दक्षिणेतील राज्यांमध्ये मुस्लिमांच्या लब्बाइस, रोथर, मापिल्ला, पठाण वगरे जमाती आहेत. बऱ्याच वेळा या प्रदेशात सर्वसाधारण इस्लाम धर्मीय लोकांचा पठाण या अर्थी पट्टण किंवा पट्टणी असा उल्लेख केला जातो. इस्लामचे आगमन, दक्षिण भारतात उत्तरेकडील प्रदेशांप्रमाणे आक्रमणांतून किंवा सक्तीने धर्मातरातून झालेले नाही. इस्लामच्या जन्मापूर्वी म्हणजे सातव्या शतकापूर्वीही दक्षिणेतील राज्यांमध्ये अरब व्यापाऱ्यांचा राबता होताच. पुढे इस्लाम धर्म स्वीकारलेल्या अरबांच्या आगमनातून, त्यांच्या सौहार्दपूर्ण संबंधांतून शांततापूर्ण पद्धतीने इस्लामचा प्रवेश दक्षिण भारतात झाला.

तमिळनाडूतील पठाणांचा पहिला प्रवेश, अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याच्या फौजेतून चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला. उत्तर भारतातून दक्षिणेतल्या राज्यांमध्ये विशेषत तमिळनाडूत मुस्लिमांचे स्थलांतर प्रामुख्याने तीन वेळा मोठय़ा प्रमाणात झाले. मुहम्मद बिन तुघलक याने आपली दिल्लीची राजधानी देवगिरी येथे हलवली तेव्हा त्याच्याबरोबर अनेक मुस्लीम लोक दिल्लीतून देवगिरीस येऊन स्थायिक झाले. मुहम्मद बिन तुघलकचा सेनाधिकारी जलालुद्दीन अहसान खान हा दिल्ली सल्तनतचा मदुराईचा सुभेदार होता. १३३५ मध्ये त्याने सल्तनतचा अंमल झुगारून स्वतचे स्वतंत्र राज्य घोषित केले.  या काळात तमिळनाडूत उत्तर भारतातील अनेक पठाणांनी स्थलांतर केले.

सतराव्या शतकाच्या अखेरीस औरंगजेबाने  तमिळनाडूवर आक्रमण केलं. त्या काळात म्हैसूरच्या पूर्वेकडील प्रदेशाला कर्नाटक किंवा कर्नाटिक म्हणत. या प्रदेशावरचा मोगलांचा सुभेदार सादातुल्ला खान प्रथमने मोगल सार्वभौमत्व झुगारून स्वतला नवाब घोषित केलं. याचा तमिळनाडूवरही अंमल होता. हा स्वत: पठाण होता  या पठाणांचे पुढचे वंशज आता तमिळ जीवनशैलीशी एकरूप होऊन अस्खलित तमिळ भाषेत बोलतात, दख्खनी उर्दूला आपली मातृभाषा मानतात. पíशयन आणि अरेबिक भाषा ज्ञात असणे हे या तमिळ पठाणांसाठी प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com