आपले रोजचे जगणे हे कोणाला आव्हान वाटते, तर कोणाला संघर्ष. परिस्थितीने पार गांजलेल्या व्यक्तीच्या लेखी उगवणारा नवीन दिवस म्हणजे तर जणू संकटच. कोणी जगण्याला प्रवासाची उपमा देतात, तर कोणी त्याला मानतात चक्क खेळ. डोळ्यांवर जो चष्मा चढवावा, त्यांनुसार आपल्याला जग दिसते. जगाकडे, या जगातील प्रतिक्षणीच्या जगण्याकडे तुम्ही कसे बघता, असा प्रश्न- घटकाभर गृहीत धरू- कोणी समजा ज्ञानदेवांना विचारला असता, तर डोळ्यांची पापणी लवायच्या आत त्यांनी उत्तर दिले असते- जगणे म्हणजे कौशल्य! अंमळ विचार केला आणि ज्ञानदेवांच्या उत्तराचा त्यांच्या तत्त्वपरंपरेच्या संदर्भात अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला, तर जगणे हे एक असाधारण कौशल्य आहे असे ते का म्हणतात, याचा उलगडा होतो अथवा व्हावा. ती उकल होण्यासाठी आपल्याजवळ दृष्टी हवी अद्वयाची. पदरी पुंजी हवी ती- ‘‘विश्वात भेद आहे परंतु द्वैत मात्र नाही,’’ या भानाची. अहो, भेद आपल्या पाचवीला पुजलेला आहे. किंबहुना, भेद हा निसर्गदत्तच होय. हाताची पाच बोटे एकसारखी नाहीत. रस्त्याने हिंडताना जरा नीट न्याहाळून बघितले तर ध्यानात येते की, पुढय़ात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाक, डोळे, भुवया, कान भिन्न भिन्न असतात अथवा आहेत. एकसारखे हुबेहूब क्वचितच आढळते. त्यांमुळे भेद हा निसर्गदत्तच ठरतो. परंतु द्वैत मात्र निखळ मानवनिर्मित अथवा मननिर्मित शाबीत होते. तेही स्वाभाविकच आहे म्हणा.. कारण मन असतो तो मानव, अशी व्याख्या मेंदू-संशोधनाच्या प्रांतातील काही शास्त्रज्ञांनी अलीकडे मांडलेली सापडते. निसर्गत:च भेद सृष्टीत नांदताना दिसतो, तर द्वैतभावना मात्र मनोसृष्टीत ठाण मांडून बसलेली असते. त्यामुळे भेदामध्येच सदोदित वास करायचा, परंतु मनातील द्वैताच्या भावनेला धुमारे मात्र फुटू द्यायचे नाहीत, ही कला आत्मसात करणे ही खरोखरच बिकट परीक्षा. अद्वयाची दृष्टी लाभलेल्या व्यक्तीलाच ती कला साध्य व्हावी. अशा व्यक्ती सदोदित विरळाच असणार. तेही साहजिकच म्हणायला हवे. कारण भेदामध्येच बागडायचे, परंतु द्वैताचा वारा मात्र अंतर्मनाला स्पर्शू द्यावयाचा नाही, अशी जगण्याची कला आत्मसात करणे ही काही खायची बाब नोहे! अशी ही जी कष्टसाध्य कला होय तिचा निर्देश ज्ञानदेव हरिपाठामध्ये ‘अद्वैतकुसरी’ अशा शब्दसंहतीने करतात. ‘कुसर’ हा शब्द आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. ‘कलाकुसर’ असा समानार्थी जोड शब्द आपण सहज वापरत असतो. ‘कुसर’ म्हणजे ‘कौशल्य’. शब्दकोशात पाहू गेले तर तिथे ‘कुसरी’ असाही शब्द आढळतो. ‘श्रेष्ठत्व’, ‘सुरेखपणा’, ‘सौंदर्य’, ‘कुशल’ अशा ‘कुसरी’ या शब्दाच्या विविध अर्थच्छटा आपल्याला तिथे गवसतात. द्वैतभावनेचा अंत:करणाला अणुमात्रही स्पर्श न होऊ देता सृष्टीतील भेदामधून अनुभवास येणाऱ्या विविधतेचा आस्वाद घेण्याची जीवनकला साधलेल्या विभूती विरळच सापडतात, हे वास्तव ज्ञानदेव ‘‘अद्वैतकुसरी विरळा जाणे’’ अशा शब्दांत मांडतात. ‘अद्वैत’ या संज्ञेमध्ये संकेत अथवा सूचन घडते ते एकलत्वाचे. बहुविधतेमध्ये जगत असतानाच त्या बहुविधतेमधील एकविधतेचे भान राखत भवतालातील वैविध्याचा आनंद लुटण्याचे कौशल्य ज्याला साधले त्यालाच अशा श्रेष्ठ, सौंदर्यपूर्ण अद्वैताची लज्जत चाखता येणे शक्य आहे, असे ज्ञानदेवांना ‘अद्वैतकुसरी’ या शब्दकळेद्वारे सुचवायचे असेल का..?
– अभय टिळक
agtilak@gmail.com