डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

‘परफेक्ट’ माणूस असा कधी कुठं असतो का? जसा ‘सुखी माणसाचा सदरा’ नसतो, तसं परफेक्ट माणूसही नसतो. त्यामुळे आपण परफेक्ट नाही, असं समजून खंत वाटून घेण्यात काय अर्थ आहे?

एखादी आई जर दिवसभर घरात असेल आणि मुलांकडे-घराकडे बघत असेल; तर- आपण बाहेर जाऊन काम करत नाही, आपल्या शिक्षणाचा काही उपयोग नाही, अशी खंत तिला वाटत राहते. ज्या स्त्रिया बाहेर जाऊन काम करतात, त्यांना ही खंत असते की, आपण मुलांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही.

खूप जास्त काम करणाऱ्या बाबांना वाटतं की, आपण मुलांना रोज वेळ देऊ शकत नाही, त्यांना फिरायला घेऊन जाऊ शकत नाही, त्यांचा अभ्यास घेऊ शकत नाही. काही बाबांना वाटतं, आपण आणखी काम करायला पाहिजे, कुटुंबाची आणखी प्रगती करायला पाहिजे. स्वत:शी विसंवादी भूमिका कराव्या लागतात म्हणून अनेकांच्या मनात खंत असते.

एखाद्या विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेत आणखी जास्त गुण का मिळत नाहीत, ही खंत असते. एखाद्या आजीच्या मनात आपलं आयुष्य जास्त चांगल्या पद्धतीनं जगायला हवं होतं, अशी खंत असते. तर एखाद्या आजोबांच्या मनात किती तरी गोष्टी शिकायच्या होत्या त्या राहून गेल्या, अशी खंत असते. कशासाठी खंत वाटून घ्यायची, हे फक्त आपल्याच हातात असतं?

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला पाहिजे की, खंत वाटत राहणं ही कमालीची नकारात्मक आणि तितकीच हतबल भावना आहे. खंत मनाला आणि मग जिवाला कुरतडूत राहते. समाधानी होऊच देत नाही. सतत पण-परंतु चालूच असतात. मात्र, हे ओझं डोक्यात ठेवून जगण्याची काहीच गरज नाही. दु:ख-हतबलता-खंत-निराशा अशी ही साखळी आहे. या भावना एकमेकांत गुंफलेल्याच असतात. ती साखळी अगदी ठरवून मोडावी लागते.

शिवाय खंत वाटून परिस्थितीत काहीच सुधारणा घडवून आणता येत नाही. उलट यानं निष्क्रियता वाढते.

प्रश्न आणि समस्या याशिवाय आयुष्य नसतंच. कोणाचंही आयुष्य ‘परफेक्ट’ किंवा आदर्श नसतं. प्रत्येक जण आपापल्या समस्यांशी लढत असतो. हा संघर्ष कमी पडला म्हणून की काय, त्यात आणखी खंत या नकारात्मक भावनेला जागा कशासाठी करून द्यायची?