News Flash

मधुबाला (१)

मधुबालाचे मूळचे नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी. जन्म दिल्लीतला, १९३३ सालचा.

आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना मोहवणारी दिवंगत हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला ही पठाण संप्रदायातली होती. मधुबालाचा अभिनय, तिचे सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व या गुणांमुळे ती आजपर्यंतच्या हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री नायिकांपकी सर्वाधिक लोकप्रिय समजली जाते.

मधुबालाचे मूळचे नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी. जन्म दिल्लीतला, १९३३ सालचा. एका पश्तून मुस्लीम परिवारातला. मुमताज म्हणजेच मधुबाला हे अयातुल्लाह खान यांच्या अकरा अपत्यांपकी पाचवे. मधुबालाच्या जन्मानंतर एका ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तवले होते की, ही मुलगी मोठी झाल्यावर देश-विदेशात ख्यातनाम होईल, अगणित संपत्ती मिळवेल पण तिचे स्वत:चे जीवन मात्र दु:खमयच राहील. हे भविष्य ऐकल्यावर मधुबालाच्या वडिलांनी, अयातुल्लाह खानांनी सुखदायी जीवनाच्या शोधात मुंबई गाठली. मुंबईला आल्यावर खानांनी हरतऱ्हेचे कष्ट केले, त्यातच त्यांच्या तीन मुली आणि दोन मुले आजारपणांनी मृत्युमुखी पडली. गोदीत झालेल्या स्फोटामुळे नंतर लागलेल्या आगीने त्यांचे छोटे घर आणि सामान जळून खाक झाले. घरातले सर्व जण बाहेर असल्यामुळे बचावले.

घर उद्ध्वस्त झालेले, काही काम धंदा नाही अशा परिस्थितीत अयातुल्लाह खानांनी आपली आठ वर्षांची मुलगी मुमताजला (मधुबाला) बरोबर घेऊन तिला बालकलाकार म्हणून काम मिळावे म्हणून चित्रपट निर्मात्यांकडे खेटे घातले. त्यात यश मिळून मुमताजला पहिला चित्रपट मिळाला तो ‘बसंत’ (१९४२). यामध्ये तिने प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज शांतीच्या मुलीची भूमिका केली. पुढे पाच वष्रे मुमताजने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या वडिलांचे घर चालवले. या काळात तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणीने मुमताजचे नाव चित्रपट उद्योगासाठी बदलून ‘मधुबाला’ केले. तिला पहिली महत्त्वाची भूमिका मिळाली ती किदार शर्माच्या ‘नीलकमल’ (१९४७) मध्ये राज कपूर बरोबर. त्या वेळी मधुबाला होती १४ वर्षांची. ‘महल’ (१९४९) हा तिचा गाजलेला पहिला चित्रपट. ‘महल’मुळे जशी मधुबाला एकदम प्रकाशझोतात आली तसेच त्यातल्या ‘आयेगा आने वाला’ या गाण्याने लता मंगेशकरनाही प्रसिद्धी मिळाली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:07 am

Web Title: indian film actress madhubala
Next Stories
1 स्ट्रॉन्शिअम
2 कुतूहल : रुबिडिअम
3 जे आले ते रमले.. : सलीम दुराणी
Just Now!
X