वितळ कताईच्या प्रक्रियेपर्यंत अखंड तंतू किंवा आखूड तंतूंची उत्पादन प्रक्रिया सारखीच असते. परंतु कताई पश्चात प्रक्रियेमध्ये काही फरक असतात. अखंड तंतूंसाठी कताई पश्चात खेंचण आणि गुंडाळणी या प्रक्रिया केल्या जातात. खेंचण प्रक्रियेत बहुवारिकापासून तंतू जेव्हा तयार होतात त्या वेळी त्यामधील बहुवारिकाच्या रेणूंची मांडणी कशीही अस्ताव्यस्त प्रकारची असते. बहुवारिकापासून उत्तम दर्जाचा तंतू  बनविण्यासाठी तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात.
१. बहुवारिकाची लांबी. ही लांबी जेवढी अधिक तेवढी तंतूची गुणवत्ता अधिक.
२. तंतूमध्ये बहुवारिकाच्या रेणूंची मांडणी ही एकमेकांशी आणि तंतूच्या लांबीशी समांतर असावी लागते. रेणूंच्या अशा मांडणीला सुरचना असे म्हणतात. आणि  ३. समांतर मांडणी केलेल्या या रेणूंमध्ये अनेक ठिकाणी बंध तयार होणे.   
तनित्रामधून बाहेर पडणाऱ्या तंतूंमधील रेणूंची अस्ताव्यस्त अशी रचना बदलून रेणूंची एकमेकांस व तंतूंच्या लांबीशी समांतर अशी रचना करण्यासाठी त्यांना खेंच देण्यात येतो. हा खेच, खेचरुळांच्या साहाय्याने देण्यात येतो. सर्वसाधारणपणे या प्रक्रियेमध्ये तंतू मूळ लांबीच्या ५ ते ६ पट खेचले जातात. या खेचामुळेच तंतूतील गुणधर्माचे प्रकटीकरण होते. या खेंचण प्रक्रियेनंतरच तंतूंची ताकद व तन्यता वाढते आणि तंतू लवचीक व स्थितिस्थापक बनतात.
खेंचण प्रक्रियेनंतर गुंडाळणी प्रक्रियेत वापरण्यायोग्य तंतू तयार होतात. हे तंतू साठवणी आणि वाहतूक सोयीची व्हावी यासाठी एका मोठय़ा बॉबिनवर गुंडाळले जातात. अखंड तंतूंच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये गुंडाळण्याची गती म्हणजेच वितळ कताईची गती अतिशय महत्त्वाची असते. सुरुवातीच्या काळात ही गती १२०० ते २००० मी. प्रति मिनिट इतकी असे. या गतीने बाहेर पडणाऱ्या तंतूमध्ये रेणूंची मांडणी अस्ताव्यस्त अशी असे. त्यामुळे अशा तंतूंना खेंचण प्रक्रियेत खेंच देऊन तंतूंची सुरचना करावी लागत असे. परंतु कताईची उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जेव्हा कताईची गती वाढविण्यात आली तेव्हा असे लक्षात आले की, अशा अधिक गतीने कताई करताना तनित्र ते गुंडाळणी या मार्गामध्ये कताई केलेल्या तंतूंवर जो ताण पडतो, त्यामुळे तंतूतील रेणूंची काही प्रमाणात सुरचना होते आणि कताईचा वेग जितका अधिक तितकी रेणूंची सुरचना जास्त प्रमाणात होते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – संस्थान फरीदकोट
पंजाबमध्ये फिरोजपूरच्या दक्षिणेस २० कि.मी. अंतरावर असलेले फरीदकोट हे स्वातंत्र्यपूर्व काळात एक महत्त्वाचे संस्थान होते. जैसलमेर राज्याच्या संस्थापकाचा एक वारस कापूर याने १६४३ साली कोटकापुरा हे राज्य स्थापन केले. १७६२ साली त्याचे दोन भाग होऊन त्यातील एक भाग लाहोरच्या शिखांनी घेतला व ‘मोकलहर’ नावाचा दुसरा भाग  जैसलमेर वारसाकडे राहून पुढे त्याचे नाव फरीदकोट असे झाले. ते कसे?  मोकलहर किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम चालू असताना बाबा शेख फरीदुद्दीन गंजशेखर हा सुफी संत त्या गावातून जात होता. सनिकांनी त्याला पकडून बांधकामावर मजूर म्हणून लावून घेतले. राजा फजा मोकलसीन याने बाबाची चौकशी केली व तो सुफी संत आहे हे कळल्यावर त्याची माफी मागून त्याचे आशीर्वाद घेतले. या बाबा फरीदुद्दीनच्या नावावरून आपल्या किल्ल्याचे व राज्याचे नाव फजाने फरीदकोट असे ठेवले. १८०३ साली महाराजा रणजीतसिंग यांनी हे राज्य घेतले परंतु १८०९ मध्ये ब्रिटिशांशी झालेल्या अमृतसर करारामुळे फरीदकोटचे राज्य राजा पहारसिंगकडे आले. मुस्लीम बहुसंख्य असलेल्या या राज्यात फरीदकोट आणि कोटकपुरा ही दोन शहरे व १६७ खेडी अंतर्भूत होती. ११ तोफ सलामीचा बहुमान असलेल्या या राज्याचे क्षेत्रफळ होते १६५० चौ.कि.मी.  
या राज्याचे स्वातंत्र्योत्तर वारस हिरदरसिंग ब्रार हे अत्यंत व्यवहारी होते. इतर संस्थानिकांप्रमाणे पशांची उधळपट्टी चन करण्यासाठी न करता त्यांनी सोने, जमिनी यात मोठी गुंतवणूक केली. या महाराजाच्या २०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या हक्काचे प्रकरण बरेच गाजले. महाराजाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा व एक मुलीच्या मृत्यूनंतर हयात असलेल्या दोन मुली कायदेशीर वारस होत्या. परंतु मृत्युपत्रात सर्व मालमत्ता राज्याच्या सेनाधिकाऱ्यांना द्यावी असा उल्लेख होता. या संबंधीचा खटला न्यायालयात २१  वष्रे चालला. सादर केलेले मृत्युपत्र बनावट असून सर्व मालमत्ता दोन मुलींमध्ये विभागून द्यावी असा निर्णय न्यायालयाने जून २०१३ मध्ये दिला आहे.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com