१७९३ मध्ये कलकत्त्यात आलेले इंग्लिश ख्रिस्ती मिशनरी विल्यम कॅरे यांचे भारतीय देशी भाषांबद्दलचे प्रेम आणि त्यातील पांडित्य चकित करणारे आहे! या भाषांच्या अभ्यासाला सुरुवात जरी धर्मप्रसाराच्या हेतूने झाली तरी पुढे भारतातील विविध भाषांमध्ये साहित्य ग्रथित करून त्यांचे मुद्रित ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवावे अशा हेतूने प्रेरित होऊन कॅरे यांनी आपल्या मृत्यूपर्यंत हे कार्य केले. तत्पूर्वी मराठी भाषेत काहीही ग्रंथनिर्मिती होत नसताना आणि बंगाल हा मराठी भाषिक प्रांत नसूनही कॅरे यांनी तिथे मराठी भाषाविषयक पुस्तके देवनागरी लिपीत तयार केली हे विशेष! त्यामुळे विल्यम कॅरे यांचे नाव मराठी वाङ्मयात चिरस्मरणीय झालेय!

ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील युरोपियन लोकांना भारतीय स्थानिक भाषा शिकण्यासाठी १८०० साली कलकत्त्यात फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन झाले. येथील अभ्यासक्रमात मराठी, हिंदी, बंगाली, संस्कृत, तमीळ, तेलुगू, कानडी वगैरे भाषांचा समावेश होता. पुढे त्यात रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र, कायदेशास्त्र यांचाही समावेश झाला. विल्यम कॅरे या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये इ.स. १८०१ ते १८३० या काळात मराठी, संस्कृत आणि बंगाली भाषांच्या अध्यापक पदावर नोकरी करीत होते.

विल्यम कॅरे यांनी इ.स. १८०५ ते १८२५ या काळात मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत सेंट मॅथ्यूचे शुभ वर्तमान, बायबलचा नवा करार, जुना करार वगैरे १४ धार्मिक ग्रंथ लिहून मुद्रित केले. धार्मिक साहित्य निर्मितीव्यतिरिक्त कॅरे यांनी १८०५ साली मराठी भाषेचे व्याकरण देवनागरीत मुद्रित केलेय.  १८१० साली कॅरे यांनी ‘अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ हा मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला. ६५२ पृष्ठांच्या या शब्दकोशात नऊ ते दहा हजार मराठी शब्दांचा अर्थ इंग्रजीत दिला आहे. १८१४ साली ‘सिंहासन बत्तीशी’ हे संस्कृत पुस्तकाचे मराठीत भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकात राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाच्या बत्तीस कथा ३२ पुतळ्यांच्या मुखातून वदवल्या आहेत. १८१६ साली ‘रघुजी भोसल्याची वंशावळी’ हे पुस्तक मराठी भाषेत आणि मोडी लिपीत कॅरे यांनी लिहून मुद्रित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com