14 December 2017

News Flash

मनमोराचा पिसारा.. पसाऱ्यातून पिसारा

मनमोराचा पिसारा.. पसाऱ्यातून पिसारा मानस, प्लीज ऐक, आणखी एक आणि काइण्ड ऑफ शेवटची रिक्वेस्ट करतो.

मुंबई | Updated: December 27, 2012 12:06 PM

मनमोराचा पिसारा.. पसाऱ्यातून पिसारा
मानस, प्लीज ऐक, आणखी एक आणि काइण्ड ऑफ शेवटची रिक्वेस्ट करतो. नेहमीसारखं हसण्यावर नेऊ नकोस. ऐकतोयस ना? इकडे माझ्याकडे बघ, हं, असं रोखून नको बघूस. अरे ते पासपोर्ट फोटोवाले कसे पर्फेक्ट अँगल करायला लावतात तसं का करतो आहेस! बघतोय, तुझ्याकडे शंभर टक्के लक्ष देऊन ऐकतोय. मला सांग, तुझ्या डोळ्यात गोंधळलेपणा का दिसतोय? कशाबद्दल हैराण होतो आहेस? जरा स्वस्थपणे बसून विचार कर. शांतपणे माझ्याशी संवाद कर. म्हणजे असा डेस्परेट होणार नाहीस. अरे, आय अ‍ॅम ऑल्वेज देअर नाही, हिअर फॉर यू! मानस प्रेमानं म्हणाला.
‘मानस, तुझ्याशी मैत्री झाल्यापासनं मला कसल्याच चिंता नाहीत. कधी कधी मन बावरतं, तेव्हा तू सावरतोस. जेव्हा मन काळवंडतं तेव्हा तुझ्या शब्दांनी उजळतं. जेव्हा गोंधळून जातं, संभ्रमित होतं तेव्हा तू माझा गुरू होतोस. मानस, त्यामुळे तुझ्याशी संवाद करावासा वाटला रे.’
माझ्या मनात पसारा आहे. वेगवेगळे विषय, निरनिराळ्या आठवणी मनात दाटलेल्या आहेत. अनेकविध विषयांनी मनात गर्दी केलीय. फुलं, पानं, झाडं तुडुंब भरलेले तलाव, सांजवेळचा उदासलेला एखादा निर्मनुष्य सागरकिनारा, किर्र रानातल्या ओलसर पायवाटा मला खुणावत आहेत. गाण्यांच्या गोड लकेरी एखाद्या अनवट रागाच्या बंदिशीतले आरोह,अवरोह, मनात रुतलेल्या कवितेच्या ओळी माझ्या मनात सर्वत्र पसरलेल्या आहेत. क्वांटम फिजिक्सपासूून मेंदू विज्ञानपर्यंत अनेक शास्त्रविषय मनात रेंगाळत आहेत. इकडे आइन्स्टाइन मिष्किलपणे हसतोय, तर कुठे ज्ञानोबा ध्यानस्थ बसलेत. या विषयांना गणतीच उरली नाही. माय माइण्ड इज स्कॅटर्ड ‘पसारा पडलाय नुसता.’ मानसनं माझ्या मनावरच्या सुरकुतीकडे हळुवार नजरेनं फुंकर घातली. गोड हसून म्हणाला, ‘अरे या पसाऱ्यातच तुला पिसारा सापडला, होय की नाही? मला तर प्रत्येकाच्याच मनात पिसारा दिसतो. बहुतेक लोकांच्या मनात नाती-गोती, परस्परांच्या संबंधातले, हेवेदावे, कटु अनुभवांचा पसारा असतो. तुझ्या मनात तसला पसारा नाहीये, तुझे इंटरेस्ट वेगळे, तुझा स्वभाव, तुझं व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडीप्रमाणे पुस्तकं, चित्रं, गमतीदार किस्से, मानसशास्त्रीय सिद्धान्त यांचा पसारा पडलाय. तू तुझ्या पसाऱ्यातून पिसारा निर्माण केलास. ज्यांनी त्यांनी आपापल्या पसाऱ्यातून पिसारा निर्माण करावा. आपल्या मनातल्या पसाऱ्याचं आपण काय करायचं, हे ठरवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि स्वातंत्र्य असतं. वेठबिगार गुलामदेखील! आपल्याला मनाचं हे अचाट सामथ्र्य उमगलेलं नसतं.’
मानस, किती छान बोललास. ‘पसाऱ्यातून पिसारा फुलवणं’ ही गोष्ट मला टाकाऊपासून टिकाऊ टाइप वाटली. त्यामुळे, मी पसाऱ्यातून पिसारा याकडे केवळ छंद म्हणून बघत होतो. तुझ्याशी संवाद झाल्यावर कळलं की मनमोराचा पिसारा ही जगण्याची, जीवनातल्या विविध अनुभवांचा अर्थ लावण्याची वृत्ती आहे. ‘नशीब, आता तरी कळलं! तू जरा डोक्यानं ढिल आहेस, तुला कळलं म्हणजे सगळ्यांना कळेल.’  मानस वात्रटपणे म्हणाला. चल जा आता तुझ्या घरी, माझ्या मनात.. नि माझ्या मनात मानस विरघळला आणि आरशात पाहून मला खुदकन हसू आलं.
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : मायक्रोवेव्ह ओव्हनपासून सावधान
बरेच लोक चहा करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कपात नुसतेच पाणी उकळत ठेवतात. त्यासाठी ते त्यांच्या अंदाजाने टाइमर लावतात व तेवढी वेळ झाली की ओव्हन बंद होते व ते तो कप ओव्हनच्या बाहेर काढतात. असेच एका माणसाने केले व कप बाहेर काढल्यावर त्याच्या लक्षात आले की पाणी उकळत नव्हते आणि असे तो पाहात असता एकदम कपातले पाणी त्याच्या चेहऱ्यावर उडाले मग तो कप त्याने फेकून दिला, पण तोपर्यंत तो कप फुटला नव्हता. त्या पाण्यात जमा झालेल्या उष्णतारूपी ऊर्जेमुळे पाणी वर उडाले होते. त्यामुळे त्याचा चेहरा भाजला, फोड आले व त्या जखमा गंभीर होत्या. त्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर कायमच्या राहणार होत्या. तो माणूस थोडक्यात वाचला, नाहीतर त्याची नजर अधू झाली असती. रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले की, मायक्रोमुळे असे अपघात नेहमी होऊन माणसे रुग्णालयात येतात. मायक्रोमध्ये पाणी उकळवताना पाण्यात निर्माण होणारी ऊर्जा मर्यादेत ठेवण्यासाठी कपात लाकडी चमचा किंवा चहाची बॅग टाकावी, पण धातूचा चमचा किंवा काटा टाकू नये. याबाबत जेव्हा अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीशी संपर्क साधला तेव्हा कंपनी असे म्हणाली की, मायक्रोमध्ये उकळायला ठेवलेले पाणी वा अन्य द्रव पदार्थ उकळण्याच्या तापमानापर्यंत पोहोचले (उत्कलन बिंदू) तरी त्यात बुडबुडे निर्माण होत नाहीत. एवढेच नव्हे तर पाण्याचे तापमान आणखी वाढून अतिउष्ण (सुपरहीट) तापमानापर्यंत जाते आणि तरीही पाण्यात बुडबुडे येत नाहीत की ते उसळी मारीत नाही. मात्र अशा अवस्थेत त्या कपात चमचा किंवा चहाची बॅग टाकली तर ते पाणी फसफसून कपाच्या बाहेर पडते. हे टाळण्यासाठी मायक्रोमध्ये २ मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाणी उकळू नये. टाइमर बंद झाल्यावर कप बाहेर काढण्यापूर्वी तो ३० सेकंद आतमध्ये तसाच राहू द्यावा. जर कप अथवा भांडे नवीन असेल तर हे असे प्रकर्षांने होते, कारण भांडय़ाला चरे नसतात. चरे असलेल्या भांडय़ात बुडबुडे येतात व थोडी उष्णता हवेत निघून जाते. बुडबुडे तयार न झाल्याने पाण्याचे तापमान वाढत जाते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

इतिहासात आज दिनांक.. २७ डिसेंबर
१५७१ जर्मन गणिती व खगोलशास्त्रज्ञ योहानेस केप्लर यांचा जन्म.
१७९७ ख्यातनाम भारतीय उर्दू कवी मिर्जा गालिब यांचा जन्म. फारसी भाषा, सूफी तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासाने मिर्जा गालिब यांचे काव्य लोकप्रिय ठरले.
१८९८ लोकनेते डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म. श्यामराव आणि राधाबाई यांच्या पोटी पंजाबरावांचा जन्म झाला. देशमुख यांचे चरित्रकार नितीन रिंढे लिहितात,  ‘स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, दूरदृष्टी, नवनव्या कल्पना व्यवहारात उतरविण्याची कल्पकता व जिद्द, कामाचा विलक्षण झपाटा आणि घेतलेले निर्णय अमलात आणण्याचा अफाट धडाका ही पंजाबरावांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्टय़े. शिक्षण आणि शेती या उभय क्षेत्रांत पंजाबरावांनी केलेले कार्य केवळ महाराष्ट्राच्याच नव्हेतर स्वतंत्र भारताच्या जडणघडणीतही मोलाचे ठरले आहे. परिस्थितीवर मोठय़ा जिद्दीने मात करून विलायतेला जाऊन शिक्षण घेतलेल्या पंजाबरावांनी तेथून परतल्यावर आपले ज्ञान, बुद्धिमत्ता आणि कल्पकता ही भारतातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि शेतीच्या आधुनिकीकरणासाठी वेचली. कृषिमंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात असताना, आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनासारखे उपक्रम आयोजित करून भारतीय शेतकऱ्याला आधुनिक शेतीतंत्राचा परिचय घडविण्यासाठी पंजाबराव सक्रिय राहिले. ’ १ जुलै १९३२ रोजी त्यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्थेची सुरुवात झाली.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : पारशी तिथे सरशी
सध्या जगात पारशी समाजाची लोकसंख्या एकूण एक लाख दहा हजारांच्या जवळपास आहे. त्यापैकी भारतात सत्तर ते पंच्याहत्तर हजार पारशी राहतात. त्यापैकी साधारणत: सत्तर टक्के पारशी मुंबईत आहेत, तर बाकी लोक मुंबईच्या उत्तरेस असलेल्या गुजरातमधील नवसारी, सुरत व इतर काही शहरांत वसतीला आहेत. भारताशिवाय ब्रिटन, अमेरिका, कॅनडा व पाकिस्तान या देशात पारशी लोक स्थायिक झालेले आहेत. हल्लीची मुंबई घडविण्यात अनेक नामवंत पारशी व्यक्तींचे योगदान कारणीभूत आहे. त्यापैकी मुंबईत फिरोजशहा मेहता यांनी लावलेली नागरी प्रशासन व्यवस्था ही एक आहे. आर. पी. मसानी हे मुंबईचे पहिले महापौर होते. मुंबईतील अनेक रस्त्यांना, चौकांना पारशी व्यक्तींची नावे देऊन बऱ्याच ठिकाणी त्यांचे पुतळेही उभारले आहेत.
भारतीय राजकारणात दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता इत्यादी पारशी व्यक्तींनी त्यांचा स्वतंत्र ठसा उमटविला. जमशेदजी टाटा, गोदरेज परिवार, वाडिया परिवार इत्यादींनी तर भारतात उद्योगधंद्यांची बैठक पक्की केली. होमी भाभा हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्राचे अध्यक्ष होते. भारतात एक हजार वर्षांपासून स्थानिक लोकांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या या समाजाची लोकसंख्या मात्र झपाटय़ाने कमी होत आहे. सध्या साधारण सत्तर ते पंच्याहत्तर हजार एवढय़ा संख्येचा हा समाज २०२० सालापर्यंत तेवीस हजारांपर्यंत खाली येण्याची भीती वर्तविली जात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यातील जन्माचे प्रमाण कमी होऊन रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. आणखी एक कारण म्हणजे पारशी धर्माव्यतिरिक्त इतरधर्मीय पुरुष, स्त्रियांशी लग्ने करण्यास पारशी धर्मगुरू अनुमती देत नाहीत. त्यामुळे काही वर्षांतच हा पारशी समाज ही एक छोटी पारशी जमात होऊन पुढे ती इतिहासजमा होण्याची भीती आहे.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

First Published on December 27, 2012 12:06 pm

Web Title: manmoracha pisara plumage from plumage