महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्हय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तवान, हवाई, वॉिशग्टन, को-१ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व मुबलक असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगांवरही ते गुणकारी आहे.
कच्च्या परंतु पूर्ण वाढ झालेल्या फळांपासून पेपेन तयार केले जाते. पेपेन काढल्यानंतर पिकलेल्या पपईला बाजारात चांगला दर मिळत नाही. अशी फळे जॅम तयार करण्यासाठीसुद्धा वापरली जातात. पूर्ण वाढ झालेल्या कच्च्या पपईला उभ्या चिरा देऊन काढलेल्या ओल्या किंवा वाळवलेल्या चिकास ‘पेपेन’ म्हणतात. पपईची फळे ७०-७५दिवसांची झाल्यापासून ते १००-११० दिवसांपर्यंत चीक काढला जातो. केएमएसचा (पोटॅशियम मेटाबायसल्फेट) वापर करून चिकाची प्रत टिकवता येते. चीक व्हॅक्युम ड्रायरमध्ये वाळवून त्याची पावडरही करता येते.
पेपेनला व्यापारीदृष्टय़ा फार महत्त्व आहे. प्रामुख्याने मटण मऊ करण्यासाठी ते वापरतात. त्यामुळे मटण लवकर शिजते, पचनास हलके बनते व चवीस रुचकर लागते. कातडी कमावण्याच्या कामात, बेकरी उद्योगात, कापड गिरण्यांमध्ये कपडय़ांना चकाकी आणण्यासाठी, बीयर स्वच्छ करण्यासाठी, लॉण्ड्रीमध्ये कपडय़ांवरील डाग घालवण्यासाठी, पाचक औषधे तयार करण्यासाठी, कागद कारखान्यांमध्ये, फोटोग्राफीमध्ये तसेच टूथपेस्ट, टूथ पावडर व च्युइंगगम तयार करण्यासाठी पेपेनचा उपयोग होतो.
पेपेन काढण्यासाठी पपईच्या को-२, को-५, को-७ या जातींची लागवड केली जाते. या जाती तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. पपईची वॉिशग्टन ही जात खाण्यासाठी तसेच पेपेन काढण्यासाठी योग्य समजली जाते.
पूर्ण वाढ झालेल्या मोठय़ा आकाराची कच्ची पपई, चुन्याचे द्रावण आणि साखरेचा पाक यांपासून टुटीफ्रूटी बनवता येते. प्लास्टिकच्या हवाबंद पिशव्यांमध्ये ती साठवता येते. पपईचा लगदा करून त्यापासून बनवलेल्या रसापासून जेली बनवता येते. र्निजतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये ती साठवता येते.
-डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – इंग्रज
मुळात इथे इंग्रज आले ते व्यापार करण्यासाठी. त्यांची एक ख्याती दुकानदार अशीच आहे. ते गेले ठिक ठिकाणी, किंबहुना त्यांनी जगाच्या दोन तृतीयांश भागावर एक ना एक तऱ्हेने राज्य केले. पण त्यांची वागणूक जो भूप्रदेश त्यांनी काबीज केला तिथल्या लोकांवर ठरली. ज्याला अगदीच अप्रगत किंवा जंगली म्हणता येईल अशा देशांमधली त्यांची वागणूक क्रूर या शब्दानेच वर्णन करता येईल. भारतात मात्र एका मृतप्राय पण एकेकाळच्या प्रगत संस्कृतीची चिन्हे सर्वत्र दिसली. आणि ते इथे बहुतांशी सौम्यच वागले. ते आल्यानंतर भारतातली भारतीयांची स्थिती घसरतच गेली. एकेकाळचे राजेराजवाडे काही अपवाद सोडता भोगी आणि लालसू झाले होते आणि मनाने जर्जर होते. दुही होती. एकच गोष्ट इथे भरपेट होती ती म्हणजे कच्चा माल. तो त्यांनी त्यांच्या आणि इतर पाश्चिमात्य देशातल्या कारखान्यांमधून जळणासारखा वापरून पक्का माल बनवून अमाप नफा कमावला आणि ह्या नफ्याची सवय लागल्यावर राजकीय पावले टाकत हळूहळू एकही मोठे युद्ध न करता सत्ता काबीज केली आणि गाजवली.
इंग्लंडमधले अगदी सटरफटर लोकही इथे सत्ता गाजवून गेले, पण शेवटी एतद्देशीयांशिवाय सत्ता चालवणे अवघड असते. म्हणून हुकूमी नोकरशाही निर्माण करण्यासाठी त्यांनी इथे आधुनिक इंग्रजी शिक्षण आणले आणि त्या इंग्रजी शिक्षणाच्या तळ्यात आणि नद्यांमधून जेव्हा मूळचे हुशार पण सद्यस्थितीत पिचलेले भारतीय लोक लीलयेने पोहू लागले तेव्हा इंग्रज आश्चर्यचकितही झाले आणि बिचकलेही. आपला व्यापार करण्यासाठी त्यांनी रस्ते बांधले, रेल्वे आणली, पण ह्य़ा दळणवळणामुळे भारतीयही जोडले गेले.
इंग्रज अभ्यासू म्हणूनही ख्यातनाम आहेत. त्यांनीच त्यांच्या भाषेत भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला लाज वाटेल इतक्या सखोलपणे केला. आपली रम्य निसर्गस्थळे, इथल्या वनस्पती आणि प्राणी ह्य़ांच्या चतुरस्र नोंदी केल्या. पण होणार होते तेच शेवटी घडले.
 तुमच्या देशात लोकशाही आणि इथे दडपशाही असे का? असा प्रश्न भारतीय लोक त्यांना इंग्रजीतच विचारू लागले. तळ्यातला त्यांनीच सोडलेला मासा आता समुद्रात पोहू लागला आणि काळाच्या ओघात दुसरे महायुद्ध जिंकल्यावरही ते इंग्रज पार दमून गेले.
तेव्हा महाभारतात जे घडले तेच इथे झाले. पांडव जिंकले होते, पण त्यांचा सुवर्णकाळ संपल्यातच जमा झाला होता. तसेच इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य देणे भाग पडले. पण आपण जुने भिडू आहोत ही गोष्ट दोघांनी जाणली, कारण दोन्ही देश समजूतदार होते. म्हणूनच आपण Common wealth  कधीही सोडले नाही. उद्या आपण आणि पाश्चिमात्यांबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस- आयुर्वेदीय प्रथमोपचार, तातडीचे उपचार : भाग ३
आयुर्वेदात सहा प्रकारे रोगांचा सामना करण्याची सामान्य दिशा दाखवली आहे.  रोगांतील प्रमुख दोष, प्रत्यक्ष रोग आणि रोग व दोष या तिन्हींचा विचार, उपचार वा चिकित्सेत केला जातो. काही वेळाऔषधे वा उपचार, रोग व दोष यांच्या विरुद्ध गुणांचे असतात. तर काही वेळेस रोग व दोषांचे समान गुणांनी, दुखण्यांचा प्रतिकार केला जातो. आयुर्वेदीय उपचारांची दिशा सांगताना शास्त्रकारांनी तीन ढोबळ मार्ग सांगितले आहेत. वातविकारांचा सामना करताना वाताचे अनुलोमन, त्या त्या क्षेत्रातील वायूला मोकळी वाट करून देणे ही दिशा ठेवावयास हवी. पित्त विकाराचा सामना करताना थोडे जपून व सांभाळून उपचार हवा. पित्त म्हणजे जावईबापू. त्यांना दुखवून चालत नाही. त्यांच्या कलाने, त्यांचा राग न वाढविता, म्हणजेच शरीरात पित्तक्षोभ होणार नाही असे शमन-उपचार करावे. कफविकारात शत्रुवत कफाचा निर्दयपणे बीमोड करावा असा शास्त्राचा सांगावा आहे. असे असले तरी कफविकाराचा सामना करण्यासाठी सदैव इमर्जन्सी ट्रीटमेंट लागतेच असे नाही.
आयुर्वेदातील म्हणून सांगितलेली इमर्जन्सी ट्रीटमेंट ही साधी सोपीच व सर्वत्र सदा सर्वकाळ मिळू शकणारी असावी असे आम्हाला वाटते. आयुर्वेदात शेकडो ग्रंथ आहेत. त्यातील अथर्ववेद, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगसंग्रह, अष्टांग हृदय, भावप्रकाश, माधवनिदान, शारंगधरसंहिता, योगरत्नाकर व भौत्रज्यरत्नावली हे प्रमुख ग्रंथ आहेत. हे ग्रंथ स्वास्थ्यरक्षण व रोगनिवारण या ध्येयाने लिहिले गेले आहेत. यच्चयावत मानवाच्या, पशुपक्ष्यांच्या निरामय जीवनाकरिता आर्य वैद्यकाने खूप सखोल व्यापक विचार केला आहे. ‘व्याधे: तत्त्वपरिज्ञानं, वेदनायाश्च निग्रह:। एतद वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्य: प्रभुरायुष:।।’ – वैद्य हा आयुष्याचा प्रभू नाही. रोग समजावून घेऊन वेदना कमी करणे, यात वैद्याचे वैद्यत्व आहे. कस्तुरी, मकरध्वज, हीरकभस्म, सुवर्णभस्म अपवाद म्हणून वापरावी. औषधे सुलभ, तुलनेने स्वस्त, सर्वसमावेशक, सर्वत्र मिळणारी असावीत, हे सांगावयास नकोच.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  -१८ डिसेंबर    
१८९१> नाटककार विनायक जनार्दन कीर्तने यांचे निधन. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या निबंधाची मान्यवरांकडून दखल. ‘थोरले माधवराव पेशवे’ आणि ‘जयपाल’ या दोन नाटकांनी नाटय़सृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले.
१९१८> नाटय़-चित्र समीक्षक वा. य. गाडगीळ यांचा जन्म.  मोहिनी मासिकातील ‘हिरव्या चादरीवर’ या त्यांच्या सदराचे चार भाग पुस्तकरूपात आलेच, शिवाय ‘नाटकांच्या नवलकथा’त्यांनी लिहिल्या आणि ‘स्वरराज छोटा गंधर्व’ ग्रंथाचे संपादन केले.
१९३०> संवेदनशील मनाचे साहित्यिक, प्राध्यापक आणि काव्यसमीक्षक रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म.  गीतभात या त्यांच्या काव्यसमीक्षेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार.  माडगूळकरांच्या गीतरामायणाचे किंवा इंदिरा संत यांच्या मृण्मयी संग्रहाचे रसग्रहण, मराठी काव्यविकासाचा काव्यसरिता  हा आढावा, , हे त्यांचे कार्य. आठवणीतल्या कवितांच्या संपादक मंडळात ते प्रमुख होते.
१९३१> समीक्षक प्रा. सदाशिव शिवराम भावे यांचा जन्म.  त्यांचे मराठी व इंग्रजी नियतकालिकांतून सुमारे ३०० हून अधिक लेख असंग्रहित राहिले, परंतु ‘अमेरिका नावाचे प्रकरण’ हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले.
– संजय वझरेकर