१६४२ युरोपियन संशोधक एबल ऊर्फ अ‍ॅबल यानझून टासमन यांनी न्यूझीलंड बेटांना जगासमोर आणले. ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या बेटाला टास्मानिया हे नाव त्यांच्याच कर्तृत्वावरून देण्यात आले. १६०३ ते १६५९ अशी त्यांची कारकीर्द होती. त्यांचा जन्म ल्यूटजिजॉस्ट येथे झाला. ग्रॉनिंजेनच्या जवळच्या भागात हा प्रदेश आहे. बालपणापासूनच त्यांना धाडसाची आवड होती. ऐन तारुण्यात ते नौदल अधिकारी झाले आणि समुद्र हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला. डच ईस्ट इंडिया कंपनीतून कारकीर्द सुरू झाल्यावर वसाहतवादी स्पर्धेमुळे त्यांना नव्या जगाचा शोध घ्यावा लागला. गव्हर्नर जनरल व्हान डायमेन यांच्या आज्ञेने टासमन यांचा प्रवास सुरू झाला. त्यांना या मोहिमेत स्वत:ला अज्ञात असणारे भूभाग सापडले त्यांना टासमन यांनी ‘व्हान डायमेन लँड’ असे नाव दिले. पुढे याचेच नामांतर टास्मानियात झाले. न्यूझीलंडचा भाग शोधणे ही टासमन यांची अभूतपूर्व कामगिरी होय. पुढे ते न्यूगिनी बेटांच्या किनाऱ्यांकेड गेले असता कारपेन्टारिया भाग त्यांना ज्ञात झाला. या सगळ्या अनुभवांवर आधारित ऑस्ट्रेलियाचे उत्तर व पूर्व किनाऱ्याचे अचूक नकाशे बनविले.   
१८०४ ख्यातनाम कोशकार व शिक्षणतज्ज्ञ मेजर टॉमस कँडी यांचा जन्म. मराठी भाषेस आधुनिक वळण लावण्याची त्यांची कामगिरी महत्त्वाची आहे. पुणे आणि महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी राहिली.
१९८३ राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांची निवड योग्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in