05 March 2021

News Flash

कुतूहल -संकवके (मायकोरायझा)

कवक म्हणजे बुरशी. बुरशी हा शब्द आपण वाईट अर्थाने वापरतो. तसे पाहिले तर वनस्पतींना होणारे रोग कवकांमुळेच होतात; परंतु वनस्पतींना उपकारक आणि सहजीवी अशीही कवके

| April 20, 2013 12:01 pm

कवक म्हणजे बुरशी. बुरशी हा शब्द आपण वाईट अर्थाने वापरतो. तसे पाहिले तर वनस्पतींना होणारे रोग कवकांमुळेच होतात; परंतु वनस्पतींना उपकारक आणि सहजीवी अशीही कवके आहेत. या कवकांना संकवके (मायकोरायझा) म्हणतात. मायकोरायझा हा शब्द प्रथम ए. बी. फ्रँक या जर्मन रोगवैज्ञानिकाने वापरला (१८८५). याचा शब्दश: अर्थ कवकमूळ असा होतो. हा शब्द त्याने झाडाच्या मुळाशी कवकाचा असलेला संबंध दाखविण्यासाठी वापरला.
संकवकाच्या कवकजालाचे यजमानवृक्षाच्या मुळ्यांच्या बाह्य़ त्वचेवर आवरण येते. ते मातीतील रोगकारकांना आणि काही सूत्रकृमींना आत येऊ देत नाही. यजमानवृक्षांच्या मुळातील पेशी आणि संकवकाच्या कवकजालातील पेशी यांत झालेल्या संसर्गामुळे मध्यत्वचेच्या पेशींभोवती कवकजालाचे जाळे झालेले असते. या जाळ्यामधून कवके आणि यजमानपेशी यांच्यात पोषकांचा विनिमय होतो. बहुतेक बाह्य संकवके संश्लेषित माध्यमात वाढविता येतात. या संकवकाचे संवर्धन मोठय़ा प्रमाणात करता येते व ते शेतांमधून किंवा रोपवाटिकांतून जैवखत म्हणून वापरता येते.
संकवकामुळे यजमानवृक्षांना बरेच फायदे मिळतात. शेतातील पिके, फळबागा आणि जंगलातील झाडे यांना संकवकामुळे बरेच फायदे होतात. बहुशाखीय संकवकाचे मुळ्यांच्या बाहेरील कवकजाल मर्यादित असले तरी त्याचा शाखाविस्तार जास्त होत राहिल्याने झाडाला माती जास्त उपलब्ध होते. त्यामुळे मुळ्यांना जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाणी शोषण्यासाठी जास्त पृष्ठभाग उपलब्ध होतो आणि ही प्रक्रिया चालूच राहते. त्यामुळे पोषके आणि पाणी यांचे जास्त शोषण होऊन झाडांची चांगली वाढ होते.
संकवकामुळे झाडांना मुख्यत: फॉस्फरस, जस्त, तांबे इत्यादी उपलब्ध होतात, मुळ्यांचे पाणी आणि जमिनीतील अन्नद्रव्ये यांचे संवहन संतुलन नळीने जोडलेल्या पाण्याच्या दोन टाक्यांतील पाण्याच्या होणाऱ्या संतुलनाप्रमाणे होते, झाडांची दुष्काळाला तोंड देण्याची क्षमता वाढते, तसेच जमिनीतील विखारांनाही झाडे तोंड देतात. संकवके मातीतून होणाऱ्या रोगकारकांचे नियंत्रक म्हणूनही काम करतात. मुळ्यांवर तयार झालेल्या बहुशाखीय संकवकांच्या वसाहतींमुळे कायटिननाशक कार्य सुरू राहते. या कवकांच्या जास्त झालेल्या समूहनामुळे चिकट माती सच्छिद्र होते आणि त्यामुळे जलभेद्यता वाढते. संकवके नसलेल्या भागात असे होत नाही.

जे देखे रवी..  – अखनूर
१९६५ साली भारत-पाक युद्ध झाले. अयुब खान या पाकिस्तानच्या लष्करी हुकूमशहाने भारतात म्हणजे काश्मीरमध्ये टोळ्या घुसवल्या. त्यांनी काश्मीरमध्ये अस्वस्थता निर्माण करायची आणि मग लष्कराने घुसून बाजी मारायची अशी कल्पना होती, पण ती उधळली गेली. असे म्हणतात की हे युद्ध बरोबरीत सुटले. त्यानंतर निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना वैद्यकीय मदत करण्यासाठी मुंबईच्या शुश्रूषा रुग्णालयाचे संस्थापक वसंत रणदिवे यांनी दोन तुकडय़ा तयार केल्या होत्या. त्यातल्या दुसऱ्या तुकडीत मी होतो. पहिल्यांदा उधमपूरला गेलो आणि मग लष्कराच्या गाडय़ांमधून पुढे गेलो. कुठे चाललो आहोत याबद्दल अळीमिळी गुपचिळी होती. जवळ अखनूर नावाचे गाव आहे एवढेच कळले. पण जम्मूतावी नदीपासून जवळ एका छावणीत एका अध्र्या कच्च्या घरात मला ठेवले होते एवढे आठवते.
सकाळ-संध्याकाळ रुग्ण तपासणी आणि औषध वाटप असे. लोक हवालदिल होते. आकाशात वेगवान विमानांच्या फेऱ्या चालत. रात्री मरणाची थंडी असे. कोळशाची शेगडी पेटवून माझा नोकर घरी जात असे. एका रात्री दार वाजले. बाहेर घोंगडय़ा गुंडाळलेले चार-पाच लोक हातात कंदील घेऊन उभे होते. मला म्हणाले, एका घळीत एक माणूस मरून पडला आहे, त्याचा मृत्यू झाला आहे, असे प्रमाणपत्र द्या. मी गेलो. माणूस मरून बराच वेळ झाला होता. मी प्रमाणपत्र दिले. आणि खोलीवर आलो.
दुसऱ्या दिवशी माझा स्वैंपाकी आला आणि म्हणाला ‘हे लोक सैतान आहेत. कोणी मेला तर सरकार अंत्यविधीसाठी पैसे देते. या पैशासाठी यांच्या नातेवाईकांनी याला घळीत ढकलला. नाहीतरी हा मतिमंदच होता. पैसे मिळवण्यासाठी काही रकमेची लाचही द्यावी लागेल. युद्धात तर कितीतरी गेले. तरुण आणि सशक्त होते. हल्लीहल्लीच दोन म्हाताऱ्या मेल्या. मला त्याबद्दल संशय आहे. युद्धात गावे तुटतात आणि सैतानी सुरू होते. आम्ही आमच्या गावाला परत कधी जाणार देव जाणे. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका.’
लवकरच माझी बदली झाली. तिथला अनुभव आणखीनच विचित्र  होता.
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – चिखल्या
या रोगाने स्त्री-पुरुष जास्त करून महिला वर्ग हैराण असतो. पाण्यात सतत काम, त्यानंतर पाय नीट न पुसणे, पायांच्या बोटांतील अंतर कमी असणे, खाण्यापिण्यांत मिठाचे प्रमाण जास्त असणे इ. कारणांनी चिखल्या होतात. एकदा मी दिल्ली येथे सहकुटुंब राहत होतो. ‘सौ’ चिखल्याच्या त्रासाने हैराण झाली होती. तिला पाण्यांत काम करणे अशक्य झाले होते. एक उपचार लक्षात होता. रात्रौ झोपताना किंचित मीठ गोडे तेलात विरघळवून सौंच्या बोटांच्या बेचक्यात घासून लावले. झोपण्यापूर्वी पाय अर्धातास हुळहुळत होता. पण सकाळी चिखल्या खडखडीत बऱ्या झाल्या.
तसे पाहिले तर चिखल हा क्षुद्र विकार आहे. या विकारांत पायाच्या बोटांच्या बेचक्यांतील त्वचा कापसासारखी पांढरी होते. तळपायावर बोटांसभोवतालची त्वचा हुळहुळीत होते. रुग्णाला तीव्र वेदना होतात, सुचेनासे होते. चिखल्या पायाच्या भेगातच आहेत, का तळपायाला झाल्या आहेत याची परीक्षा करावी. संपूर्ण तळपायाला त्रास झाला असेल तर जळवात, सोरायसीस, इसब, क्षुद्र कुष्ठविकार संभवतात. चिखल्यांचा विशिष्ट वैज्ञानिकांनी अभ्यास केला. त्यांना या विकारांत अत्यंत ‘सूक्ष्म, सूक्ष्म’ कृमी आढळले. या कृमींना मीठ खलास करते. पण नुसते मीठ बोटांच्या बेचक्यांत चोळले तर खूप झोंबणार. म्हणून कणभर तेलाची मदत घ्यावी.
चिखल्या खूपच वाढल्या असल्यास शतधौत धृत किंवा एलादि तेल बाह्य़ोपचारार्थ लावावे. संगजिरे पूड लावावी. वारंवार हा त्रास होत असल्यास करंजेल तेलयुक्त कंडू मलम लावावे. लिंबोणी तेलही उपयोगी पडते. स्थूल व कफप्रधान व्यक्तींनी आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ अशा गोळ्या सुंठ चूर्णाबरोबर घ्याव्या. पित्तप्रधान व्यक्तींनी चिखल्यांमुळे आग होत असल्यास प्रवाळ, कामदुधा, लघु सूतशेखर अशा गोळ्या तारतम्याने घ्याव्या. केळी, शिकरण, लोणची, पापड, हॉटेलमधील शिळे अन्न टाळावे. मांसाहार करू नये. मिठाचे प्रमाण कमी करावे. तळपाय सतत करोडा राहील याची काळजी घ्यावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २० एप्रिल
१८९६ > शंकर वामन दांडेकर (सोनोपंत दांडेकर) यांचा जन्म. ते संतसाहित्य व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, वारकरी संप्रदायाचे इतिहासकार, ज्ञानेश्वरी तसेच नामदेव गाथेची उत्कृष्ट संपादने (सरकारी प्रत) करण्याखेरीज ‘ज्ञानदेव व प्लेटो’, ‘अध्यात्मशास्त्राची मूलतत्त्वे’, ‘ईश्वरवाद’ यांसारख्या ग्रंथांतून आजची तत्त्वचर्चा घडवून आणणारे लेखक  ‘प्रसाद’ मासिकाचे संपादक, पुण्याच्या स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रवचनकार अशा विविध भूमिका निभावणाऱ्या सोनोपंतांबद्दल वारकऱ्यांना विशेष ममत्त्व वाटे.
१९९९> ‘रुचिरा’ या पाककृतीविषयक पुस्तकामुळे तमाम ‘नव्या सुनांची आई’ ठरलेल्या कमलाबाई ओगले यांचे निधन. १९७० सालचे हे पुस्तक या विषयावरील सर्वाधिक खपाचे ठरले होते.
२००८ > लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासक सरोजिनी बाबर यांचे निधन. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे त्यांनी लोकसाहित्याच्या ३० खंडांचे संपादन केले. लोकधाटी, ग्रामजीवन, आदिवासी जीवन आणि स्त्रीजीवन या साऱ्यांचे प्रेमळ कुतूहल जपणाऱ्या सरोजिनीबाईंनी दोन कादंबऱ्या आणि काही कथासंग्रहदेखील लिहिले आणि अनेक ललित लेखांतून शहरी समाजाला महाराष्ट्राच्या मुळांचे भान दिले.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2013 12:01 pm

Web Title: khuthul mikoryza
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल – आपला आहार आरोग्यदायी आहे का?
2 कुतूहल : शेतीसाठी उपयुक्त कीटक परागीभवन (उत्तरार्ध)
3 कुतूहल : शेतीसाठी उपयुक्त कीटक परागीभवन (पूर्वार्ध)
Just Now!
X