21 September 2020

News Flash

पारा

कोणत्याही व्यक्तीला राग आला, की आपण म्हणतो, त्याचा पारा चढला.

कोणत्याही व्यक्तीला राग आला, की आपण म्हणतो, त्याचा पारा चढला. असा वाक्प्रचार पाऱ्याच्या गुणधर्मामुळे रूढ झाला. पारा हा तापमान बदललं की जलद गतीने प्रसरण पावतो व चांदीप्रमाणे चकाकतो. यामुळे इंग्रजीत बोलीभाषेत त्याला क्विक सिल्व्हर (quick silver) असेही म्हणतात. कालांतराने मक्र्युरी ग्रहावरून त्याचे नाव मक्र्युरी असे रूढ झाले. याचे कारण मक्र्युरी (बुध) ग्रह हा अतिशय चपळ आहे व जलद गतीने परिभ्रमण करतो. ग्रीक तत्त्ववेत्ता अ‍ॅरिस्टोटल याने पाऱ्याला हायड्रो अर्गिरोस (Hydro argyros) असे संबोधले. पुढे त्याची रासायनिक संज्ञा Hydrargyrum या शब्दावरून Hg अशी ठेवण्यात आली. ग्रीक भाषेत हायड्रा (Hydra) म्हणजे पाणी आणि argyrum म्हणजे चांदी, हे मूलद्रव्य जरी धातू असले तरी कक्ष तापमानाला द्रवरूप आहे. या धातूचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्येही आहे. प्राचीन काळी भारतीय, चिनी, स्पॅनिश व इजिप्शियन लोकांना पारा परिचित होता. इ.स.पूर्व १५००चे इजिप्त येथील टॉम्ब्स (Tombs) मध्येही तो नळ्यांमध्ये ठेवलेला निदर्शनास आला आहे. चिनी सम्राटांचा समज होता की, याने आयुर्मान वाढते, त्यामुळे ते याचा उपयोग करीत. (त्या काळी लोकांना पाऱ्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो याची कल्पना नव्हती.) पारा घातक असल्याचे माहिती असूनसुद्धा चिनी औषधांमध्ये आजही याचे प्रमाण खूप जास्त आहे. १७५९ साली अ‍ॅडम ब्रॉन व मिखाइल लोमोनोसोव यांनी पाऱ्याची तापमापी बर्फ व नायट्रिक आम्लाच्या मिश्रणात गोठवली व स्थायुरूप पारा मिळवला. तेव्हा लक्षात आले की, पाऱ्याचे गुणधर्म धातूसारखे आहेत. पाऱ्याचे अनेक गुणधर्म वैशिष्टय़पूर्ण आहेत. त्याचा वितलनांक उणे ३८.८३ अंश सेल्सिअस व उत्कलनांक ३५६.७ अंश सेल्सिअस आहे. तो कक्ष तापमानाला द्रवरूप असण्याचे हेच कारण आहे. पाण्यापेक्षा पारा १३.६ पट जड आहे. पाऱ्याची घनता १३.५ ग्रॅम प्रति घनसेमी, तर लोखंडाची घनता ७.८७ ग्रॅम प्रति घनसेमी आहे, त्यामुळे तोफेचा गोळा अथवा लोखंडी वस्तू जड असूनही पाऱ्यामध्ये सोडले असताना तरंगतात. मात्र सोने, ऑस्मिअम या धातूंची घनता पाऱ्यापेक्षा जास्त असल्याने हे धातू पाऱ्यात बुडतात.

– सुधा सोमणी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 12:04 am

Web Title: mercury
Next Stories
1 मार्क कब्बन – एक कुशल प्रशासक (२)
2 कुतूहल – सोन्यासारखं ‘सोनं’!
3 जे आले ते रमले.. : मार्क कब्बन (१)
Just Now!
X