News Flash

शेवटचं निष्क्रिय मूलद्रव्य

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असं आपण म्हणतो.

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असं आपण म्हणतो. रसायनशास्त्रातल्या मूलद्रव्यांनासुद्धा हे लागू पडतं. काही व्यक्ती फारच संवेदनशील असतात; त्यांच्या भावना टोकाच्या असतात. काही व्यक्ती मात्र अगदी तटस्थपणे वागतात; तर काही संयमी, शांत स्वभावाच्या असतात. रासायनिक मूलद्रव्यांमध्येसुद्धा ही विविधता आपल्याला पाहायला मिळते. काही मूलद्रव्यं अत्यंत अस्थिर असतात; ती लगेच रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात. याउलट काही मूलद्रव्यं मात्र रासायनिक अभिक्रियेत आजिबात सहभागी होत नाहीत. अशा रासायनिक अभिक्रियेत भाग न घेणाऱ्या मूलद्रव्यांचा एक गट आहे – निष्क्रिय मूलद्रव्यांचा गट. हेलिअम, निऑन, अरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन या निष्क्रिय मूलद्रव्यांच्या पंक्तीतलं शेवटचं मूलद्रव्य आहे रेडॉन! ही सगळी अधातू मूलद्रव्यं आहेत आणि सर्वसाधारणपणे वायुरूपात आढळतात.

रेडॉनचा इतर निष्क्रिय वायूंपेक्षा वेगळा गुणधर्म म्हणजे हा वायू किरणोत्सारी आहे. शास्त्रज्ञांनी जी किरणोत्सारी मूलद्रव्यं शोधली त्यामध्ये शोधलेलं पाचवं मूलद्रव्य हे रेडॉन होतं.

रॉबर्ट ओवेन्स आणि अन्रेस्ट रुदरफोर्ड यांनी १८९९ साली रेडॉन-२२० या रेडॉनच्या नसíगक समस्थानिकाचा शोध लावला. थोरिअमच्या संयुगातून वायुरूपात बाहेर पडणाऱ्या या वायूचं नाव त्यांनी ‘थोरिअम एमॅनेशन’ असं ठेवलं.

फ्रेडरिक अर्न्‍स्ट डॉर्न याला १९०० साली रेडिअमच्या संयुगातून किरणोत्सारी वायू बाहेर पडत असल्याचं आढळलं. रेडिअमच्या संयुगातून बाहेर पडणाऱ्या या वायूला त्याने  ‘रेडिअम एमॅनेशन’ असं नाव दिलं. खरं म्हणजे १८९९ सालीच रेडिअमच्या संयुगातून किरणोत्सारी वायू बाहेर पडत असल्याचं निरीक्षण मेरी क्युरी आणि पिअरी क्युरी यांनी नोंदवलं होतं. तब्बल एक महिना हा वायू रेडिअमच्या संयुगातून बाहेर पडत असल्याचं त्यांना आढळलं होतं. हा वायू म्हणजेच रेडॉन-२२२ हे रेडॉनचं समस्थानिक होतं.

त्यानंतर १९०३ साली आंद्रे लुईस देब्यर्न याने अ‍ॅक्टिनिअमच्या संयुगामधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सारी वायूचा शोध लावला आणि त्याला ‘अ‍ॅक्टिनिअम एमॅनेशन’ असं नाव दिलं. हे खरं तर रेडॉनचं ‘रेडॉन-२१९’ हे समस्थानिक होतं.

१९२३ साली या सगळ्या किरणोत्सारी समस्थानिकांसाठी ‘रेडॉन’ हे एकच नाव स्वीकारण्यात आलं. पण १९०३ ते १९२३ या वीस वर्षांच्या काळात बरंच काही घडलं होतं.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2018 12:04 am

Web Title: radon chemical element
Next Stories
1 जे आले ते रमले.. : एडवर्ड बेलफोर यांचे कार्य (२)
2 कुतूहल : न पाहिलेल्या मूलद्रव्याचा शोध
3 जे आले ते रमले.. : एडवर्ड बेलफोर (१)
Just Now!
X