08 December 2019

News Flash

कुतूहल – डॉलीची गोष्ट

या दोहोंचे फलन घडवून आणण्यासाठी पेशी आणि बीजांड एकमेकांच्या जवळ आणण्यात आले.

‘क्लोनिंग’ म्हणजे सजीवांच्या हुबेहूब प्रती तयार करण्याचे तंत्र. १९९७ साली स्कॉटलंडमधील रोझलीन इन्स्टिटय़ूटच्या इयान विल्मुट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या क्लोनिंगच्या यशस्वी प्रयोगावरील शोधनिबंध ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला. त्याअगोदर दहा वर्षे या संशोधकांचे क्लोनिंगद्वारे मेंढीच्या निर्मितीचे प्रयत्न चालू होते. या काळात या संशोधकांनी मेंढीची प्रत तयार करण्याचे सुमारे पावणे तीनशे प्रयत्न केले.

या प्रयोगासाठी ‘फिनिश डॉर्सेट’ या जातीच्या पांढऱ्या रंगाच्या मेंढीचा वापर केला गेला. प्रथम त्यांनी या मेंढीच्या आचळातील पेशी काढून घेतल्या. त्यानंतर ‘स्कॉटिश ब्लॅकफेस’ या काळे तोंड असणाऱ्या जातीच्या मेंढीचे फलन न झालेले बीजांड घेतले. या बीजांडाचे केंद्रक काढून टाकण्यात आले. या दोहोंचे फलन घडवून आणण्यासाठी पेशी आणि बीजांड एकमेकांच्या जवळ आणण्यात आले. विद्युत स्पंदाद्वारे हे बीजांड पेशीच्या पटलातून आत ढकलण्यात आले. यामुळे पेशी आणि बीजांड एकत्र येऊन त्यांचे फलन घडून आले. बीजांड आणि पेशीच्या फलनातून तयार झालेल्या पेशीची वाढ योग्यरीत्या होत आहे की नाही, याचे सहा-सात दिवस प्रयोगशाळेतच निरीक्षण केले गेले. त्यानंतर ही फलित पेशी दुसऱ्या एका स्कॉटिश ब्लॅकफेस जातीच्या पाहुण्या मेंढीच्या गर्भाशयात प्रस्थापित केली गेली. गर्भारपणाचा सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यावर या ब्लॅकफेस मेंढीने, जिच्या आचळाच्या पेशी वापरल्या होत्या त्या फिनिश डॉर्सेट जातीच्या पांढऱ्या रंगाच्या मेंढीला जन्म दिला. तिचेच नाव ‘डॉली’! डॉली ही मूळ फिनिश डॉर्सेट मेंढीची हुबेहूब प्रत होती. ही डॉली एकूण पावणेसात वर्षे जगली. फुप्फुसाचा विकार व तीव्र संधिवात जडल्यामुळे डॉलीला मारण्याचा निर्णय घेण्यात आला.

क्लोनिंगमध्ये अपत्याच्या पालकाच्या केंद्रकातील डीएनएचा क्रम राखला जात असल्याने, जन्माला येणाऱ्या अपत्यात आणि त्याच्या पालकात अतिशय साम्य असते. डॉलीच्या क्लोनिंगच्या अगोदर, दोन्ही पेशी भ्रूणस्थितीतील घेऊन त्यांचे क्लोनिंग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात केंद्रक काढून टाकलेल्या बीजांडाशी एखाद्या भ्रूणाच्या केंद्रकसहित पेशीचा किंवा फक्त त्यातील केंद्रकाचा संयोग घडवून आणला जातो. अशी उदाहरणे १९५०-६० च्या दशकांपासून आढळतात. परंतु क्लोनिंगच्या तंत्रात स्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्या मीलनातून गर्भधारणा केली जात नाही. क्लोनिंगच्या तंत्राचे वेगळेपण हेच आहे!

डॉ. रंजन गर्गे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

First Published on October 10, 2019 2:18 am

Web Title: production of sheep by cloning zws 70
Just Now!
X