विसाव्या शतकापूर्वी स्त्रियांवर लादलेल्या शिक्षण व इतर बाबींविषयीच्या बंधनांवर मात करून गणितात संशोधन केलेल्या सोफिया ऊर्फ सॉन्या कोव्हल्येस्केया यांचे चरित्र स्फूर्तिदायक आहे. १५ जानेवारी १८५० रोजी रशियातील मॉस्को येथे जन्मलेल्या सोफियांची गणितातील रुची लहान वयातच पालकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांच्यासाठी खास शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली, ज्यायोगे त्यांना कलनशास्त्राची ओळख झाली.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही रशियात स्त्रियांना विद्यापीठात प्रवेश नव्हता. पण जर्मनीमध्ये ते शक्य आहे असे समजल्याने सोफिया यांनी व्लादिमिर कोव्हल्येस्केया या पुराजीवशास्त्रज्ञाशी विवाह करून १८६८ मध्ये पतीसमवेत जर्मनीला प्रयाण केले. तेथेही अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी दोन वर्षे हायडेलबर्ग विद्यापीठात उच्च गणिताचा अभ्यास केला आणि मग बर्लिन येथे प्रसिद्ध गणिती वैयरस्ट्रास यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. सन १८७४ मध्ये आंशिक विकलक समीकरणे (पार्शिअल डिफरन्शिअल इक्वेशन्स), शनीच्या कड्यांचे गतिशास्त्र आणि विवृत्ती संकलक (एलिप्टिक इंटिग्रल्स) या विषयांवर प्रकाशित केलेल्या तीन शोधनिबंधांमुळे ग्योटिंगेन विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली.

उच्च दर्जाचे संशोधन करूनही केवळ स्त्री असल्यामुळे त्यांना तिथे प्राध्यापकपद मिळू शकले नाही. मात्र १८८४ मध्ये त्या स्वीडनच्या स्टॉकहोम विद्यापीठात प्राध्यापक तसेच ‘अ‍ॅक्टा मॅथेमॅटिका’ या गणितविषयक नियतकालिकाच्या संपादक झाल्या. गणितात पीएच.डी. पदवी, प्राध्यापकपद आणि संपादकपद हे तिन्ही सन्मान मिळवणारी पहिली महिला सोफिया ठरल्या. त्यांच्या एका शोधनिबंधास १८८८ मध्ये ‘फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’चे ‘प्री बॉर्डीन’ पारितोषिक मिळाले.

आंशिक विकलक समीकरणांसंबंधीचा त्यांचा शोधनिबंध ‘कोशी-कोव्हल्येस्केया सिद्धान्त’ म्हणून प्रसिद्ध आहे. कोशी यांनी सन १८४२ मध्ये सिद्ध केलेल्या या समीकरणांमधील एका विशिष्ट प्रकाराचे सोफिया यांनी व्यापैकीकरण करून पूर्ण सिद्धान्त मांडला.

जेमतेम ४१ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीत गणितात उच्च दर्जाचे संशोधन करणाऱ्या सोफिया यांना ललित लेखनातही रस होता. त्यांनी कादंबरी, नाटके आणि निबंध यांसह आपल्या बालपणीच्या आठवणींवर आत्मचरित्रात्मक लेखनही केले. त्यांच्या संघर्षपूर्ण जीवनावर कादंबऱ्या, चित्रपट आणि दूरदर्शनवरील चरित्रपट निघाले. त्यांच्या सन्मानार्थ रशियामध्ये नाणी आणि टपाल तिकिटे काढण्यात आली. गणिती संशोधनात कृतिशील सहभागासाठी स्त्रियांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘असोसिएशन फॉर विमेन इन मॅथेमॅटिक्स’ या संस्थेतर्फे सोफिया कोव्हल्येस्केया यांच्या नावाने विशेष दिवस साजरा करून गणितातील स्त्री संशोधकांच्या योगदानाकडे लक्ष वेधण्यात येते. – डॉ. मेधा लिमये 

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org