सरला बहन याच नावाने अधिक ओळखल्या गेलेल्या कॅथेरिन बहुधा पुढे स्वत:चे मूळचे कॅथेरिन हे नाव विसरल्या असाव्यात! कॅथेरिन या एक ब्रिटिश, गांधीवादी सामाजिक कृतिशील कार्यकर्त्यां. उत्तराखंडातील कुमाऊं प्रदेशात चाललेल्या जंगलतोडीला विरोध करतानाच, पर्यावरण संवर्धनासाठी जनमत तयार करून कॅथेरिन यांनी चिपको आंदोलन ही पर्यावरणवादी चळवळ उभी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

कॅथेरिन मेरी हेलमन या जन्माने ब्रिटिश. पश्चिम लंडनमधील शेपर्डस बुश या भागात १९०१ मध्ये जन्मलेल्या कॅथरिनचे वडील मूळचे जर्मन-स्विस, तर आई ब्रिटिश. वडील जर्मन वंशाचे असल्यामुळे पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांना ब्रिटिश सरकारने स्थानबद्ध करून ठेवले होते, कॅथेरिन आणि तिच्या आईवर इतरांनी बहिष्कार टाकला होता. तसेच कॅथेरिनला शाळा-कॉलेजात शिष्यवृत्ती नाकारण्यात आल्याने तिला शिक्षण सोडावे लागले. तिने घर आणि परिवार सोडून वर्षभर एका ठिकाणी कारकुनी केली. या काळात, १९२०च्या दशकात तिची ओळख लंडनमधील काही भारतीय विद्यार्थ्यांशी झाली. या विद्यार्थ्यांनी तिला महात्मा गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची माहिती दिली. गांधींचे तत्त्वज्ञान, त्यांचे कार्य आणि ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्यासाठी भारतीयांचे चाललेले आंदोलन हे सर्व ऐकून प्रभावित झालेल्या कॅथेरिनच्या मनात सतत भारत, महात्मा गांधी हे विषय िपगा घालू लागले. लंडनमधील आपले काम, आपले आई-वडील आणि सर्व पाश तोडून भारतात जाण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला. त्यांच्या ओळखीच्या एका भारतीय विद्यार्थ्यांने खटपट करून उदयपूर येथे एका शाळेत तात्पुरती नोकरी मिळवून दिल्यावर, जानेवारी १९३२ मध्ये कॅथेरिन हेलमननी भारतात जाण्यासाठी इंग्लंड, आपला मायदेश सोडला, तो कायमचाच, कधीही न परतण्यासाठीच! भारतात आल्यावर त्यांनी वर्षभर उदयपूरच्या एका शाळेत नोकरी केली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com