News Flash

कुतूहल : कागदनिर्मिती

चीनमध्ये रेशमी कापड आणि बांबूच्या पट्टय़ांचाही लिखाणासाठी उपयोग केला जात असे.

प्राचीन काळात लिखाणासाठी भूर्जपत्रे, तालपत्रे, इत्यादींचा वापर होत असे. चीनमध्ये रेशमी कापड आणि बांबूच्या पट्टय़ांचाही लिखाणासाठी उपयोग केला जात असे. प्राचीन इजिप्तमध्ये लिखाणासाठी इ.स.पूर्व तीन-चार हजार वर्षांपूर्वीपासून ‘सायपेरस पपायरस’ या पाणवनस्पतीच्या गाभ्याचा वाळवलेला पातळ काप वापरला जायचा. या ‘पपायरस’चा प्रसार कालांतराने ग्रीक आणि रोमन संस्कृतीत तसेच युरोपमध्ये इतरत्रही झाला. इ.स.नंतर तिसऱ्या शतकाच्या सुमारास या पपायरसची जागा प्राण्यांच्या त्वचेपासून बनवलेल्या, कमी खर्चाच्या पातळ पटलाने घेतली.

कागदाचा शोध चीनमध्ये इ.स.नंतर १०५ साली त्साई लुन या अधिकाऱ्याने हान घराण्याच्या राज्यकालात लावल्याचे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात कागदनिर्मितीची प्रक्रिया याच्या बरीच अगोदर विकसित झाली असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. त्साई लुन याने तुती आणि इतर काही प्रकारच्या झाडाच्या साली, कापडाच्या चिंध्या, असे पदार्थ पाण्यात भिजवून नरम केले, कुटून बारीक केले व त्यापासून त्यांचा एकसंध ताव बनवला. हा ताव म्हणजेच कागद! कागदाचा वापर सुरू झाल्यानंतर, आठव्या शतकात चीनमध्ये या कागदाची पाणी शोषण्याची क्षमता कमी करण्यासाठी स्टार्चसारख्या पदार्थाचा वापर सुरू झाला. कागद बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून चिंध्यांचा वापर त्यानंतर दीर्घ काळ चालूच होता. मात्र या कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा आणि लगदा बनवण्यासाठी लागणाऱ्या अतिश्रमांमुळे अखेर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर लाकडाच्या लगद्याच्या वापराला सुरुवात झाली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी, क्लोरीनद्वारे विरंजन (ब्लीचिंग) करून कागदाचा पिवळेपणा घालवणे शक्य झाले.

कागद हा चीनमधून सहाव्या शतकात कोरियामध्ये आणि सातव्या शतकात जपानमध्ये पोहोचला. त्यानंतर तो ‘रेशीम मार्गा’ने, प्रथम तिबेटमध्ये आणि नंतर सातव्या शतकात भारतामध्ये आला असावा. इ.स. ६७१ मध्ये ये त्संग हा चिनी प्रवासी भारतात आला, तेव्हा भारतात कागद मोठय़ा प्रमाणावर वापरला जात असल्याचे त्याला आढळले होते. त्यानंतर आठव्या शतकाच्या उत्तरार्धात हा कागद आजच्या उझबेकिस्तानामधील समरकंदमाग्रे मध्य आशियात पोचला. कागद युरोपमध्ये अकराव्या शतकात पोहोचला असला तरी, कागद बनवण्याची प्रक्रिया युरोपमध्ये पोहोचण्यासाठी त्यानंतरची काही शतके लागली. आणि या कागदाच्या वापराला आणि उत्पादनाला युरोपमध्ये खरी गती मिळाली ती पंधराव्या शतकात.. छपाईच्या यंत्राचा शोध लागल्यानंतर!

 शशिकांत धारणे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2019 3:52 am

Web Title: paper production
Next Stories
1 मेंदूशी मैत्री.. : न्युरॉन्सच्या नव्या जुळण्यांसाठी!
2 कुतूहल : चष्म्यावर दृष्टिक्षेप
3 मेंदूशी मैत्री..: ‘न्युरो प्लॅस्टिसिटी’मुळे जुळणं आणि रुळणं
Just Now!
X