इ.स. १३८८ ते इ.स. १८९७ या काळात कोरियावर चोसेन या घराण्याची सत्ता होती. १८९४ मध्ये झालेल्या पहिल्या चीन-जपान युद्धात चीनचा पराभव होऊन चीनने कोरियावरचे आपले वर्चस्व हळूहळू कमी करून कोरियाला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. १८९५ ते १९०५ या काळात जपानी साम्राज्याने चीन आणि रशियाचा युद्धात पराभव करून त्या प्रदेशात वर्चस्व स्थापित केले, आणि कोरिया हा जपानचा संरक्षित देश बनला. पुढे १९१० साली जपानने कोरियन राजवट खालसा करून संपूर्ण कोरियावर आपला अंमल बसविला. याने कोरिया पूर्णपणे जपानचा अंकित बनला. इथून पुढची ३५ वर्षे कोरिया हा जपानची एक वसाहत बनून पूर्णपणे पारतंत्र्यात गेला.
जपानचे कोरियावरचे शासन अत्यंत दडपशाहीचे आणि क्रूरतेचे होते. ३५ वर्षांच्या या काळात जपानी अधिकाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने कोरियन स्वातंत्र्यप्रेमी आणि जपानच्या राजवटीला विरोध करणाऱ्या नागरिकांची कत्तल केली. एवढय़ावरच न थांबता, जपानी उच्चाधिकाऱ्यांनी कोरियाच्या मूळच्या संस्कृतीचे जपानीकरण करण्याचा प्रयत्न केला. कोरियातल्या प्रचलित कोरियन भाषेऐवजी लोकांनी जपानी भाषा बोलावी म्हणून प्रयत्न केले गेले, गावांच्या आणि माणसांच्या नावांचेही जपानीकरण करण्याचा प्रयत्न झाला. कोरियन जनतेची मूळची सांस्कृतिक ओळख बदलून त्यांच्या जीवनशैलीचे जपानीकरण करण्याचे प्रयत्न झाले. परंतु कोरियन स्वातंत्र्यप्रेमी नेत्यांनी तसे होऊ दिले नाही. असे असले तरी, उत्तर कोरियात कोळसा आणि जलविद्युतशक्ती विपुल प्रमाणात असलेल्या प्रदेशात जपानी राजवटीने पोलाद, सिमेंट आणि रसायन उद्योग सुरू केले. पुढे दक्षिण कोरियाने औद्योगिक क्षेत्रात केलेल्या प्रचंड प्रगतीचा पाया हा जपानी राजवटीनेच घातला, असे म्हणता येईल.
जपानी राजवटीच्या अमलातून आपली सुटका व्हावी म्हणून कोरियातील विविध गटांकडून आंदोलने चालू होती. अधूनमधून त्याचे उद्रेक होत होते. कोरियन जनतेच्या स्वातंत्र्यलढय़ाला अनपेक्षितरीत्या कलाटणी मिळाली ती जपानच्या दुसऱ्या महायुद्धात झालेल्या पराभवामुळे. पराभूत जपानने २ सप्टेंबर १९४५ रोजी जेत्या दोस्तराष्ट्रांपुढे शरणागती पत्करली आणि कोरियाचे भवितव्य जपानकडून दोस्तराष्ट्रांच्या हातात गेले!
– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com