वॉटर्लूतील लढाईत नेपोलियनची धूळधाण झाल्यावर त्याचे सैनिक, सेनाधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी बेकार होऊन नोकऱ्या शोधत फिरत होते. त्यापैकी जीन व्हेंचुरा आणि अलार्ड हे लाहोरच्या महाराजा रणजीतसिंग यांच्याकडे नोकरीस लागले. या दोघांचा चांगला अनुभव आल्यावर महाराजांनी अनेक युरोपियन आणि अमेरिकन लोकांना आपल्या दरबारात उच्च पदस्थ नोकऱ्या दिल्या. महाराजांकडील परदेशी कर्मचाऱ्यांमध्ये गार्डन खान या नावाने प्रसिद्ध असलेला अलेक्झांडर गार्डनर हा एक स्कॉटिश-अमेरिकन माणूस होता. एक अवलिया म्हणून प्रसिद्ध असलेला या भटक्या प्रवाशाने लाहोरात प्रथम एक भाडोत्री सैनिक म्हणून व पुढे महाराजांच्या फौज-ए-खासमध्ये सेनाधिकारी म्हणून नोकरी केली आणि नंतर श्रीनगरमध्ये दुकान थाटून तिथेच स्थायिक झाला.

अलेक्झांडरच्या बेछूट आयुष्याबद्दल स्कॉटिश इतिहास लेखक जॉन की याच्या ‘द टार्टन टर्बन-इन सर्च ऑफ अ‍ॅलेक्झांडर गार्डनर’ या पुस्तकात बराच उल्लेख आहे. स्कॉटिश वडील आणि स्पॅनिश आई असलेल्या अलेक्झांडरचा जन्म १७८५ साली अमेरिकेत झाला. त्याचे वडील जॉर्ज वॉशिंग्टनचे परिचित आणि वैद्यकीय व्यवसाय करणारे. जॉर्ज वॉशिंग्टनच्या आग्रहामुळे अमेरिकेत ते सहकुटुंब स्थायिक झाले. पुढे अमेरिकन क्रांती काळात ते अमेरिकेच्या बाजूने ब्रिटिश विरोधात लढले. वडिलांच्या मृत्यूनंतर काही वर्षे आर्यलड आणि स्कॉटलंडमध्ये नोकरी केल्यावर एका जागी स्थिर राहण्याचा स्वभाव नसलेल्या अलेक्झांडरने थेट दक्षिण रशियात अस्ट्राखान इथं स्थानांतर केलं. अस्ट्राखान या गावात त्याचा भाऊ नोकरी करीत होता. भावाच्या मृत्यूनंतर रशियन लष्करात त्याच्या जागी आपल्याला नोकरी मिळावी म्हणून केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही म्हणून, गार्डनर १३ वर्षे मध्य आशियातल्या अनेक देशांत भटकत राहिला. असाच भटकताना १८२३ साली अफगाणिस्तानच्या सीमेजवळ अफगाण सुलतान दोस्त मुहम्मद खानाचा पुतण्या हबीबुल्ला खान याने काही संशयावरून अलेक्झांडरला अटक करून तुरुंगात टाकले. हबीब हा त्याच्या सुलतान चुलत्याशी काबूलच्या गादीसाठी झगडत होता. त्याला हा अटकेतला अलेक्झांडर उपयोगाचा वाटून त्याच्याकडे १८० चे घोडदळ देऊन त्याने त्याच्यावर ही कामगिरी सोपवली.

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com