आधुनिक काळात कोणतेही औषध न देता समुपदेशन करून उपचार करण्याची सुरुवात डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी केली. त्याला त्यांनी सायकोअ‍ॅनालिसिस म्हणजेच मनोविश्लेषण असे नाव दिले. त्यानंतर मानसोपचाराच्या अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत.

अशीच एक मानसोपचार पद्धत प्राचीन काळी रूढ होती. आयुर्वेदाच्या चरक संहिता ग्रंथात ती सत्त्वावजय चिकित्सा या नावाने सांगितलेली आहे. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी अंत:करण बनलेले असते. त्यातील रज किंवा तम गुण वाढला तर आरोग्य बिघडते. अशा वेळी सत्त्वगुणाला विजय मिळवून देणारी उपचार पद्धती म्हणजे सत्त्वावजय होय. चरकाचार्य यांनी तीन प्रकारच्या उपचार पद्धती सांगितल्या आहेत. आज वैद्य वापरतात तिला युक्ती व्यपाश्रय म्हटले जायचे. त्यामध्ये वैद्य युक्तीने औषधे किंवा पंचकर्मे रुग्णाला देतो. सत्त्वावजयमध्ये मात्र कोणतीही औषधे वापरली जात नाहीत. तर मुख्यत: ध्यान आणि अन्य योगक्रियांचा उपयोग उपचार म्हणून करून घेतला जातो. हे ध्यान वैद्य रुग्णाला शिकवतो आणि त्याला ते करायला समुपदेशनातून प्रेरणा देतो, आधार देतो.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Shani Dev Vakri In Kumbh saturn vakri in Aquarius these three zodiac sign big success in life
३० वर्षांनंतर शनिदेवाची कुंभ राशीत वक्री चाल; ‘या’ राशींना येतील सोन्याचे दिवस? मिळू शकेल बक्कळ पैसा

या उपचारांची व्याख्या चरकाचार्य यांनी अनारोग्यकारक गोष्टींपासून मनाला आवरणे म्हणजेच मनोनिग्रह अशी केली आहे. असा मनोनिग्रह करणाऱ्या बुद्धीच्या भागाला  ‘धृति:’ असे नाव आहे. ही धृति: दुबळी झाली की एखादी कृती चांगली नाही हे माहीत असूनदेखील माणूस स्वत:ला थांबवू शकत नाही. तेलकट खाणे चांगले नाही याची माहिती असली तरी वडापाव खाण्याचा मोह होतो आणि सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा छापलेला असला तरी सिगारेट पेटवली जातेच. मोह या भावनेमुळे हे घडते. धृति: विकसित झाली की अशा गोष्टी टाळणे शक्य होते. साक्षी ध्यानाच्या नियमित सरावाने धृति: विकसित होते, सत्त्वगुणाची शक्ती वाढते आणि विकार दूर होतात.

माणसाच्या प्री-फ्रन्टल कोर्टेक्स म्हणजे मेंदूच्या पुढील भागात भावनांचे नियमन करणारी केंद्रे आढळून आली आहेत. ती ध्यानाच्या सरावाने विकसित होतात हेदेखील संशोधनात स्पष्ट झाले आहे. ध्यानाचा उपयोग मेंदूचा व्यायाम म्हणून करून घेणाऱ्या सत्त्वावजय चिकित्सेचा प्रसार सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढणारे शारीरिक, मानसिक आजार टाळण्यासाठी आणि बरे करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात होणे गरजेचे आहे. – डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com