News Flash

मध्ययुगीन रोमन वास्तुशास्त्र

रोमन लोकांनी वास्तुरचनेबाबत अनेक मूलभूत कल्पना ग्रीकांकडून घेतल्या. पुढे त्यात काही बदल आणि सुधारणा रोमनांनी केल्या.

रोमन लोकांनी वास्तुरचनेबाबत अनेक मूलभूत कल्पना ग्रीकांकडून घेतल्या. पुढे त्यात काही बदल आणि सुधारणा रोमनांनी केल्या. इ.स.पूर्व २७ ते इ.स. १८० या रोमन साम्राज्यकाळात रोममध्ये शांततेचा काळ होता. या कालखंडाला ‘पॅरिस रोमाना’ म्हणतात. रोमन साम्राज्यात या कालखंडात वास्तुशास्त्राचा मोठा विकास झाला. वर्तुळाकार किंवा अंडाकृती आकाराचे रोमन अ‍ॅम्फी थिएटर हे रोमचे वैशिष्टय़ होते. ग्लॅडिएटर्सच्या झुंजी, रथांच्या स्पर्धा, प्राण्यांच्या झुंजी आणि विविध कसरती, खेळ करण्याची ही लहानमोठी मदाने आणि त्यांच्या सभोवती प्रेक्षकांना बसण्याची उतरती व्यवस्था असे अ‍ॅम्फी थिएटरचे स्वरूप होते. रोमन राज्यात अशी लहान-मोठी २३० अ‍ॅम्फी थिएटर्स होती. त्यापकी सर्वात मोठे, साठ हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था असलेले रोमन कलोझियम हे सध्या आधुनिक रोमचे प्रतीक बनले. इ.स. ७० ते ८० या काळात हे विशाल अ‍ॅम्फी थिएटर बांधले गेले. विविध ठिकाणी केलेला कमानींचा (आर्च) वापर हे रोमन वास्तुकलेचे आणखी एक वैशिष्टय़. विजयी सम्राटाच्या स्वागतासाठी कमानी उभारल्या जात. विजय कमानी उभारताना त्याच्यावर पुतळे आणि इतर नक्षीकाम कोरण्याचा प्रघात होता. आर्च ऑफ टायटस (इ.स. ८१), आर्च ऑफ सेप्टीमस (इ.स. २०५) आणि आर्च ऑफ कॉन्स्टन्टाइन (इ.स. ३१२) या कमानी रोम शहरात आजही मोठय़ा दिमाखात उभ्या आहेत. मोठमोठे सुशोभित चौक आणि चौकांमधील सुंदर आणि भव्य कारंजी आणि ओबेलिस्क हे रोमन स्थापत्याचे एक वैशिष्टय़. पिआत्झा नाओना, पिआत्झा व्हेनेझिया, पिआत्झा डेला मिनव्‍‌र्हा हे चौक, फाँटाना डी ट्रेव्ही (ट्रेव्ही फाउंटन) सारखी सुरेख कारंजी आणि कॉलम ऑफ मार्क्स आरेलियससारखे कोरीव काम केलेले ओबेलिस्क वैशिष्टय़पूर्ण स्थापत्याची उदाहरणे होत. दुतर्फा पदपथ तयार करून मध्ये दगडाचे खांडके बसवून तयार केलेले रस्ते मध्ययुगीन काळात फक्त रोममध्येच होते. दुसऱ्या शतकात रोमन राज्यात असे ८००० कि.मी. लांबीचे रस्ते होते!

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

 

प्रदूषण निदर्शक वनस्पती

जमीन मुख्यत्वे सिलिका, लोखंड आणि अ‍ॅल्युमिनियम यांच्या ऑक्साइडपासून बनलेली असते. मातीत इतरही अनेक मूलद्रव्ये असतात. मातीचे व दगडाचे पृथक्करण करताना ही द्रव्ये  निरनिराळ्या संयुगांच्या स्वरूपात वेगळी होतात. गंधकाचे ऑक्साइड्स, फ्लोराइड्स ही मोठय़ा प्रमाणात हवेत मिसळतात. कोळसा व पेट्रोलचे उच्च तापमानात ज्वलन करताना हवेतील नायट्रोजनचेही ज्वलन होऊन नायट्रोजन ऑक्साइड्स वातावरणात मिसळतात. हवेतील सल्फरडाय ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स, फ्लोराइड्स आणि वेगवेगळ्या कारणांनी हवेत मिसळणारी धूळ यांनाच आपण वायुप्रदूषण म्हणतो. या प्रदूषकांचा प्राणिमात्रांवर परिणाम होतो. त्यांना श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होतो. हा त्रास चुकवण्यासाठी दूषित हवेपासून दूर जाण्याचा पर्याय प्राण्यांना उपलब्ध असू शकतो. मात्र वनस्पतींना हा त्रास सहन करणे भाग पडते. त्यामुळे त्यांच्यावर त्याचा कसा परिणाम होतो ते पाहू या.

सल्फरडाय ऑक्साइड हा प्रदूषक माफक प्रमाणात असतो तोपर्यंत वनस्पती त्यातील गंधक शोषून घेऊन प्रकाश संश्लेषणाबरोबर प्रथिने गठित करतात. पण प्रदूषणाची तीव्रता जास्त असेल तर मात्र हरितद्रव्यांचा नाश होतो. हा नाश तीव्रतेच्या प्रमाणात पायरी पायरीने वाढत जातो. पानांच्या शिरांदरम्यानचा नाजूक भाग प्रथम तांबूस नंतर पिवळा पडतो. प्रदूषण चालूच राहिले तर हाच भाग निर्जीव होऊन गळून पडतो. पानाला भोके पडतात. पुढची पायरी म्हणजे पान गळून पडते. फांद्या बोडक्या होतात. कालांतराने झाड मरतेही.

निरनिराळ्या  झाडांची प्रदूषण सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. म्हणजे काही वनस्पती दुसऱ्या काही वनस्पतींपेक्षा जास्त प्रदूषण सहन करू शकतात. सप्तपर्णी, चिकू, वड, रुई या वनस्पती प्रकारांची प्रदूषण सहनशीलता जास्त असते. तर आंबा, आसूपालव, पांगारा आणि सूर्यफुलाच्या जातीतील फुलझाडे वायुप्रदूषणाबाबत संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे.

हवेतील प्रदूषकांचे उपकरणाच्या साहाय्याने मापन करण्यात अनेक अडचणी आहेत.  म्हणून संवेदनशील वनस्पतींचा उपयोग करावा असे सुचवले जाते. संवेदनशील झाडे किंवा फुलझाडांच्या कुंडय़ा शहरात आणि कारखान्याच्या परिसरात ठिकठिकाणी ठेवून प्रदूषण निदर्शक म्हणून वापरणे अनेक देशांमध्ये रूढ झाले आहे. भारतातही ते आता होत आहे.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 3:09 am

Web Title: medieval roman architecture
Next Stories
1 रोमची प्राचीन स्नानगृहे
2 फॅसिस्ट मुसोलिनीचा उदयास्त
3 कुतूहल – जांभूळ
Just Now!
X