लोहमार्गावरून जाताना आगगाडीचा प्रचंड दाब लोहमार्गावर पडतो. तरी त्या दाबाचे व्यापक प्रसरण हे रूळ सुरक्षित आणि निर्धारित स्थितीत राहण्यासाठी अतिआवश्यक असते. त्यासाठी सर्वात खालच्या नैसर्गिक भूपृष्ठावर माती टाकून सपाट केलेल्या पायास्तरावर (फॉम्रेशन) खडीचा (बॅलास्ट) थर टाकला जातो. त्यावर ठरावीक अंतरावर आडव्या तुळई (स्लीपर्स) ठेवून रुळांना त्या स्लीपर्सशी घट्टपणे जखडून ठेवले जाते. या सर्व घटकांसाठी गणिती पद्धतीने सुचवलेली परिमाणे परिस्थितीनुसार वापरली जातात.

पाया (फॉम्रेशन) : ब्रॉड गेज मार्गासाठी पाया ६.१० मीटर (२० फूट) रुंदीचा, तर मीटर गेज मार्गासाठी पाया ४.८ मीटर (१६ फूट) रुंदीचा असतो. त्याची उंची २६ ते ४० सेंटिमीटर इतकी ठेवली जाते. पाया सहसा सामान्य मातीचा असतो.

बॅलास्ट : दगड फोडून तयार केलेल्या खडीचा २० ते ३० सेंटिमीटर उंचीचा स्तर वरील पायावर बहुधा उभारला जातो. काही क्षेत्रांत वाळू, मुरुम आणि कोळशाची राख बॅलास्टसाठी वापरली जाते. खडीचा आकार कुठल्याही मितीत ५० मिलिमीटरच्या जवळपास असावा लागतो. रुळांचे सांधे बदलणाऱ्या क्षेत्रात खडीचा आकार मात्र २५ मिलिमीटर असतो. योग्य चाळण्यांनी पाहिजे ती खडी निवडली जाते. स्लीपर्सच्या टोकांशी ४५ अंशांच्या कोनात खडी रचायची असते. रुळांच्या जवळपास अतिरिक्त खडी किती असावी, याचेही कोष्टक आहे.

स्लीपर्स : स्लीपर्स हे लाकूड, ओतीव लोखंड, ठोकलेले लोखंड किंवा काँक्रीटचे असतात. काँक्रीट स्लीपरचे आयुष्य दीर्घ (जवळपास ६० वर्षे) असते. शिवाय गंज किंवा वाळवी यांनी खराब होत नसल्यामुळे ते अधिकतर वापरले जातात. ब्रॉड गेजसाठीच्या काँक्रीट स्लीपरचे वजन सरासरी २६७ किलोग्रॅम आणि रुंदी २५.४ सेंटिमीटर असते. दोन स्लीपर्समधील अंतर ६० सेंटिमीटर असते. एका किलोमीटरमध्ये १६६० स्लीपर्स बसवले जातात. दोन स्लीपर्समधील अंतर रुळांच्या प्रकाराप्रमाणे बदलले जाते.

रूळ : ब्रॉड गेजसाठीच्या एका रुळाची लांबी १३ मीटर आणि वजन ५२ किलोग्रॅम प्रति मीटर ठरवले गेले आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष स्टीलचे भौतिक आणि रासायनिक गुणही निर्धारित केलेले आहेत. तसेच दोन रूळ जोडणाऱ्या पट्टय़ा (फिशप्लेट), त्यांचे स्क्रू आणि रूळ स्लीपर्सशी जखडून ठेवण्यासाठी कडय़ा कशा असाव्यात, याबाबतची परिमाणे भारतीय रेल्वेने ठरवली आहेत.

– डॉ. विवेक पाटकर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : शंकरनकुट्टी पोट्टेक्काट यांचे साहित्य

‘प्रभाती कान्ति’ हा शंकरनकुट्टी पोट्टेक्काट  यांचा पहिला काव्यसंग्रह १९३६ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एकंदर २४ कथासंग्रह, दहा कादंबऱ्या , १८ प्रवासवर्णनपर संग्रह, चार नाटके, दोन लघुनिबंधसंग्रह आणि दोन काव्यसंग्रह असा त्यांचा साहित्यवृक्ष बहरत गेला.  पहिली ‘नाटन प्रेमम्’ ही कादंबरी १९४२ साली प्रकाशित झाली, तर कथासंग्रहांपैकी पहिला ‘मणिमालिका’ हा १९४४ मध्ये प्रकाशित झाला.

लेखकाच्या मते साहित्य केवळ वाचनासाठी नसून काहीतरी समजून घेण्यासाठी आहे. ते जर तुम्हाला आसपासच्या वस्तुस्थितीचे ज्ञान देत नसेल, तर त्याचा उद्देशच नष्ट होतो. साहित्याने जीवनाचा आरसा व्हायला हवे आणि नेहमीच लेखकाच्या जीवनाचे प्रतिबिंब त्यात पडलेले दिसायला हवे, असे त्यांचे आग्रह होते. पोट्टेक्काट यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे वाचकाला आजही जवळची वाटतात, ती याचमुळे. रोजच्या जीवनातले सूक्ष्म प्रसंग रेखाटून, त्यांतील आशय पोट्टेक्काट सांगतात. छोटय़ा-छोटय़ा, पण महत्त्वाच्या घटना त्यांच्या कथांचे आधार ठरतात.

ज्या गावात पोट्टेक्काट यांचे बालपण गेले त्या गावाची कथा ‘ओरु देशात्तिन्ते कथा’ या कादंबरीत त्यांनी सांगितली. तर ‘विषकन्यका’ ( १९५८) या कादंबरीत त्यांनी उत्तर मलबारच्या किनाऱ्यावर येऊन राहिलेल्या स्थलांतरितांची कथा सांगितली आहे. या भागातील प्रतिकूल हवामान, हिंस्र पशूंचा संचार, यांच्याशी केलेल्या संघर्षांची ही गाथा आहे. ‘तेरुविन्ते कथा’ ही कादंबरी कालिकतच्या एका रस्त्यावर घडते. या कादंबऱ्यांतून लेखकाला सामाजिक परिस्थितीविषयी वाटणारी चिंता आणि त्यामागची आत्मीयता स्पष्टपणे जाणवते.

पोट्टेक्काट यांनी भरपूर प्रवासवर्णनपर पुस्तके लिहून मल्याळम् साहित्यातील प्रवासवर्णनांचे दालन समृद्ध केले. ‘काश्मीर’ (१९४७) ‘इंडोनेशियन डायरी’, ‘सोविएत डायरी’, ‘नेपालयात्रा’ अशा त्यांच्या अनेक प्रवासवर्णनपर पुस्तकांना आज गतकाळ टिपणारी पुस्तके म्हणून संदर्भमूल्यही निश्चितच आहे.

१९६१ मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार, केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार तसेच ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार असे तीन्ही पुरस्कार त्यांना ‘ओरु तेरुतिन्ते कथा’ याच कादंबरीसाठी मिळाले. त्यांच्या काही कथा-कादंबऱ्यांचे अनुवाद जर्मन व इटालियन भाषेतही झाले.

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com