अणुयुगाची सुरुवात आणि दुसऱ्या महायुद्धाचा अंत झाला तो अण्वस्त्राच्या प्रयोगाने! दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमावर केलेला बॉम्बहल्ला युरेनिअम-२३५च्या अनियंत्रित शृंखला-अभिक्रियेचा भयानक परिणाम होता. ६ ऑगस्ट १९४५ हा मानवी संस्कृतीच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. मानवाच्या बुद्धीने एक मोठी शोककथा निर्माण केली. ६४ किलो शुद्ध ‘युरेनिअम-२३५’ असलेल्या अणुबॉम्बमधील फक्त १.६ किलो इतक्या युरेनिअममध्ये झालेल्या विखंडनामुळे अणुबॉम्बचा स्फोट झाला आणि हिरोशिमा शहराचा सात कि.मी.चा परीघ पूर्ण बेचिराख झाला. हजारो मृत्युमुखी पडले, नंतरच्या किरणोत्साराने ही संख्या लाखांत गेली. त्यानंतर कित्येक वर्षे युरेनिअमच्या किरणोत्साराचा परिणाम होत राहिला आणि त्याच्या वेदना हिरोशिमाच्या नागरिकांना सहन कराव्या लागल्या. अणुऊर्जेच्या वापरावर विचार करायला लावणारी ही घटना होती. अखेर अणूच्या विधायक उपयोगाला सुरुवात झाली. जून १९५४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या (रशियाच्या) शास्त्रज्ञांनी जगातील पहिले; ५००० किलोवॅट उत्पादन क्षमतेचे अणुऊर्जा केंद्र उभारले. युरेनिअमच्या अणूंपासून निर्माण झालेली वीज विद्युत-तारांमधून वाहू लागली. त्यानंतर अणुबॉम्बसारख्या विध्वंसक कार्याऐवजी शांततामय कार्यासाठी अणुऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात झाली.

१९५७ मध्ये अणुशक्तीवर चालणारे पहिले बर्फभंजक ‘लेनिन’ हे जहाज रशियाच्या बंदरातून उत्तर ध्रुवाच्या प्रवासासाठी बाहेर पडले. १९७४ मध्ये ‘लेनिन’पेक्षा अधिक शक्तिमान (७५,००० अश्वशक्तीचे) ‘आक्र्टिक’ हे अणुऊर्जेवर चालणारे जहाज प्रवासाला निघाले. तीन वर्षांनंतर १७ ऑगस्ट १९७७ मध्ये आक्र्टिक समुद्रातील अगम्य ठरलेला मध्यवर्ती हिमस्तर पार करून हे जहाज उत्तर ध्रुव बिंदूपर्यंत पोहोचले. अणुइंधनाचा लहानसा गोळा हजारो टन तेल-कोळशाची जागा घेतो. युरेनिअमची ऊर्जा उत्सर्जित करण्याची क्षमता प्रचंड आहे. फक्त ४५० ग्रॅम युरेनिअम हे १४ लक्ष किलो कोळसा जाळून मिळणारी ऊर्जा निर्माण करते.

आधुनिक काळात अणुऊर्जेसाठी युरेनिअमचा प्रामुख्याने वापर केला जातो. जगात दरवर्षी ४१,००० टन इतके युरेनिअमचे उत्पादन होते. अणुऊर्जेसाठी ‘जाळून’ उरलेल्या युरेनिअमपासून रणगाडे आणि सन्याच्या इतर गाडय़ांसाठी चिलखती आवरणे बनविली जातात. नुकत्याच झालेल्या संशोधनात युरेनिअम ऑक्साइड हे उत्तम अर्धवाहक असल्याचे लक्षात आले आहे. याचा उपयोग भविष्यात सौरऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘सोलार सेल’मध्ये (सौर घटामध्ये) होऊ शकतो.

योगेश सोमण

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org