प्राणिसंग्रहालयात प्राणी असतात, त्यांची देखभाल करणारे लोक असतात आणि प्राण्यांना पाहण्यासाठी येणारे लोक असतात. पकी प्राणी हा त्यातील सगळय़ात महत्त्वाचा घटक असतो. प्रत्येक प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापकाची इच्छा असते की भारतभरचे सगळे प्राणी त्यांच्या प्राणिसंग्रहालयात असावेत. असावेत ही इच्छा ठीक आहे, पण भारताच्या वेगवेगळय़ा राज्यातील हवामान वेगवेगळे असते आणि त्या त्या राज्याच्या हवामानात राहणारे व त्याच्याशी जुळवून घेणारे प्राणी मुंबईसारख्या वर्षभर उष्ण व दमट हवामानाच्या भागात आरोग्यपूर्ण राहणे हे जरा अवघडच असते. त्यामुळे अशा प्राण्यांची निगा नीट राखणे ही तारेवरची कसरत असते. उदा थंड हवेतील जनावरे गरम हवामानात आली तर वातावरणात उष्णता वाढताच त्यांच्यावर पाणी फवारत राहण्यासारखे उपाय करावे लागतात. प्राण्यांना वातानुकूलनात ठेवण्याएवढी पशाची सुबत्ता अजून भारताच्या कोणत्याही राज्यात आणि त्यांच्या प्राणिसंग्रहालयात आली नाही.    प्रत्येक प्राण्याच्या खाण्याच्या काही सवयी असतात, त्या जर प्रशासनाने सांभाळल्या तर ते प्राणी अधिक चांगल्या परिस्थितीत राहू शकतील, त्यांची तब्येत ठीक राहील. हीही एक सर्कस असते. पंक्तीत सगळय़ांना एकाच प्रकारचे जेवण वाढणे सोपे असते, पण प्राणिसंग्रहालयात प्रत्येक प्राण्याच्या सवयीप्रमाणे त्या खायला देणे हे अवघड काम असते, पण ते करावे लागते. शिवाय प्राणिसंग्रहालयाला भेट देणारे लोक कोणतीही वस्तू प्राण्यांना खाऊ घालतात. त्यामुळे त्या प्राण्यांच्या तब्येती बिघडतात. कॅनडात जेथे प्राणी उघडय़ावर फिरतात तेथे जागोजागी पाटय़ा लावल्या आहेत, की प्राण्यांना त्यांचेच अन्न खाऊ द्यात, तुम्ही त्यांच्या सवयी बिघडवू नका.
पिसाळलेल्या प्राण्यांना ताब्यात आणणे अवघड असते. त्यांना शिक्षा न करता शांत करणे फार महत्त्वाचे असते. शिक्षा केल्याने प्राण्यांना जखमा होतात व ती अधिक पिसाळली जाण्याची शक्यता असते. अशा वेळी प्राणी िपजऱ्याला धडका देऊन स्वत: अधिक जखमी होऊ शकतात किंवा िपजरा तुटला तर प्रेक्षकांना किंवा देखभाल करणाऱ्यांना धोका पोहोचू शकतो.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,
 मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. : प्यारसे चलाओ, अपना खयाल रखो
बोले तो, आपनको ये लास लेसन है. मतलब जो कुछ डरायविंग में बोलने का था, सब बोलेला. अब, आब सिरफ अच्चा गाडी चलाव, आपन को कभी याद करना.. अन्वर(सर्जू का छोटा भाय, वोईच, कटिंग चायवाला)च्या गाडीवर कटिंग चाय मारताना सरजू म्हणाला. त्याला वाटलं की नाही, पण मलाच जरा ‘सेंटी’ वाटलं. मी कटिंग चायचा ‘गिल्लास’ उंचावून त्याच्या बोलण्याला दाद दिली.
वर्षभर ‘सरजू’ मला त्याचे डरायविंग लेसन देत होता. मला त्याच्या बरोबर स्पिरिच्युअल वाटायचं. सरजू, स्वत: गाडी चालवायचा तेव्हा मेडिटेशन करणाऱ्या साधकासारखा दिसायचा.
डायवर को है ना गुस्सा थुंकना मंगताय. गुस्से का कुछ कामच नही – एक तो गुस्सेवाला डायवर ज्यादा चिल्लाता है और हॉरन भी जोर से बजाताय. घर में जा के बीबी बच्चे के उप्पर गुस्सा निकालताय. ठंडे दिमाग से गाडी चलाव ना. बाकी दुनिया का डायवर लोग ० है, इस के कारन अपना हालत काय को खराब करने का? खालीपिली? असं म्हणून तो पचकन थुंकला. आणि मनापासून गाडी चालवू लागला.
‘खरंय रे सर्जू,’ मी मनात म्हटलं.
शायद आप को अपना लेसन खतम हो रहेला है इसका कुछ दुख लग रहा है, आपकी ऑखो से मालूम पडा. होताय, ऐसाईच होताय. लेकिन सर गाडी चलाने के टाइम अपना ध्यान सिरफ चलानेपे होना चाहिए. अपना हाथ इस्टिअरिंग व्हील के उप्पर एकदम पक्का होना चाहिए. पूरी कंट्रोल रख के गाडी चलाने का. जो डायवर लोग सोता है और गुस्सा करता है ना उसका ही आक्षिडेण होताय.. मी हात जोडून नमस्कार केला. ‘सर्जू, तुझं म्हणणं शंभर टक्के खरंय. गाडी चालवणं म्हणजे आपण स्वीकारलेलं काम आणि कर्तव्य. ते पार पाडताना झोपायचं नाही म्हणजे बेसावध राहायचं नाही आणि रडायचं नाही म्हणजे भावनिक होऊन आपली ड्रायविंगवरची किंवा जगण्यावरची पकड ढिली करायची नाही.’
सर्जूनं माझ्याकडे प्रेमानं पाहिलं. शिकलेल्या माणसांची त्याला किंचित दया यायची. जगण्याचा रसरशीतपणा हरवलेली माणसं म्हणून तो सुशिक्षितांकडे पाहायचा.
सरजू, काही आखरी संदेश?
‘हा सर, आप अच्छा गाडी चलाते है. आप का गाडी के उपर अच्छा कंट्रोल है, (म्हणजे, तुला चांगलं हिंदी बोलता येतं तर!) एक चीज सर हमेशा ध्यान में रखो. अपना हात इस्टिअरिंग पे पक्का, नजर रास्ते के उपर रखो, बीचबीचमे मिरर में देखो और. और ये ढय़ॅश बोरड है ना (डॅश बोर्ड) उसमे इस्पीडोमीटर, फेट्रोल का डायल होता है उस को बीचबीच में देखा करो. मतलब आप को रास्ता मालूम है, गाडी अच्छी जा रही है, आप अपने पसंत के गाने सुन रहे है, आप गाडी चलाना एकदम मस्ती में एन्जाय कर रहे है, फिर भी बारबार गाडी का कंडिशन देखना जरूर है, गाडी का हालत कैसा है, इस का खयाल रखना जरुरी है, गाडी अच्छी कंडिशन में होगी फिर भी देखते जाओ. प्यार से और कुछ नही. सर्जूनं कडक शेकहँड केला, मी त्याला कडकडीत सलाम ठोकला.
मित्रा, सर्जू किती छान बोलला ना, सदैव ‘अवेअर’ राहा. जागा राहा, जागृत राहा. सगळं ठीक चालत असलं तरी ते तसंच चालेल असं गृहीत धरू नकोस. प्रेमानं जग, मस्तीत जग, पण सावधान राहा. मी डोळ्यात धूळ उडल्याचं भासवून डोळे पुसून सर्जूला ‘बाय बाय’ म्हटलं.
डॉ. राजेंद्र बर्वे  –  drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. : २५ डिसेंबर
१६४२ गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्तामुळे अजरामर झालेले  ब्रिटिश शास्त्रज्ञ सर आयझ्ॉक न्यूटन यांचा जन्म. इंग्लंडमधील एका खेडय़ात जन्मलेल्या न्यूटनचे बालपण यथातथाच गेले. शांत स्वभाव असणारे न्यूटन बालपणी अनेक वेगवेगळे प्रयोग करून पाहात. अधिक शिक्षणासाठी केंब्रिजला येऊन त्यांनी ‘बायनॉमियल थिअरम’ व ‘कॅल्क्युलस’ या विषयाचे संशोधन मांडले. पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. त्या अंतराळात का फेकल्या जात नाहीत, या प्रश्नाचा शोध घेताना त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. याच गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा वापर करून त्यांनी ग्रहांच्या कक्षेचे कोडे सोडविले. धूमकेतू कक्षा, आरशाची दुर्बीण याही विषयावर त्यांनी मूलगामी स्वरूपाचे कार्य केले. पुढे त्यांना रॉयल सोसायटीचे सभासदत्व देण्यात आले. एडमंड हॅले या न्यूटन यांच्या मित्रामुळे ‘प्रिन्सिपिया’ हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.  गतीच्या तीन नियमांचा शोध, प्रकाश, दृक्शास्त्र संशोधन, हे न्यूटन यांचे मूलभूत कार्य त्यांच्या मृत्यूनंतर २०० वर्षांनंतरही टिकले आहे.
१९५७ सुधारक, विचारवंत, साहित्यिक, ज्ञानोपासक श्रीपाद महादेव माटे ऊर्फ माटे मास्तर यांचे निधन. त्यांचे आत्मचरित्र सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून लिहिले गेले आहे. अत्रे त्यांना ‘खरे जीवनवादी लेखक’ म्हणत असत.
१९६४ धनुष्कोडी विभागात झालेल्या सागरी वादळात संपूर्ण रेल्वेगाडी वाहून गेली. वादळाने पाचशेच्या वर लोकांचा बळी घेतला.
डॉ. गणेश राऊत  – ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : बौद्ध भिक्षूंचे आत्मदहन
दक्षिण व्हिएतनाममध्ये मे १९६३ मध्ये बौद्धांच्या धर्मध्वजावरून सुरू झालेली चळवळ बघता बघता रौद्र बनत चालली. तिचे नेतृत्व बौद्ध भिक्षूंकडे आले. परंतु दिएमचे सरकार काही बधत नव्हते. उलट त्यांच्यावर लाठीमार चालू होता. दिएम राजवटीवर उपोषणाचा परिणाम होत नाही हे पाहून बौद्ध संन्याशांनी एक अघोरी मार्ग स्वीकारला, तो होता आत्मदहनाचा. थिक-डक नावाच्या वृद्ध बौद्ध भिक्षूने सायगाव शहराच्या मध्यवर्ती चौकात जून १९६३ मध्ये आत्मदहन केले. या चौकातच अमेरिकेची वकिलात होती. चौकात हे आत्मदहन पाहण्यासाठी स्त्री-पुरुषांचा मोठा जमाव जमला होता.
भगवी वस्त्रे घातलेला डक, चौकात मध्यभागी पद्मासन घालून बसला. त्याच्या सहकाऱ्यांनी गॅसोलीनचे दोन डबे त्याच्या अंगावर ओतले. मृत्यूचे भय त्याच्या चेहऱ्यावर नव्हते. मुठीत धरलेल्या आगपेटीची काडी त्याने स्वत: ओढली व स्वत:ला पेटवून दिले. डकच्या शरीराने पेट घेताच मायक्रोफोनमधून थिक डक चिरायू होवो! डकचे आत्मदहन आम्ही फुकट जाऊ देणार नाही! अशा घोषणा बौद्ध भिक्षू देत होते. व्हिएतनामी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण तो जमावाने विफल केला. हा प्रकार पाहण्यासाठी दिएम सरकार ज्यांचे बाहुले होते, त्या अमेरिकेचे वार्ताहर व छायाचित्रकार जमलेले होते. डकचा जळून मृत्यू झाला व मृतदेह अखेर पद्मासन स्थितीच ज्वालात कोसळला. जमलेल्या एका अमेरिकन माणसाने डकच्या जळालेल्या हृदयाचा एक तुकडा एका बाटलीत घेतला. अमेरिकेत टेलिव्हिजनवर हा तुकडा नंतर दाखविला गेला. डकच्या पाठोपाठ काही दिवसांत नऊ बौद्ध भिक्षूंनी जाहीर आत्मदहने केली. हुअे आणि सायगाव येथील विद्यार्थ्यांनी प्रचंड निदर्शने केली व काही कॅथलिक विद्यार्थी हे जाहीररीत्या बौद्ध झाले. अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी या प्रकरणात लक्ष घालून सायगावमध्ये शांतता प्रस्थापित केली.
सुनीत पोतनीस  –    sunitpotnis@rediffmail.com