17 December 2017

News Flash

कुतूहल – शेतीत कार्बन डायॉक्साइडचा वापर

हिरव्या वनस्पती आपले अन्न हवेतील कार्बन डायॉक्साइड वापरून निर्माण करतात. कार्बन डायॉक्साइडचे हवेतले प्रमाण

डॉ. आनंद कर्वे (पुणे) | Updated: January 4, 2013 1:24 AM

हिरव्या वनस्पती आपले अन्न हवेतील कार्बन डायॉक्साइड वापरून निर्माण करतात. कार्बन डायॉक्साइडचे हवेतले प्रमाण सुमारे ०.०३९ टक्के इतके कमी असते. ते जर वाढवता आले तर आपल्याला शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकते. रात्रीच्या वेळी वनस्पती श्वसनाद्वारे कार्बन डायॉक्साइड बाहेर टाकतात. हा वायू हवेच्या दीडपट जड असल्याने वारा नसेल तर तो जमिनीजवळ साठून राहतो. त्यामुळे दाट अरण्यात रात्री जमिनीलगतच्या वातावरणात कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण ०.१२ टक्के इतके, म्हणजे उघडय़ावरील वातावरणाच्या तिप्पट इतके असू शकते. शेतातल्या पिकांमधूनसुद्धा रात्री कार्बन डायॉक्साइड बाहेर पडतो, पण तो शेतात साठून राहात नाही. पिकातील वनस्पतींसभोवतीच्या वातावरणातील कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण जर वाढवावयाचे असेल तर हरितगृहासारख्या प्रणालीचा वापर करणे इष्ट ठरते. हरितगृह ही कल्पना मूळची युरोपातल्या थंड प्रदेशातली. तिथे हिवाळ्यात ताज्या भाज्या आणि नाताळ किंवा ईस्टरसाठी लागणारी फुले मिळविण्यासाठी प्लॅस्टिकच्या पारदर्शक पडद्यांनी मढविलेल्या कक्षांमध्ये कृत्रिमरीत्या तापमान वाढवून त्यात भाज्या आणि फुले वाढविली जातात. या कक्षांमधली उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी ते बंदिस्त असणे आवश्यक असते. पण या प्रणालीचा मूळ उद्देश लक्षात न घेता युरोपात बांधतात तशीच हरितगृहे आपण भारतात बांधली. या प्रकारच्या हरितगृहांची किंमत प्रति हेक्टर सुमारे रु. दोन कोटी असते. त्याचे व्याज आणि घसारा यांचाच खर्च होतो प्रति वर्षी रु. ४० लाख. म्हणजे हरितगृहात शेती करावयाची असेल तर दर वर्षी प्रति हेक्टर रु. ५० ते ६० लाखांचे उत्पन्न त्यातून मिळावयास हवे. शेतमालाच्या आजच्या भावात तरी हे शक्य नाही. त्यामुळे पाश्चात्य पद्धतीचे बंदिस्त हरितगृह न बांधता बांबूचे डांभ उभे करून त्यांच्या आधाराने प्लॅस्टिकच्या कनाती उभारून शेताचे १० मीटर बाय १० मीटर असे भाग पाडावेत. थोडक्यात म्हणजे कार्बन डायॉक्साइड साठविणाऱ्या टाक्या निर्माण कराव्यात. या टाक्यांमुळे रात्री निर्माण होणारा कार्बन डायॉक्साइड वनस्पतींच्या भोवतीच्या वातावरणातच साठवला जातो आणि सूर्योदयानंतर तो प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. अशी व्यवस्था केल्यास आपल्याला कितीतरी कमी खर्चात नेहमीच्या दुप्पट उत्पन्न मिळवता येते.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२  office@mavipamumbai.org
(बुधवार, ३ जानेवारीच्या ‘कुतूहल’चे लेखकही डॉ. आनंद कर्वे आहेत. हा उल्लेख अनवधानाने राहून गेला )

जे देखे रवी..      
४. ठिसूळ हाडे
तुम्ही कितीही उच्चविद्याविभूषित असलात आणि कितीही मोठे एखाद्याच इंद्रियाचे तज्ज्ञ असलात तरी ओळखीचे आणि नातेवाईक रुग्ण तुमच्याकडे चौकशीसाठी येतातच येतात.  म्हणतात तुझ्या ‘कन्सल्टिंग रूम’मध्ये नको तुझ्या घरी थोडा वेळ दे. या  ‘कन्सल्टिंग रूम’ला दवाखाना हा सोपा शब्द वापरण्याची पद्धत आता नाही. फार फार तर ‘क्लिनिक’  इथपर्यंतच मजल जाते आणि थांबते. खूप प्रवासानंतर जर तुम्ही कोणाकडे गेलात तर बायकांना बायका विचारतात ‘तुम्हाला Fresh व्हायचे असेल ना?’ पूर्वी जाऊन यायचे आहे का असे विचारत. ‘आता हा Fresh वाक्प्रचार रूढ झाला आहे. ते असो. या Fresh  झालेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचा प्रवासाचा शीण मात्र तेवढाच राहतो. घरी येणाऱ्या रुग्णांबद्दल मी सांगत होतो. एक घरी आलेली ओळखीची बाई मला सांगू लागली ‘अरे रविन माझी हाडे ठिसूळ झाली आहेत.’ मी तिच्या डोक्याकडे बघू लागलो तर म्हणते, ‘तू जरा लक्ष देशील का?’ मी म्हटले ‘हा ठिसूळपणा तुला कसा कळला?’ तर म्हणाली, ‘मी एक खास तपासणी करून घेतली.’ ‘मी म्हटले तुला काय होत होते?’ ती म्हणाली, मला काहीच होत नव्हते. पण माझ्या मैत्रिणींनी करून घेतली म्हणून मीही करून घेतली. त्यांनी कोठेतरी वाचले की ४० वर्षांनंतर ही तपासणी सर्व स्त्रियांनी करून घ्यायला हवी. त्यांचे पैसे मात्र फुकट गेले, कारण त्यांच्या चाचण्यांत काहीच दोष निघाला नाही. माझे पैसे मला उपयोगी पडले. माझी हाडे ठिसूळ आहेत हे सिद्ध झाले. ‘मी म्हटले चाचणी काय म्हणते किती ठिसूळ झाली आहेत?’ ती म्हणाली, ‘जास्त नाही फक्त पाचच टक्के ठिसूळ आहेत.’ मी म्हणालो म्हणजे ९५ टक्के पैसे फुकट गेले. ‘तेव्हा रागावली आणि म्हणाली काय करू ते सांग.’ पुढे ती कॅल्शियम औषधे, इंजेक्शने घेऊ लागली. खरे तर, तू जास्त काळजी करू नकोस, जरा आहार सुधार एवढेच मी सांगितले होते. ४० वर्षांनंतर वरचेवर चाचण्या करणे आवश्यक आहे हे तर खरेच आहे. परंतु माणसांनी सजग राहावे आणि अतिरेक करू नये हेही खरे आहे.
आतली बातमी सांगतो. एखादे नवे उत्पादन खपावे म्हणून माध्यमांना हाताशी धरून किंवा त्यांना बेसावध ठेवून एखाद्या आजाराच्या बातम्या पसरवल्या जातात. या ठिसूळ हाडांचे तेच झाले. कॅल्शियमच्या उत्पादनाचा खप वाढला आणि या कॅल्शियमच्या दुष्परिणामाच्या बातम्या आता झळकू लागल्या आहेत. २० वर्षांपूर्वी प्रोस्टेट (पुरस्थ) ग्रंथींच्या कर्करोगाबद्दल असेच झाले. पन्नाशीत प्रत्येकाने याची चाचणी करावी अशी टूम निघाली आणि संशयास्पद चाचणी असे ठरवत हजारोंच्या शस्त्रक्रिया झाल्या. आता २० वर्षांनी केलेल्या पाहणीत असे आढळले की शस्त्रक्रिया न केलेले लोकही तेवढेच जगले. आधुनिक विज्ञान यशस्वी नक्कीच, पण त्याकडेही तिरप्या नजरेने बघावे लागते.    
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस                                                           
अग्निमांद्याची लक्षणे
आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाप्रमाणे मानवी शरीरात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्रवह अशी सात धातूंची सात स्रोतसे, मल, मूत्र व स्वेद अशी तीन मलवह स्रोतसे, तसेच अन्न, उदक व प्राणवह असी एकूण तेरा स्रोतसे आहेत. स्त्रियांकरिता शरीरात आणखी दोन स्रोतसे आर्तववह व स्तन्यवह स्रोतसे अशी आहेत. याशिवाय मेंदू, मन यांचा कारभार बघणारे चेतनास्थान एक और स्रोतस आहे. अग्निमांद्य विकारात अन्नवह स्रोतसाचा म्हणजेच प्रामुख्याने आमाशय या अवयवाचा विचार करावा लागतो. आयुर्वेदशास्त्र वेगवेगळय़ा रोगांचा विचार करताना अग्नीच्या बलजठराग्निबलाचा विचार नेहमीच डोळय़ांसमोर ठेवते. आमाशयात आपण खाल्लेले अन्न किमान चार तास पडून राहते. अशा या कफप्रधान आहारावर, आहारातील किंवा औषधातील पित्ताचे संस्कार चांगले झाले तर अग्निमांद्य विकारावर लवकर मात करता येते. आपला अग्निमांद्य विकार आटोक्यात येतोय की नाही याकरिता आपल्या भुकेबरोबरच, आपली मलप्रवृत्ती चिकट नाही ना याकडे संबंधिताचे लक्ष अवश्य हवे. जीभ चिकट असणे, मळ चिकट असणे वा घाण वास मारणे तसेच मलप्रवृत्तीचे समाधान नसणे, अशी लक्षणे ठीक झाली पाहिजेत, असा आयुर्वेदीय चिकित्सेचा सांगावा आहे.अग्निमांद्य विकाराकरिता पोटात घ्यावयाची औषधांची संख्या खूपच आहे. औषधे ही अग्निदीपन म्हणजे सणसणीत भूक लागणे व पाचन म्हणजे खाल्लेले पचेल अशा उद्देशाने दिली जातात. तसेच आपले आमाशय, लहान आतडे व पक्वाशय या तिन्ही अवयवांमध्ये वायू तुंबणार नाही अशीच औषधी योजना हवी. त्याकरिता पोटात घेण्याकरिता भोजनाअगोदर, आरोग्यवर्धिनी व त्रिफळा गुग्गुळ, भोजनानंतर कुमारी आसव, फलत्रिकादि काढा किंवा अभयारिष्ट तारतम्याने घ्यावे. अग्निमांद्य तात्पुरते असल्यास सुंठ, मिरे, पिंपळी चूर्ण जेवणानंतर ताकाबरोबर घ्यावे. तोंडाला चव नसल्यास हिंगाष्टक चूर्ण किंवा आमलक्यादि चूर्ण जेवणाच्या सुरुवातीला घ्यावे. शरीर कृश असल्यास सकाळी च्यवनप्राश घ्यावा. गरज पडली तर रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
४ जानेवारी
१९०८ > ब्राह्मणांनी मांसभक्षणास हरकत नाही, सर्व जाती-जमातींच्या मुलींचीही मुंज करावी, विधवाविवाह धर्मबाह्य ठरत नाही, अशी प्रागतिक मते धर्माभ्यासाच्या आधाराने मांडणारे प्रकांडपंडित राजारामशास्त्री भागवत यांचे निधन. ११ नोव्हेंबर १९५१ रोजी जन्मलेले राजारामशास्त्री ग्रँट मेडिकल कॉलेजात तीन वर्षे शिकले; पण वडिलांच्या मृत्यूमुळे हे शिक्षण सुटले व ते डॉक्टर झाले नाहीत. सर्व धर्माच्या अभ्यासातून त्यांनी ‘ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म’, ‘पार्सी व पार्सी धर्म’ आणि ‘मोगल व मोगली धर्म’ अशी पुस्तके लिहिली. वेदोक्त प्रकरणात त्यांनी शाहू महाराजांची बाजू घेतली व पुढे ‘दीनबंधु’मध्ये लेखनही केले.
–    १९०९ >  लेखक, पत्रकार, विचारवंत, समीक्षक असा चतुरस्र लौकिक मिळवणारे प्रभाकर पाध्ये यांचा जन्म. ‘आस्वाद’, ‘मानव आणि मार्क्‍स’, ‘मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा’ अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.
–    १९१४ >  आधुनिक स्त्रीच्या भावविश्वातील अभिजात काव्य शोधणाऱ्या कवयित्री इंदिरा संत यांचा जन्म. मृण्मयी, मेंदी, शेला, गर्भरेशीम, रंगबावरी आदी कवितासंग्रह, तसेच काही कथासंग्रह व लोकपरंपरांवरील ‘मालनगाथा’ असे विपुल लेखन त्यांनी केले.
navnit.loksatta@gmail.com

First Published on January 4, 2013 1:24 am

Web Title: navneet war and peace
टॅग Navneet