02 June 2020

News Flash

कुतूहल : ओझोनचे छिद्र

वातावरणातील ओझोनची मापने १९५७ सालापासून जागतिक पातळीवर नियमितपणे केली जात आहेत.

सूर्याकडून येणारे अतिनील किरण हे सजीवांच्या दृष्टीने घातक आहेत. या अतिनील किरणांपासून सजीवांचे रक्षण करणारे सुरक्षाकवच म्हणजे वातावरणातील ओझोन वायूचा थर. अतिनील किरणांना शोषून घेऊ शकणाऱ्या या ओझोनचा रेणू हा ऑक्सिजनचे तीन अणू मिळून तयार झालेला आहे. वातावरणातील ओझोनची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर ते पन्नास किलोमीटर उंचीवर असणाऱ्या स्थिरावरणात (स्ट्रॅटोस्फिअर) होते. वातावरणातील ओझोनचे प्रमाण मोजण्यासाठी साधारणपणे वर्णपटमापकाचा वापर केला जातो. ओझोनच्या रेणूंचे वातावरणातील प्रमाण स्थिर असणे अपेक्षित आहे.

वातावरणातील ओझोनची मापने १९५७ सालापासून जागतिक पातळीवर नियमितपणे केली जात आहेत. १९८० सालानंतर, ब्रिटिश अंटार्क्टिक सव्‍‌र्हे या मोहिमेतील संशोधकांना, अंटार्क्टिका येथे बसवलेल्या मापकांत वेगळीच गोष्ट आढळली. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तिथल्या हिवाळ्यानंतरच्या महिन्यांत, ओझोनचे प्रमाण १९५७ सालापासून आतापर्यंत कधीही नव्हते इतके कमी झालेले आढळले. १९८५ साली ब्रिटिश संशोधकांनी आपली ही निरीक्षणे ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित केली. या संशोधकांनी ओझोनच्या प्रमाणातील या घटीसाठी क्लोरोफ्लुरोकार्बन या गटातील रसायने जबाबदार असल्याची शक्यता व्यक्त केली. अल्पकाळातच कृत्रिम उपग्रहावरील मापकांद्वारे या ब्रिटिश संशोधकांच्या निरीक्षणांची पडताळणी केली गेली. उपग्रहाने केलेल्या या पडताळणीतून, दक्षिण ध्रुवावरच्या वातावरणातील विस्तृत भागावरील ओझोनचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर घटले असल्याचे स्पष्ट झाले. वातावरणाचा हा भाग तेव्हापासून ‘ओझोनचे छिद्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होण्यास, कृत्रिम खतांच्या वापराद्वारे निर्माण होणारा नायट्रस ऑक्साइड, रेफ्रिजरेटरमध्ये तसेच फवारे मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांतील क्लोरोफ्लुरोकार्बन व इतर अनेक रसायने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. १९७०च्या दशकात केलेल्या, वातावरणातल्या ओझोनच्या या रसायनशास्त्रविषयक संशोधनासाठी डच संशोधक पॉल क्रुटझेन, तसेच अमेरिकन संशोधक मारिओ मोलिना व शेरवूड रोलँड यांना १९९५ सालच्या नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले. या संशोधनाचा परिपाक म्हणून १९८९ साली अस्तित्वात आलेल्या ‘माँट्रिअल प्रोटोकॉल’ या नियमप्रणालीनुसार ओझोन थराला घातक ठरणाऱ्या रसायनांच्या निर्मितीवर आणि वापरावर अनेक बंधने आली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून, काही वर्षे रुंदावत चाललेले हे छिद्र आता पुन्हा भरू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

कॅ. सुनील सुळे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ , office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2019 3:46 am

Web Title: ozone depletion ozone hole facts zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : उच्चार
2 मेंदूशी मैत्री : बालवाडीशास्त्र
3 कुतूहल : एल निन्यो – ला निन्या
Just Now!
X