साधारणत: १९५० नंतर ग्रेनाडा वसाहतीतील लोकांमध्ये राजकीय जागृती होऊन ब्रिटिश सरकारकडे स्वायत्ततेची मागणी जोर धरू लागली. कामगार संघटना आणि राजकीय पक्ष निर्माण झाले. ब्रिटिशांनी त्यावर प्रतिसाद म्हणून काही प्रमाणात अंतर्गत स्वायत्तता देण्याचे ठरवून १९५१ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. त्यात एरिक गेरी यांच्या पक्षाने अधिक जागा जिंकल्या. ब्रिटिशांनी ग्रेनाडाचा समावेश ‘वेस्ट इंडिज राष्ट्रसंघ’ या ब्रिटिश वसाहतीच्या संघात केला. पुढे या राष्ट्रसंघाचा अस्त झाल्यावर १९६७ साली ब्रिटिशांनी ग्रेनाडाला संपूर्ण अंतर्गत प्रशासकीय स्वायत्तता दिली. एरिक गेरी हे ग्रेनाडाचे १९६७ ते १९७४ या काळात विधीमंडळ प्रमुख राहिले. पुढे ७ फेब्रुवारी १९७४ रोजी ग्रेनाडाला ब्रिटिश वसाहतीतून मुक्त करून स्वातंत्र्य देण्यात आले. सार्वभौम ग्रेनाडाचे पहिले पंतप्रधान अर्थातच एरिक गेरी हेच झाले. हा नवजात देश राष्ट्रकुल परिषद म्हणजे कॉमनवेल्थ समूहाचा सदस्य बनून महाराणी एलिझाबेथ द्वितीय ही औपचारिक राष्ट्रप्रमुख बनली.

१९७९ साली मार्क्‍सवाद्यांच्या न्यू ज्युएल मूव्हमेंट या चळवळीने तत्कालीन सरकारविरोधात उठाव करून सरकार उलथवून टाकले आणि त्यांचा नेता मॉरिस बिशप हा ग्रेनाडाचा पंतप्रधान झाला. बिशपचे कम्युनिस्ट क्युबाचा नेता फिडेल कॅस्ट्रोशी मित्रत्वाचे संबंध होते. ग्रेनाडातल्या उठावात फिडेल कॅस्ट्रोचा हात असावा असा संशय आहे. उठावानंतर क्युबाचे सैन्यही ग्रेनाडाच्या राजधानी सेंट जॉर्जेसमध्ये तळ देऊन होते. पुढे पंतप्रधान बिशपविरोधी उठाव होऊन १९८३ मध्ये त्याचा खून झाला. ग्रेनाडात क्युबाच्या कम्युनिस्टांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन रोनाल्ड रिगन सरकार पुढे सरसावले. अमेरिकन फौजांनी ग्रेनाडातील क्युबाच्या लष्करावर हल्ले करून त्यांना देशाबाहेर काढले.

१९८४ मध्ये या बेटावर शांतता प्रस्थापित झाल्यावर संसदीय निवडणूक घेण्यात आली, त्यात विजयी झालेले हर्बर्ट ब्लेझ हे पंतप्रधानपदी नियुक्त झाले. १९८४ पासून ग्रेनाडात नियमितपणे निवडणुका होऊन लोकप्रतिनिधी शासन चालवीत आहेत. सत्तास्पर्धेत हिंसक पद्धतीने बळाचा वापर होत नाही आणि तेथे एकंदर राजकीय स्थैर्य नांदते आहे. नामधारी राष्ट्रप्रमुख असलेल्या महाराणी एलिझाबेथ हिचा प्रतिनिधी म्हणून ग्रेनाडाचे गव्हर्नर जनरल कामकाज पाहतात.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com