीकरणासाठी जेवढा वेळ द्यायला हवा, तेवढा दिला जात नाही.

आकडेमोड करताना हातचा घेणं, बेरीज (+) आणि गुणाकाराच्या (७) चिन्हांमध्ये गोंधळ, डावीकडून उजवीकडे आकडेमोड करायची की उजवीकडून डावीकडे, संख्या आणि संख्यानामं स्पष्ट नसणं.. अशा प्राथमिक पायऱ्यांवर छोटय़ा अडचणी येऊ शकतात. त्या लगेच सोडवल्या गेल्या पाहिजेत.

काही वेळेला स्मरणक्षेत्रांमध्ये समस्या असेल, तर गुणाकार, भागाकाराच्या पायऱ्या लक्षात न राहणं, पदावलीचे नियम लक्षात न राहणं अशा अडचणी येतात. मोठय़ा वर्गामध्ये गणित अधिक गुंतागुंतीचं होत जातं. यात भर म्हणून ‘आपल्याला समजत नाही, येत नाही’ असा ताण मेंदूत निर्माण झाल्यामुळे ही समस्या केवळ गणिताची राहत नाही. ती भावनिक होते. परीक्षेत गुण न मिळाल्यामुळे पालकांचा राग, ओरडा व शिक्षाही पाठोपाठ येतात. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी अवघड होऊन बसते.

अशा प्रकारच्या चुका वारंवार आणि वरच्या वर्गात गेल्यावरही होत असतील, तर त्याला ‘डिसकॅल्क्युलिया’ वा ‘गणिताची अक्षमता’ असं नाव अभ्यासकांनी दिलेलं आहे. मुलांना शांतपणे, त्यांच्या कलाने, गतीने आणि पुरेसा वेळ देऊन शिकवलं, तर या समस्येचंही निराकरण होईल.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

First Published on July 8, 2019 12:04 am

Web Title: human brain mpg 94 3