सुनीत पोतनीस

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले मराठी संतवाङ्मयाचे लेखक म्हणून ज्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते, ते जस्टिन अ‍ॅबट हे मूळचे अमेरिकन. ख्रिस्ती मिशनरी म्हणून अहमदनगर येथे आलेले जस्टिन यांच्यावर मराठी संतवाङ्मयाचा मोठा प्रभाव पडला. संतांची चरित्रे, त्यांचे साहित्य यांचा अभ्यास केल्यावर जस्टिन यांनी अहमदनगर येथील ३० वर्षांच्या वास्तव्यात बहुतेक सर्व मराठी संतांची निवासस्थाने आणि त्यांच्या परिसरात जाऊन काही काळ मुक्काम केला. रामदास स्वामी जेथे जेथे िहडले तो परिसर जस्टिननी भ्रमण केला.

मराठी संतांची वचने, शिकवण आणि साहित्य पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांना अज्ञात होते. त्यांना हे साहित्य समजावे म्हणून जस्टिन यांनी या संतांची चरित्रे आणि साहित्य इंग्रजीत लिहून आणि काहींचे अनुवाद करून त्याची पुस्तके प्रकाशित केली. संतवाङ्मयाचा सखोल अभ्यास करून जस्टिन अ‍ॅबट यांनी ‘महाराष्ट्र-कवि-संतमाला’ (पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र) या मालिकेतून एकंदर ११ पुस्तके लिहिली. या कामात त्यांना मॅक-निकल, एडवर्डस् या सहकाऱ्यांची मदत झाली.

जस्टिन यांच्या साहित्यसंपदेत ‘तुकाराम’, ‘रामदास’ ही पुस्तके आहेत, ‘संतविजय’च्या त्यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतराच्या आठ आवृत्त्या निघाल्या, महीपतीकृत ‘भक्तिविजय’चे भाषांतर- ‘स्टोरीज ऑफ इंडियन सेंट्स’ (सहलेखक : एन. आर. गोडबोले) या ५०७ पानी इंग्रजी पुस्तकाच्या २०१४ पर्यंत ३८ आवृत्त्या निघाल्या! त्याचप्रमाणे संत कवयित्री बहिणाबाईंचे चरित्र आणि अभंग यांचे इंग्रजी भाषांतर याही पुस्तकाच्या १३ आवृत्त्या निघाल्या. जस्टिन यांच्या संतवाङ्मयाशी संबंधित मालिकेतील ‘भानुदास’, ‘एकनाथ’, ‘स्तोत्रमाला’, ‘भिक्षुगीत’, ‘दासोपंत दिगंबर’, ‘नेक्टर फ्रॉम इंडियन सेंट्स’ वगैरे पुस्तकांच्याही अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या हे विशेष. जस्टिन यांच्या या संतवाङ्मय संपदेतील काही पुस्तके ते पूर्ण करू शकले नाहीत ती त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केली. उतारवयात अ‍ॅबट अमेरिकेत न्यू जर्सी येथे जाऊन स्थायिक झाले. तिथेच ते १९३२ साली निधन पावले. जस्टिन यांना संतसाहित्याने अशी काही भुरळ घातली होती की मृत्यूपर्यंत संतवाङ्मयाचा त्यांचा अभ्यास चालूच होता.

sunitpotnis@rediffmail.com