13 December 2018

News Flash

कुतूहल : मॅग्नेशियम

मॅग्नेशियम हे मूलद्रव्य म्हणून शोध लावणारा स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ जोसेफ ब्लॅक!

अठराव्या शतकाच्या अखेरीस परिसाच्या शोधात असलेल्या एका किमयागाराने एप्सम गावाजवळ सापडणारे खनिज-जल उकळले, पण परिसाऐवजी त्यातून कडू आणि विरेचक गुणधर्म असणारी भुकटी (पावडर) त्याला मिळाली; काही वर्षांनी असेही लक्षात आले की, या भुकटीची कायम स्वरूपी अल्कली द्रव्यांशी प्रक्रिया होऊन पांढरी भुसभुशीत व वजनाने हलकी पावडर तयार होते. गंमत म्हणजे ग्रीसमधील मॅग्नेशिया गावी सापडणारे खनिज भाजले असता अशीच पावडर मिळते. यावरून या ‘एप्सम सॉल्ट’ला मॅग्नेशिया हे नाव पडले. असेही बोलले जाते की, एका विहिरीचे पाणी कडू असल्याने गार्यी पीत नाहीत, परंतु त्याच पाण्याने गायींच्या शरीरावरील जखमा अथवा पुरळ बरे होते, असे १६१८ साली इंग्लंडमधील एप्सम इथल्या एका शेतकऱ्याला आढळले होते. एप्सम म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट जे आजही औषध म्हणून वापरले जाते. नैसर्गिक मॅग्नेशियम-सिलिकेटच्या दगडापासून केलेली भांडी व कारागिरीच्या वस्तू प्राचीन काळापासून वापरात आहेत. ग्रीक व रोमन लोक अ‍ॅस्बेस्टॉस या खनिजाचा वापर दिव्यांच्या वाती आणि न-जळणारे कापड बनविण्यासाठी करीत असत. एकूणच प्राचीन काळापासून मॅग्नेशियम हे मूलद्रव्य ज्ञात होते.

मॅग्नेशियम हे मूलद्रव्य म्हणून शोध लावणारा स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ जोसेफ ब्लॅक! १७५५ साली जोसेफ ब्लॅक यांनी मॅग्नेशिया (मॅग्नेशियम ऑक्साइड) हे लाइम अर्थात कॅल्शियम ऑक्साइडपेक्षा वेगळे असल्याचे दाखवून दिले. १७९२ साली अँटोन रबर्ट यांनी मॅग्नेशिया हे कोळशाबरोबर जाळून अशुद्ध स्वरूपात मॅग्नेशियम धातू वेगळा केला. १८०८ मध्ये सर हम्फ्री डेव्ही यांना शुद्ध स्वरूपातला मॅग्नेशियम अल्प प्रमाणात वेगळे करण्यात यश आले. १८३१ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ ‘अँटोनी बसी’ यांनी मॅग्नेशियम क्लोराइड आणि पोटॅशियम यांच्या अभिक्रियेतून जास्त मात्रेमध्ये मॅग्नेशियम मिळवला.

आवर्त सारणीत तिसऱ्या आवर्तनात, दुसऱ्या गणात, अणुक्रमांक १२ असलेला हा अल्कली-मृदा धातू पृथ्वीच्या कवचांत २.३ टक्के इतका आढळतो. क्षार-सरोवरे आणि समुद्राच्या पाण्यातदेखील मॅग्नेशियम मोठय़ा प्रमाणात असते. अति क्रियाशील असल्याने मॅग्नेशियम सहसा मुक्त स्वरूपात आढळत नाही. त्यामुळे पृथ्वीवर मॅग्नेशियमची १५० पेक्षा जास्त खनिजे सापडतात.

डॉ. सुभगा काल्रेकर, मुंबई

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on March 7, 2018 2:20 am

Web Title: magnesium chemical element