विजेबद्दल पुरेशी काळजी न घेतल्याने विजेचे अपघात वारंवार होताना दिसतात. ते होऊ नयेत म्हणून विजेबद्दल जास्तीत जास्त माहिती सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ज्या पदार्थामधून कमी कमी विरोध होऊन विजेचे वहन होते त्याला कंडक्टर म्हणतात. यात चांदी, तांबे, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, शिसे, लोखंड हे धातू उतरत्या क्रमाने लक्षात घेतले पाहिजे. परंतु चांदी महाग असते. तांबे लवचिक, मऊ, वातावरणाचा परिणाम न होणारे, सॉल्डर करता येण्यासारखे, चांदीपेक्षा स्वस्त आणि विपुल प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे ते खूप ठिकाणी वापरले जाते. अ‍ॅल्युमिनियम हा धातू वजनाने हलका आणि स्वस्त असतो. त्यामुळे याचा वापर अधिक प्रमाणात होतो. शिशाचा उपयोग फ्यूजवायर आणि सॉल्डरिंगसाठी करतात. गॅल्व्हनाइज्ड आयर्नमध्ये तांबे व अ‍ॅल्युमिनियमपेक्षा कमी गुणधर्म असतात. हा धातू टेलिफोन तारांसाठी वापरतात. पितळेचा उपयोग स्विचेस, मोटरचे स्टड्स यासाठी करतात. ज्या कंडक्टरमधून विजेचा प्रवाह वाहतो, पण विरोधही बराच होतो. त्या पदार्थाना सेमी कंडक्टर्स म्हणतात. त्यात टंगस्टन, टँटलम, नायक्रोम, क्रोमियम युरेका, साधे पाणी इ.पदार्थ मोडतात. प्रकाश आणि उष्णता निर्माण करणाऱ्या साधनांमध्ये हे धातू वापरतात. टंगस्टन दिव्याच्या फिलॅिमटमध्ये, नायक्रोम विजेच्या शेगडीमध्ये, इस्त्रीमध्ये वापरतात. युरेका फिल्ड रेग्युलेटर व रेझिस्टंस बॉक्ससाठी वापरतात. इन्शुलेटर पदार्थातून विजेचा प्रवाह वाहत नाही, म्हणून असे पदार्थ विजेच्या तारांवरील आवरणासाठी वापरतात. हे पदार्थ वीज प्रवाहाला विरोध करणारे, जास्त व्होल्टेज सहन करणारे, यांत्रिक शक्ती चांगली असणारे, तापमानामुळे वीज प्रवाहात बदल घडू न देणारे, आद्र्रता न शोषणारे असावे लागतात. अशा पदार्थातील मायका डीसी मोटरमध्ये, इस्त्रीमध्ये वापरतात. मार्बल आणि स्लेट पॅनल बोर्डासाठी वापरतात. काच ठराविक ठिकाणीच वापरतात. क्वार्टझ स्पार्क प्लगसाठी वापरतात. पोर्सििलन ओव्हरहेड लाइनसाठी वापरतात. व्हल्कनाइज्ड रबर कमी व मध्यम व्होल्टज्साठी वापरतात. याशिवाय एबोनाइट, लाकूड, कागद, बेकेलाइट, ट्रान्सफॉर्मर ऑइल, इनॅमल, शेलॅक असे इतर पदार्थही आहेत.
अनंत ताम्हणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई २२  
office@mavipamumbai.org

इतिहासात आज दिनांक.. -२६ नोव्हेंबर
१८९० जागतिक पातळीवर मान्यता पावलेले भारतीय भाषाशास्त्रज्ञ सुनीतीकुमार चतर्जी यांचा जन्म. ते भाषा, साहित्य व संस्कृतीचे दांडगे अभ्यासक होत.
१९३४ मुस्तफा केमाल पाशा यांनी तुर्कस्तानमध्ये वंशपरंपरागत चालत आलेले किताब वापरण्यावर बंदी घातली. त्यांची ओळख आधुनिक तुर्कस्तानचे शिल्पकार अशी आहे. ग्रीस भागातील सलॉनिक येथे १२ मार्च १८८१ रोजी त्यांचा जन्म झाला. गाझी मुस्तफा पाशा हे त्यांचे मूळ नाव.  ‘वतन’ या तुर्क क्रांतिकारक संघटनेच्या माध्यमातून त्यांचे राष्ट्रवादी कार्य सुरू झाले. पहिल्या महायुद्धात सामील होऊन ते जनरल झाले व ब्रिटिशांविरुद्ध दार्दानेल्स येथे त्यांनी शौर्य दाखविले. याच काळात अन्वरपाशा, तलतपाशा, जमालपाशा या तरुणतुर्क नेत्यांशी आणि समवयस्कांशी त्यांच्या ओळखी झाल्या. हे तरुणतुर्क नव्या तुर्कस्तानचे स्वप्न बघणारे होते. या मंडळींनी समकालीन सत्तधीशांशी सुधारणांच्या संदर्भात लढा सुरू केला होता. यातून १९२१ मध्ये अंकारा येथे केमाल पाशा यांनी तात्पुरत्या स्वरूपाचे शासन निर्माण केले. पुढच्या काळात ऑटोमन सुलतानशाही संपुष्टात आली. १९२३ मध्ये तुर्कस्तान हे प्रजासत्ताक म्हणून घोषित झाले. १९२१ ते ३८ या कालखंडात त्यांनी अध्यक्षपद भूषविले.  धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था, खिलाफत पद्धत, जुनी पारंपरिक घराणी व किताब पद्धती, बुरखा पद्धत, बहुपत्नीकत्व रद्द करून टाकले. स्त्री स्वातंत्र्याला अवकाश दिला. शेती, अर्थव्यवस्था, दळणवळण, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात ‘न भूतो’ असे बदल घडवून आणले. यामुळे ते समग्र तुर्काचे पिता म्हणजेच ‘अतातुर्क’ झाले.
२०११ महाराष्ट्राच्या क्रीडा विकासाचे नवे धोरण नागपूर अधिवेशनात मांडण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची – वीरांगना राणी झेनोबिया
पामिरा या छोटय़ा राज्याच्या राणी झेनोबियाने रोमन साम्राज्यातल्या इजिप्तसारख्या मोठय़ा राज्याचा घास गिळंकृत केल्यावर झेनोबियाचा आत्मविश्वास वाढला. तिने आता प्रथम तिची नजर शेजारील लेबनॉनवर वळविली. लेबनॉनवर केलेल्या चढाईत झेनोबियाने स्वत:च युद्धाचे नेतृत्व केले. सैनिकांच्या पहिल्या फळीत राहून तिने ते युद्ध जिंकले. लेबनॉननंतर तिने सीरियाची कुरापत काढून सीरियाबरोबर युद्ध केले. लेबनॉन युद्धातील तिला नेतृत्वाचा अनुभव आलेला असल्याने सीरियाचे युद्ध जिंकून सीरियावर कब्जा केला. लेबनॉन, सीरियापाठोपाठ झेनोबियाने पॅलेस्टाइनही जिंकले. या युद्धातल्या यशस्वी नेतृत्वामुळे तिला ‘वॉरीयर क्वीन’ असे नाव पडले.
आता झेनोबियाची सत्ता अँटीऑक (सीरिया) आणि अलेक्झांड्रिया (इजिप्त) या दोन शहरांवर बसली होती. रोमन साम्राज्यातील तीन मोठी शहरे रोम, अलेक्झांड्रिया व अँटीऑकपैकी झेनोबियाच्या पामिरा साम्राज्यात दोन शहरे आली होती. पामिराजवळून जाणारा रस्ता हा व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. अन्नधान्याचा बराचसा पुरवठा रोमला याच रस्त्यावरून होत असे. झेनोबियाने ही अन्नधान्याची वाहतूक बंद केली व त्यामुळे रोमला जीवनोपयोगी वस्तूंचा तुटवडा पडू लागला. त्यामुळे शेवटी रोमन सम्राट ऑरेलियन याने रोमन लष्कराला अँटीऑकमध्ये घुसविले. अटीतटीची लढाई होऊन झेनोबियाच्या सैन्याचा पूर्ण धुव्वा उडाला. झेनोबिया तिच्या मुलासह पळून एमेसा येथे गेली. तेथून पर्शियाच्या आश्रयासाठी उंटावरून पळून जात असताना ऑरेलियनच्या सैनिकांनी त्यांना पकडले. झेनोबिया व मुलाला रोम येथे नेऊन कैदेत ठेवण्यात आले. ऑरेलियनने रोममध्ये विजयाची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत त्याने झेनोबियाची पायी वरात काढली. झेनोबिया इतकी खंबीर होती की, या वरातीत ती दागिने व उंची वस्त्रे घालून सामील झाली. कैदेतच आजारपणाने झेनोबिया व तिच्या मुलाचा मृत्यू इ.स. २७४ मध्ये झाला.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

मनमोराचा पिसारा.. – योई शिना, योई कांगाए
गाडी कारखान्यातल्या ‘वेल्डिंग’ विभागातल्या अकटोविकटो रोबोंच्या सहाय्याने गाडय़ांचे विविध भाग जोडण्या पाहाताना आपण एखादी सायन्स फिक्शन (साय-फाय : विज्ञान अद्भुतिका) चित्रपट बघतो आहोत असा भास होतो. मोठय़ा रोबोनी काम केल्यावर छोटे छोटे रोबो येऊन केरकचरा काढतात. साफसफाई करून पुन्हा गप्प उभे राहातात. असेंब्ली लाइनवरील सहा विविध मॉडेलच्या गाडय़ा सुर्रदिशी पुढे जातात. मिनिटभर सारं स्थिरावतं आणि संजीवनी मिळाल्यासारखं शॉप फ्लोअर पुन्हा कार्यरत होतं. नव्या गाडय़ांचे सांगाडे असेंब्ली लाइनवर थांबतात. मजलाभर उंचीचे रोबो सेन्सरचे डोळे रोखतात नि अनेक हात त्या गाडय़ांच्या जोडण्या करण्याकरता झेपावतात. पुन्हा वेल्डिंगमधल्या ठिणग्या उडतात. काम संपतं मग छोटे छोटे रोबो पुढे सरसावतात.
टोयोटाच्या कारखान्यात फिरताना चकित होणे, स्तिमित होणे, नवल वाटणे, पाहातच राहाणे या सगळ्या शब्दप्रयोगांचा जागोजागी अनुभव येतो.
उत्तम गुणवत्ता, वक्तशीर सेवा, सुबक संरचना या सर्वासाठी नावाजलेली टोयोटा कार प्रत्यक्ष बांधताना पाहाणं हा अनोखा अनुभव असतो. टोयोटा कारखान्याची सफर एखाद्या सिनेमासारखी आगाऊ बुकिंग करून नक्की करावी लागते. आणि त्याचं बॉक्स ऑफिस केव्हाच फुल होतं.
टोयोटा कारखान्यात फिरताना वारंवार एकच घोषवाक्य सर्वत्र लिहिलेलं आढळलं. थांबून त्या वाक्याचा अर्थ विचारला. तो सांगायला कैझन गुरू माझे सहकारी प्राध्यापक डॉ. श्रीनिवास गोंधळेकर (डॉ. जी. वेलिंगकर इन्स्टिटय़ूट) होते. त्यामुळे  ज्ञानामृताचा वर्षांव झाला. ते वाक्य होतं-
‘योई शिना, योई कांगाए’
कारखान्यात ‘‘‘उत्पादन वाढवा, उत्तमता जपा’ अशी घोषणा लिहिलेली असणार,’’ मी म्हटलं. ‘‘नाही. या वाक्याचा तसा अर्थ नाही,’’ डॉ. जी. म्हणाले.
कामगारांना, अधिकारी नि व्यवस्थापकीय वर्गाला एकाच गोष्टीची आठवण करून दिली जाते! ‘उत्तम मटेरिअल, उत्तम विचार’!
नवल वाटणे, चकित होणे हे शब्दप्रयोग फिके वाटले. डोक्याला विचाररूपी विजेचा प्रचंड धक्का बसला. आपल्याला उत्तम गाडी हवी, त्यासाठी दोषविरहित मटेरिअल/विविध भाग हवेत, हा आग्रह अर्थातच असणार! पण ‘उत्तम विचार,’ मी विचारलं.
 साधं आहे उत्तर, उत्तम विचार केल्याशिवाय उत्तम सुधारणा होणार कशा? माणूस फक्त हाताने काम करतो, त्यात कौशल्य मिळवतो, पण त्या कामाचा विचार डोक्यात होतो. कामात संपूर्ण लक्ष देणं आणि त्यावर मनन करून बारीकसारीक सुधारणा करणं म्हणजे ‘कैझन’, डॉ. जी. विचार केल्याशिवाय ते कसं साध्य होणार? ‘मग रोबो कशाला? ते नाही विचार करू शकत?-’ पण रोबो निर्माण करणारा नि चालवणारा माणूस विचार करतो ना! रोबो म्हणजे फक्त हात, बाकी सगळं विचारांचं काम माणसाकडे. जपानी कारखान्यातला कामगार काममग्न असतो, तसा विचार मग्न असतो. श्रमणाऱ्या माणसाला श्रमाचं महत्त्व कळतं, प्रोसेस कळते. एवढं घोषवाक्य पुरेसं आहे. डॉ. जी. हसत म्हणाले.
अखेर विचार म्हणजे आपल्या डोक्यातलं मटेरिअल. त्या मटेरिअलमधून कलाकृती निर्माण होते. संशोधन करता येतं. रोगनिदान, उपचार करता येतात. मनमोराचा पिसारा फुलतो. थँक्यू डॉ. जी.
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com