अणुक्रमांक २५ असलेले मँगेनीज हे मूलद्रव्य राखाडी पांढरट रंगाचे – ठिसूळ, पण कठीण असते. धातू प्रकारातील हे मूलद्रव्य लोहासारखे असले तरी त्याला चुंबकीय गुणधर्म नाहीत. ग्रीकमधील मॅग्नेशिया प्रदेशात सापडणाऱ्या मॅग्नेशियाअल्बा व मॅग्नेशिया नेग्रा खनिजांना अनुक्रमे मॅग्नेशियम ऑक्साइड व मँगेनीज डायऑक्साइड संबोधण्यात आले. मँगेनीज डायऑक्साइडमधील मुख्य घटकाचे नामकरण झाले मँगेनीज!

पृथ्वीच्या कवचात विपुल आढळणाऱ्या मूलद्रव्यांच्या क्रमवारीत मँगनीज १२व्या क्रमांकावर असून ते निसर्गात मुक्त अवस्थेत आढळत नाही. पायरोलुझाइट (Pyrolusite) हे त्याचे मुख्य खनिज असून त्यातील प्रमुख घटक मँगेनीज डायऑक्साइड आहे. पायरोलुझाइटचा वापर अश्मयुगीन काळात गुहेतील चित्र रंगवण्यासाठी केल्याचे आढळते. रोम व इजिप्तमध्ये काच तयार करताना पायरोलुझाइट मिसळत. लोह व इतर घटकांच्या भेसळीमुळे काचेला हिरवट रंगाची झाक येई. पायरोलुझाइट मिसळल्याने काच रंगहीन, स्वच्छ व स्पष्ट होई म्हणून त्याला काच धुण्याचा साबण म्हणत असत. ह्य़ाच पायरोलुझाइटचे प्रमाण वाढविले असता काचेला जांभळा रंग येई अशा प्रकारे काचेला रंगहीन व रंगीत करण्यासाठी पायरोलुझाइट वापरत.

लोह व मँगेनीजमधील साधम्र्य व मृदेत एकत्रित आढळणे यामुळे रसायनशास्त्रज्ञांना या दोन मूलद्रव्यांतील फरक कळायला काही अवधी जावा लागला. स्विडिश खनिजतज्ज्ञ जोहान गॉटीलेबने सर्वप्रथम हा फरक ओळखला. स्विडिश शास्त्रज्ञ कार्ल शीलने क्लोरीनच्या निर्मितीसाठी पायरोलुझाइटचा वापर केला तेव्हा त्यात एखादे नवे मूलद्रव्य असण्याची शक्यता वर्तवली. त्या दृष्टीने सन १७००च्या आसपास अनेक शास्त्रज्ञांनी मँगेनीज वेगळे करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. सन १७७४मध्ये घान नावाच्या शास्त्रज्ञाने दाखविले की मँगेनीज डायऑक्साइड व कोळसा यांचे मिश्रण तापविले असता मँगेनीज डायऑक्साइडमधील ऑक्सिजनचा कार्बनशी संयुग होऊन वायुरूपी कार्बन डायऑक्साइड मुक्त होतो व मँगेनीज वेगळे होते.

मँगेनीजची संयुगे विविध रंगछटा दाखवतात. अ‍ॅमेथिस्ट रत्नातील जांभळा रंग मँगेनीजमुळेच असतो. मँगेनीज ठिसूळ असल्यामुळे शुद्ध धातू म्हणून त्याचा वापर होत नसला तरी त्याची उपयुक्तता विस्तृत असून औद्योगिक, जीवशास्त्र, कृषी, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत त्याच्या संयुगांचा वापर केला जातो. खानिजाला सल्फाइड व ऑक्साइड विरहित करण्याच्या गुणधर्मामुळे धातू शुद्धीकरणाच्या क्षेत्रात मँगेनीजला पर्याय नाही.

– मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org